जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुखाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:16 AM2021-07-28T04:16:06+5:302021-07-28T04:16:06+5:30

नाशिक: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले ...

District Disaster Management Chief resigns | जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुखाचा राजीनामा

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुखाचा राजीनामा

googlenewsNext

नाशिक: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून, कामाचा अतिरिक्त ताण वाढल्याने तब्येतीवर होणाऱ्या परिणामामुळे राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वाघमारे गैरहजर असल्याने त्यांना नोटीस बजविण्यात आली होती असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

ब्रह्मगिरीवर दरड कोसळण्याची घडलेली घटना आणि जिल्ह्यात पाऊस सुरू असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचे नियंत्रण अपेक्षित असतांनाही विभागाचे प्रमुख वाघमारे हे गैरहजर असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर वाघमारे यांनी थेट आपल्या पदाचा राजीनामा दिला. मानसिक ताणामुळे आरोग्य विषयक समस्या निर्माण होत असल्याने आपणास पदमुक्त करण्यात यावे, असे त्यांनी आपल्या राजीनामापत्रात म्हटले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात गेल्या १३ वर्षापासून प्रशांत वाघमारे हे कार्यरत होते.

वाघमारे यांच्या राजीनाम्यामुळे मात्र चर्चेला उधाण आले आहे. ब्रह्मगिरीवरील दरड कोसळण्याचे कारण सांगितले जात असले तरी मागील महिन्यापासूनच वाघमारे राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आले होते. १६ जून रोजीच त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे काम सांभाळणे शक्य नसल्याचे सांगून जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली होती.

दरम्यान, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी वाघमारे यांच्या राजीनामा वृत्ताला दुजोरा दिला असून, कंत्राटी पद्धतीचे हे पद असल्याने पद भरण्याबाबतची कार्यवाही लवकरच केली जाईल, असे सांगितले.

--कोट--

आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असतानाही वाघमारे हे गेल्या काही दिवसांपसून कामावर आलेले नाहीत. याबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजविण्यात आली असता त्यांनी राजीनामा पाठवून दिला. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पद भरण्यासाठी लवकरच प्रक्रिया केली जाईल.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.

---कोट--

गेल्या १३ वर्षांत जिल्ह्यास उत्तम प्रकारचे व्यवस्थापन केले आहे. राज्यात नाशिक जिल्ह्याने आपत्ती व्यवस्थापनात उत्कृष्ट कार्य केलेले आहे. कुंभमेळा असो की इतर आपत्तीत उत्तम कार्य केल्याची पावती नाशिककरांची आहे.

- प्रशांत वाघमारे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख

Web Title: District Disaster Management Chief resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.