गंगापूर समूहातील धरणसाठा ९७ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 01:29 AM2019-08-24T01:29:27+5:302019-08-24T01:29:51+5:30

धरण क्षेत्रात बरसणाऱ्या श्रावणसरींमुळे गंगापूर धरण समूहातील चारही प्रकल्पांमध्ये वाढ झाल्याने समूहातील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागीलवर्षी समूहाचा धरणसाठा ९६ टक्के इतका होता. या चार प्रकल्पांपैकी कश्यपी आणि गौतमी गोदावरीमधूनच किरकोळ पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

 Dams in Gangapur community up to 90% | गंगापूर समूहातील धरणसाठा ९७ टक्क्यांवर

गंगापूर समूहातील धरणसाठा ९७ टक्क्यांवर

Next

नाशिक : धरण क्षेत्रात बरसणाऱ्या श्रावणसरींमुळे गंगापूर धरण समूहातील चारही प्रकल्पांमध्ये वाढ झाल्याने समूहातील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागीलवर्षी समूहाचा धरणसाठा ९६ टक्के इतका होता. या चार प्रकल्पांपैकी कश्यपी आणि गौतमी गोदावरीमधूनच किरकोळ पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
आॅगस्टमधील पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने दहा दिवस जिल्ह्याला झोडपून काढले. यामुळे २४ प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग करावा लागला. त्यामुळे नद्यांना मोठा पूर आला होता. गंगापूर, दारणा, कडवा आणि नांदूरमधमेश्वरमधून तर विक्रमी पाण्याचा विसर्ग करावा लागला. सातत्याने विसर्ग सुरू असल्यामुळे पूरपरिस्थितीही मोठ्या प्रमाणात वाढली. याचा फटका गोदाकाठी असलेल्या गावांना चांगलाच बसला.
आॅगस्टच्या पंधरवड्यानंतर पावसाने विश्रांती घेतली असून, धरणक्षेत्र वगळता अन्य तालुक्यांमध्ये कुठेही पाऊस नाही. श्रावणसरीची बरसात काही ठिकाणी होत असली तरी धरण क्षेत्रातील पावसाचा जोर अधिक असल्याने धरणांच्या पातळीत वाढ झालेली आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात गेल्या दोन दिवसांत वाढ झालेली आहे. दोन दिवसांपूर्वी ९३ टक्के असलेला धरणाचा साठा आता ९५.८ टक्के इतका झाला आहे. कश्यपी धरणातदेखील ९९ टक्के साठा असून, गौतमी गोदावरीत ९७ आणि आळंदी धरणातील पाणीसाठा शंभर टक्के इतका आहे. समूहातील एकूण पाणीसाठा आता ९७ टक्क्यांवर पोहोचला असून, मागीलवर्षीच्या तुलनेत एका टक्क्याने पाणीसाठा अधिक आहे. सध्या गौतमी आणि आळंदीमधूनच किरकोळ स्वरूपात विसर्ग केला जात आहे.
गंगापूर धरण समूहातील चारही प्रकल्पांतील पाणीसाठा चांगलाच वाढला असताना दुसरीकडे दारणा धरणही ९६ टक्के इतके भरले आहे.
जिल्ह्यातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर
यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील धरणे भरभरून वाहिले असताना मागील वर्षीच्या पाणीसाठ्याचे उच्चांक मोडीत काढत यंदा पावसाने नाशिककरांना दिलासा दिला आहे. जिल्ह्यात २४ प्रकल्प असून, सध्या जिल्ह्यातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा १४ टक्क्यांनी अधिक आहे. धरणातील पाणीसाठ्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. मागीलवर्षी जिल्ह्याचा पाणीसाठा ७६ टक्के इतका होता. यंदा तो ९० टक्क्यांवर पोहोचला आहे.

Web Title:  Dams in Gangapur community up to 90%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.