कॉन्सन्ट्रेटर मशीन परत करण्यास नगरसेवकांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 01:31 AM2021-11-17T01:31:33+5:302021-11-17T01:31:51+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची भासणारी कमतरता व त्यातून नागरिकांचे जात असलेले जीव पाहता, नाशिक महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लोकप्रतिनिधींना सामाजिक कार्यासाठी दिले, मात्र आता कोरोनाचे प्रमाण कमी झालेले असतानाही व मुबलक ऑक्सिजनचा साठा असतानाही नगरसेवकांनी कॉन्सन्ट्रेटर परत करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे.

Corporator refuses to return concentrator machine | कॉन्सन्ट्रेटर मशीन परत करण्यास नगरसेवकांचा नकार

कॉन्सन्ट्रेटर मशीन परत करण्यास नगरसेवकांचा नकार

googlenewsNext
ठळक मुद्देमनपाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष : निवडणुकीत येणार अडचण

संदीप झिरवाळ/ पंचवटी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची भासणारी कमतरता व त्यातून नागरिकांचे जात असलेले जीव पाहता, नाशिक महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लोकप्रतिनिधींना सामाजिक कार्यासाठी दिले, मात्र आता कोरोनाचे प्रमाण कमी झालेले असतानाही व मुबलक ऑक्सिजनचा साठा असतानाही नगरसेवकांनी कॉन्सन्ट्रेटर परत करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. या संदर्भात महापालिका प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही त्याला दाद मिळत नसल्याचे पाहून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत नगरसेवकांना ना हरकत दाखलाच न देण्याचा गांभीर्याने विचार केला जात असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाग्रस्त नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी मनपा प्रशासनाकडे नगरसेवक निधीतून मशीन खरेदी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने कॉन्सन्ट्रेटर खरेदी करून विभागनिहाय नगरसेवकांना मशीनचे वाटप केले होते. त्याचा चांगला उपयोग या काळात झाला. कोरोना रुग्णांना घरच्या घरी ऑक्सिजनची सोय झाल्याने अनेकांचे जीव वाचविण्याचे श्रेय महापालिका, नगरसेवकांना दिले गेले. ऑक्सिजनची कमतरता व रुग्णांकडून होणारी वाढती मागणी लक्षात घेता त्यावेळी कॉन्सन्ट्रेटर सर्वांसांठीच उपयोगी ठरले. यातील काही कॉन्सन्ट्रेटर नगरसेवकांनी आपल्या कुटुंब व नातेवाइकांसाठीच वापरत जनतेला वाऱ्यावर सोडल्याच्याही तक्रारी त्यावेळी करण्यात आल्या.

दरम्यान, अजूनही अधून मधून तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाल्याने जनजीवन सुरुळीत झाले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने खरेदी केलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आता पुन्हा परत घेऊन ते सुरक्षित ठेवण्याचा व वेळप्रसंगी वापरण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने प्रयत्न चालविला असून, त्यासाठी सर्वच नगरसेवकांकडे वापराविना पडून असलेले मशीन परत करण्यासाठी आग्रह धरला जात आहे. परंतु वारंवार प्रशासनाने आवाहन करूनही त्यास अपवादवगळता नगरसेवकांनी प्रतिसाद दिलेला नाही. काही नगरसेवकांनी तर आपल्या नगरसेवक निधीतून कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्यात आल्याने त्यावर आपलाच हक्क सांगितला आहे.

चौकट=

मिळणार नाही ना हरकत दाखला

प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगरसेवकांना विनंती करूनही उपयोग होत नसल्याचे पाहून प्रशासनाने त्यावर शक्कल लढविली आहे. महापालिका निवडणुकीसाठी नामांकन भरताना महापालिकेची कोणतीही थकीत देणी नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र जोडावे लागते. त्यामुळे ज्या नगरसेवकांकडे कॉन्सन्ट्रेटर मशीन पडून आहे, त्यांना ना हरकत दाखला न देण्याचे ठरविले आहे. दाखला नसेल तर नगरसेवकांना निवडणूक लढविण्यात अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे त्यानिमित्ताने तरी कॉन्सन्ट्रेटर मशीन परत मिळण्याची प्रशासनाला आशा आहे.

Web Title: Corporator refuses to return concentrator machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.