Dissatisfaction with the allegations ... | मिसळच्या तर्रीत गेली आरोपांची मटकी बुडून...
मिसळच्या तर्रीत गेली आरोपांची मटकी बुडून...

ठळक मुद्देझाले गेले विसरून उमेदवार व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत घडविला नवीन पॅटर्नमग कार्यकर्त्यांनी तरी का डोकेफोड करायची ? राजकीय आरोप करूनही मैत्रीपूर्ण संबंध अराजकीय मैत्रीचा नवा नाशिक पॅटर्न घडून येऊ पाहतोय.

सारांश

निकाल अजून लागायचा आहे, त्यामुळे मतदानोत्तर आडाखे-अंदाज व आकडेमोड जोरात सुरू आहेच; पण त्याचसोबत परस्परांविरोधात टोकाचे आरोप-प्रत्यारोप करीत निवडणूक लढलेले उमेदवार ‘मिसळ पार्टी’ साठी एकत्र आलेले बघावयास मिळाल्याने अराजकीय मैत्रीचा नवा नाशिक पॅटर्न घडून येऊ पाहतोय. अर्थात, निवडणुकांतले द्वंद्व मतदानानंतर विसरून जायचे असते व हातात हात घालून विकासाकडे लक्ष द्यायचे असते हे खरेच; परंतु मोठ्या अहमहमिकेने लढलेले नेते जेव्हा अशा सामीलकीचा प्रत्यय आणून देतात तेव्हा त्यांच्यासाठी म्हणून आपसात वैर करून बसलेल्या कार्यकर्ते वा समर्थकांची मोठी अडचण होऊन गेल्याशिवाय राहत नाही. नाशकातही तेच होताना दिसत आहे.


यंदाच्या निवडणूक प्रचारात विकासाच्या चर्चेपेक्षा व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांचीच राळ मोठ्या प्रमाणात उडालेली दिसली. यातही सोशल मीडियातून प्रचाराला ऊत आलेला असल्याने नेत्यांमधील जाहीर आरोपांखेरीज समर्थकही मोठ्या हिरिरीने आपल्या उमेदवारासाठी व पक्षाकरिता लढताना दिसत होते. त्यातून उगाच व्यक्तिगत टीका-टिप्पणी करून बसलेले काही जण निवडणुकीपूर्वीच ठोकलेही गेलेत. तात्पर्य, नेत्यासांठी किंवा उमेदवारांसाठी कार्यकर्ते टोकाला जाऊन आपसात झुंजले, मार खाऊनही बसले तर अनेकजण विरोधकांच्या नजरेत भरून गेलेले आहेत. पण या राजकीय ‘हमरीतुमरी’ला चार दिवसही उलटत नाही तोच उमेदवार व पक्षप्रमुख एकत्र येत छानपैकी मिसळ पार्टी करताना दिसून आल्याने त्यांच्या परस्परांवरील आरोप-प्रत्यारोपांची मटकी मिसळच्या तर्रीत बुडुन गेली की काय, असा प्रश्न उपस्थित होऊन गेला आहे.


नाही तरी हल्ली राजकीय अभिनिवेश टोकाचे राहिलेले नाहीत कारण निष्ठेचा बाजार उठून गेला आहे. अशात राजकीय आरोप करूनही मैत्रीपूर्ण संबंध राखणे वेगळे आणि वैयक्तिक पातळीवर घसरून पुन्हा एकोपा प्रदर्शिणे वेगळे. मतदारांच्या धारणांना त्यातुन धक्के बसल्याखेरीज राहत नाही. उभयपक्षीयांत सलोखा हवाच, पण टोकाला जाऊन पुन्हा काही न झाल्यासारखे उसने प्रदर्शन घडून येते तेव्हा त्यातून कार्यकर्ते व मतदारांमध्ये आपली फसवणूक झाली की काय, अशी शंका घेतली जाण्यास संधी मिळून जाते. नाशकातील मिसळ पार्ट्यांकडे त्याचदृष्टीने बघता यावे.


विशेषत: अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी आपण भुजबळांचे ‘मॅनेज’ उमेदवार असल्याचा आरोप खोडून काढताना उलट भुजबळांनीच हेमंत गोडसे यांची उमेदवारी शिवसेनेकडून मॅनेज केल्याचा आरोप केला होता, त्यामुळे मोठी चर्चा घडून आली होती. भाजपचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ‘चौकीदार चोर है’चा घोषा विरोधकांकडून लावला गेल्याने या पक्षाचे नेते-कार्यकर्ते संतप्त होते. तर समीर भुजबळ यांच्यावरील आरोपांची उजळणी करीत जेलमध्ये जाणाऱ्यांना निवडून पाठविणार का, असा प्रश्न खुद्द मुख्यमंत्र्यांनी केला होता; पण ती सर्व राजकीय जुमलेबाजीच होती, हे या मिसळ पार्टीवरून स्पष्ट व्हावे. कारण, कोण कुणाला मॅनेज झाले हे नक्की सांगता येणार नसले तरी कोकाटे व भुजबळ दोघे सोबत मिसळवर ताव मारताना दिसले, तर निवडून देण्यासाठी जे भुजबळ भाजपला चालणार नव्हते ते सोबत मिसळ खायला मात्र भाजपच्याच आमदार सीमा हिरे व अन्य पदाधिकाऱ्यांना चालले; त्यामुळे नेत्यांची ही मिलीभगत पाहून त्यांचे कार्यकर्तेच बिचारे वेड्यात निघणे स्वाभाविक ठरले.


अर्थात, कार्यकर्तेही आता सुजाण झाले आहेत. तेव्हा खुद्द उमेदवार व नेत्यांनी एकत्रित येत मिसळ पार्टी केली म्हटल्यावर दुसºयाच दिवशी कार्यकर्त्यांच्या फळीनेही तसाच घाट घातला व ‘हम भी कुछ कम नही’चाच संकेत दिला. म्हटले तर हा उपक्रम चांगलाच झाला. राजकीय रागलोभ बाजूला सारत समन्वयवादी सामीलकीची पायवाटच जणू संबंधितांनी घालून दिली; पण हे चित्र कायम टिकून राहणार आहे का? तेव्हा, कार्यकर्त्यांनीच नव्हे तर मतदारांनीही या ‘पॅटर्न’पासून कुणाशीही उगाच न भिडण्याचा बोध घेण्याचीच गरज आहे.

Web Title: Dissatisfaction with the allegations ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.