कोरोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईस उसनवारीचा व्यवहार झाले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 03:57 PM2021-05-30T15:57:21+5:302021-05-30T15:57:42+5:30

पाटोदा : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने प्रशासनाने एप्रिल महिन्यापासून अनेक कडक निर्बंध घातले आहेत. कोरोनाच्या या महामारीमुळे अनेक धंद्यांना खीळ बसली आहे. बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाल्याने अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे .त्यामुळे गाव खेड्यात सुरू असलेला उधार उसनवारीचे व्यवहार बंद झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह लहानमोठे व्यावसायिक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. याचा सर्वाधिक फटका शेती व्यवसायाला बसला आहे.

Corona shuts down economy | कोरोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईस उसनवारीचा व्यवहार झाले बंद

कोरोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईस उसनवारीचा व्यवहार झाले बंद

Next
ठळक मुद्देग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी वर्ग आर्थिक विवंचनेत

गोरख घुसळे
पाटोदा : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने प्रशासनाने एप्रिल महिन्यापासून अनेक कडक निर्बंध घातले आहेत. कोरोनाच्या या महामारीमुळे अनेक धंद्यांना खीळ बसली आहे. बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाल्याने अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे .त्यामुळे गाव खेड्यात सुरू असलेला उधार उसनवारीचे व्यवहार बंद झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह लहानमोठे व्यावसायिक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. याचा सर्वाधिक फटका शेती व्यवसायाला बसला आहे.

खरिपाच्या तोंडावर व्यापारी वर्गही आर्थिक अडचणीत सापडला असल्याने खते, बी-बियाणे औषधे उधारीच्या वायद्यावर देणे त्यांनी थांबवून घेतले आहे. शेतकरीवर्ग या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी दिवस-रात्र एक करताना दिसत आहेत.

कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अनेक कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. आठवडे बाजार, लग्नसोहळे, मंगल कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाली असून, अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकांनी लहान-मोठे व्यवसाय सुरू केलेले आहे. मात्र बाजारपेठेत ग्राहक फिरकत नसल्याने लहान-मोठ्या विक्रेत्यांवर संकट ओढवले आहे. कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी खेड्यापाड्यात भरणारे आठवडे बाजार बंद असल्याने याचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

पाटोदा परिसरातून पालखेड कालवा जात असल्याने या भागात बऱ्यापैकी पाणी उपलब्ध होत असल्याने शेतकरी वर्ग भाजीपाला पिकाचे उत्पन्न घेत आहेत. कानडी, आडगाव, पिंपरी शिरसगाव, लौकी, दहेगाव पाटोदा, सोमठाणदेश, विखरणी, ठाणगाव या भागात शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जाते. उत्पादित झालेला माल जवळच्या आठवडे बाजारात अथवा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेला जातो.

कडक लॉकडाऊनमुळे भाजीपाला विकता न आल्याने मोठे नुकसान होऊन आर्थिक फटका बसला आहे. कोरोना महामारी तसेच लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका मजूर वर्गाला बसला आहे. त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

सध्या शेतात काम उपलब्ध नाही तसेच शेतकरी वर्गाचे भांडवल संपल्यामुळे कामासाठी मजूर लावणे अवघड बनले आहे. खरीप हंगामाला पीककर्जाच्या माध्यमातून भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी शेतकरीवर्ग गावातील सहकारी सोसायटी कार्यालय तसेच राष्ट्रीयीकृत बँकांचे उंबरठे झिजविताना दिसत आहेत,

मात्र सहकारी सोसायट्या सोडल्यास राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास दिरंगाई करीत आहेत. कोरोनामुळे सर्वांनाच आर्थिक टंचाई भासत असल्याने नातेवाईक मित्रमंडळी तसेच खासगी सावकारही व्याजाने पैसे देण्यास हात आखडता घेत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Web Title: Corona shuts down economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.