मामा राजवाडे, अजय बागुल यांच्यासह पाठकविरोधात गुन्हा, ५७ लाखांच्या खंडणीप्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 00:46 IST2025-11-02T00:44:47+5:302025-11-02T00:46:21+5:30
आरोपींनी जमीन परत देण्यासाठी तब्बल २ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

मामा राजवाडे, अजय बागुल यांच्यासह पाठकविरोधात गुन्हा, ५७ लाखांच्या खंडणीप्रकरण
Nashik Crime: नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मूर्तिकार कुटुंबाला दहशतीच्या छायेत ठेवत त्यांची जागा बळकावून ५५ लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी आधीच वेगवेगळ्या गुन्ह्यांत अटकेत असलेल्या मामा राजवाडे, अजय बागुल यांच्यासह श्रमिक सेनेचे भगवंत पाठक याच्यासह एकूण २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पंचवटीतील घात्रक फाटा परिसरातील मूर्तिकार चंदन गोटीराम भोईर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संजय राठी, महेश राठी आणि त्यांचे साथीदार अजय बागुल, मामा राजवाडे टोळीने मार्च २०२५ पासून भोईर यांच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केला होता.
लोखंडी रॉड व दांडक्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न, जीवे मारण्याच्या धमक्या आणि ५७ लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आरोपींनी जमीन परत देण्यासाठी तब्बल २ कोटी रुपयांची मागणी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संजय राठी, महेश संजय राठी, मामा राजवाडे, अजय बागुल, मीना लोळगे, प्रतीक लोळगे व त्याचा भाऊ, बाळासाहेब पाठक यांच्यासह इतर १० ते १२ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भल्या पहाटे नोंदविला गुन्हा
सततच्या या दहशतीला कंटाळून वंदना भोईर यांनी ३० ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता म्हसरूळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. ड्यूटीवरील पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केवळ काही मिनिटांतच गुन्हा दाखल केला. पहाटे ४:१४ वाजता गुन्हा नोंदविला गेला आणि अवघ्या २१ मिनिटांत, म्हणजेच ४:३५ वाजता वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिंतामण आणि सहायक पोलिस निरीक्षक बोरसे स्वतः घटनास्थळी दाखल झाले.
या कलमान्वये दाखल करण्यात आला गुन्हा
कलम ३०८ (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न), ११९ (खंडणी), १८९ (लोकसेवकाला इजा करण्याची धमकी), ३२९ (मालमत्ता बळकावणे) आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाची सूत्रे सहायक पोलिस निरीक्षक बोरसे यांच्या हाती देण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.