कोरोना हद्दपार व्हावा, व्यवसायास बहर यावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:06 PM2020-03-25T23:06:27+5:302020-03-25T23:07:46+5:30

सध्या देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार ग्रामीण भागातील आठवडे बाजारही बंद करण्यात आले आहेत. परिणामी छोटे-मोठे व्यावसायिक यामुळे आर्थिक संकटात सापडले असून, शेतकरी व किरकोळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाला कधी हद्दपार होणार आणि पुन्हा ‘अच्छे दिन’ कधी येणार या विवंचनेत ग्रामीण भागातील जनता सापडली आहे.

Corona should be ousted, business should be out! | कोरोना हद्दपार व्हावा, व्यवसायास बहर यावा !

कोरोना हद्दपार व्हावा, व्यवसायास बहर यावा !

Next
ठळक मुद्देकोट्यवधींची उलाढाल ठप्प : आठवडे बाजार बंद केल्याने विक्रेत्यांची आर्थिक परवड

चंद्रमणी पटाईत 
नाशिक : सध्या देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार ग्रामीण भागातील आठवडे बाजारही बंद करण्यात आले आहेत. परिणामी छोटे-मोठे व्यावसायिक यामुळे आर्थिक संकटात सापडले असून, शेतकरी व किरकोळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाला कधी हद्दपार होणार आणि पुन्हा ‘अच्छे दिन’ कधी येणार या विवंचनेत ग्रामीण भागातील जनता सापडली आहे.
अनेक ग्रामपंचायतींनी स्वयंस्फूर्तीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गावचा आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचे आवाहनही केले आहे. मात्र, कोरोनाच्या धास्तीने आठवडे बाजारावर अवलंबून असल्या व्यावसायिकांसह किरकोळ विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे.
आठवडे बाजाराच्या माध्यमातून होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढालही ठप्प झाल्याने ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मोडल्याची भावना निर्माण झाली आहे. फिरते कापड विक्रेते, भेळ-भत्ता व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते, घाऊक किराणा विक्रेते, हातगाडीवरून घरगुती साहित्य विक्रेते यांच्यासह कंगवा-फणी विक्रेते, गहू, तांदूळ विक्रेते, मांस विक्रेते आदींचा उदरनिर्वाह आठवडे बाजारवर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात मजूरवर्ग व शेतकरी यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने ते आठवडाभर लागणारे रेशन व जीवनावश्यक वस्तूंसह भाजीपाला बाजारातून नेत असतात. त्यातच ज्या गावात आठवडे बाजार भरतो त्या गावच्या आसपास असलेल्या इतर खेड्यापाड्यातील नागरिकही आठवडे बाजारातूनच खरेदी करतात. मात्र, कोरोनापासून बचावासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आलेल्या आठवडे बाजारामुळे अनेकांना आपल्या मूलभूत गरजाही भागविणे अवघड झाले आहे. आठवडे बाजारावर अवलंबून असलेल्या अर्थचक्रालाही ब्रेक लागल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.

स्वच्छतेसह जनजागृतीवर भर
कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा, कोरोनाबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत, विविध उपाययोजनांबद्दल चर्चा व्हावी यासाठी विविध सामाजिक संघटनांसह ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांना कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडल्याचे तसेच गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांसह लग्नसोहळेही पुढे ढकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाला न घाबरता त्याच्याशी दोन हात करण्यासाठी नागरिकांचे मनोबल वाढविण्यावर भर दिला जात आहे. नागरिकही आवाहनास प्रतिसाद देत स्वत:सह समाजाच्या स्वास्थ्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.

माझे किरकोळ विक्रीचे किराणा दुकान असून, सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या धुमाकुळामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. आठवडे बाजारात विक्री करून आमचा उदरनिर्वाह होत असतो. मात्र, तोच बंद झाल्याने भवितव्याची चिंता सतावत आहे. कोरोनाचा प्रभाव कधी कमी होईल आणि आठवडे बाजार कधी पूर्ववत होतील याचीच प्रतीक्षा लागली आहे.
- किशोर मोरे, किराणा व्यावसायिक, नांदगाव

मी होलसेल बाजारातून रेडिमेड कपडे आणून ते आठवडे बाजारात विक्री करत असतो. मात्र, कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम तर झालाच शिवाय आता आठवडे बाजारही बंद झाल्यामुळे जगायचं कसं, असा प्रश्न उभा ठाकला आहे. आधीच बेरोजगारी वाढली आहे. त्यात व्यवसाय सुरू केला. मात्र, अस्मानी-सुलेमानी संकटांचा सामना करता सावरतो ना सावरतो तोच कोरोना व्यायरसने आक्रमण केल्याने जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.
- संतोष पवार, कापड विक्रेता, मालेगाव

सध्या उन्हाचे दिवस आहेत. हंगामी असलेला धंदा म्हणून मी गावागावात गोळा आणि कुल्फी विकत फिरतो. मात्र, सध्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने आठवडे बाजर बंद झाले आहेत. त्यामुळे हंगामी व्यवसायावर संक्रांत आली असून, चार महिन्यात वर्षभराच्या होणाऱ्या कमाईवर याचा परिणाम होणार आहे. मुलगी लग्नाला आली असून, तिचे लग्न वर्षभर पुढे ढकलावे लागेल, असे वाटते आहे. कोरोना कधी हद्दपार होईल याची चिंता लागली आहे.
- सुनील वाघ, कुल्फी विक्रेता, येवला

Web Title: Corona should be ousted, business should be out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.