येत्या १० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे उत्सवापूर्वी मूर्तिकार व विक्रेते यांचे नियोजन काही महिन्यांपासून सुरू असते. मात्र कोरोनामुळे यंदा पुन्हा या व्यवसायावरही संकट येते की काय, अशी भीती मूर्तिकारांना होती. मागील वर्षीच्या गणपती उत्सवालाही कोरोनाची नजर लागलेली होती. त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होता. त्यामुळे सार्वजनिक गणेश उत्सवावरही नियमांची बंधने आली होती. भव्य व उंच तयार करण्यात आलेल्या गणरायांच्या मूर्ती सुरक्षित सांभाळण्यासाठी मूर्तिकारांना नियोजन आखावे लागले होते. कोरोनामुळै उत्सवावर बंधने आल्याने स्वाभाविक सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मूर्तिकारांच्या मूर्ती (भव्य व मोठ्या आकाराच्या) तशाच पडून राहिल्या होत्या व मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते. मोठ्या आकाराच्या मूर्ती तयार करताना मोठी गुंतवणूक व अनेक महिन्यांची मेहनत त्यामागे असते. मात्र व्यावसायिक गणित चुकले तर आर्थिक फटका बसतो. त्याच आर्थिक फटक्याची मागील वर्षी झळ खाणारे मूर्तिकार यावेळेसही आर्थिक संकटात सापडतात की काय, अशी वास्तविकता पुढे आली आहे.
इन्फो
मागणीवर प्रश्नचिन्ह
घरगुती गणेशोत्सवासाठी लहान आकाराच्या मूर्ती नागरिक खरेदी करतात, हा एवढा दिलासा असला तरी शेकडोंच्या संख्येने असलेल्या गणपती मंडळांनी मागील वर्षी मूर्ती खरेदी केल्या नाहीत व यावर्षीही अशाच अवस्थेला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. वणी येथील शिवाजी पवार व अंबादास पवार यांच्या मूर्ती तयार करण्याच्या कारखान्यातून घोटी, इगतपुरी, सटाणा मालेगाव व इतर तालुक्यांसह दिंडोरी तालुक्यातही मूर्ती विक्री करण्यात येतात. मात्र कोरोनामुळे मागील वर्षी या भागातूनही मागणी नव्हती. यावर्षीही याची पुनरावृत्ती होण्याची भीती उभी ठाकली आहे. कर्ज काढून गुंतवणूक करायची व गुंतवणुकीवर परतावा मिळाला नाहीतर कर्ज व व्याज कसे भरायचे, हा एक मोठा प्रश्न असल्याची माहिती शिवाजी पवार यांनी दिली.