कडक कारवाई करण्याचे आयुक्तांनी दिले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:15 AM2021-05-16T04:15:00+5:302021-05-16T04:15:00+5:30

नाशिक- महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयात भाजपा नगरसेविका डॉ. सीमा ताजणे यांचे राजेंद्र ताजणे यांनी धुडगूस घालून तोडफोड केल्यानंतर महापालिका ...

The commissioner ordered strict action | कडक कारवाई करण्याचे आयुक्तांनी दिले आदेश

कडक कारवाई करण्याचे आयुक्तांनी दिले आदेश

Next

नाशिक- महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयात भाजपा नगरसेविका डॉ. सीमा ताजणे यांचे राजेंद्र ताजणे यांनी धुडगूस घालून तोडफोड केल्यानंतर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी हा प्रकार अत्यंत गांभीर्याने घेतला असून कठोरातील कठोर कारावाई करण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नव्हे त्यांनी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याशी चर्चा केली आहे.त्यांनी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

नाशिकरोड येथील नवीन बिटको रुग्णालयात ही घटना घडली तेव्हा महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि कोविड सेलचे प्रमुख डॉ. आवेश पलोड हे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे बैठकीसाठी गेले होते, त्यांना हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी आयुक्त कैलास जा‌धव यांना हा प्रकार कथन केला आयुक्तांनी तत्काळ त्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले.

महापालिकेकेच्या बिटको रुग्णालयात सुमारे साडेसातशे ते आठशे कोविड रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून रुग्णालयाचा सर्व स्टाफ आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत, अशावेळी अशाप्रकारचा हल्ला करणे अत्यंत चुकीचे आहे. अन्य कोणी सामान्य नागरिकाने त्रागा म्हणून असे पाऊल उचलले असते तर समजण्यासारखे आहे. मात्र नगरसेविकेच्या पतीने अशाप्रकारे गोंधळ घालणे तसेच दहशत माजवणे अत्यंत चुकीचे आहे.

रुग्णालयाच्या कामकाजात काही त्रुटी असतील तर संबंधित आपल्या नगरसेविका पत्नीच्या माध्यमातून प्रशासनाकडे माझ्याकडे किंवा अन्य अधिकाऱ्यांकडे अडचणी मांडू शकत होते, महासभेत किंवा अन्य ठिकाणी देखील प्रश्न मांडता येऊ शकला असता. परंतु कोरोनाच्या संकट काळात अशाप्रकारची दहशत माजवणे अत्यंत चुकीचे असल्याचे आयुक्त जाधव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

पोलीस आयुक्त दीपक पांडेय तसेच अन्य उपायुक्तांशीदेखील या हल्ल्याबाबत चर्चा केली आहे. कोणत्याही परिस्थितीत अशाप्रकारची दहशत कधीही खपवून घेतली जाणार नाही असे त्यांनी सांगितले.

...कोट..

नवीन बिटको रुग्णालयात झालेली तोडफोडीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कोरोनासारख्या संकटात बिटको रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचारी अत्यंत जोखमीच्या परिस्थीतीत काम करीत आहेत.अशावेळी अशाप्रकारची घटना घडणे अत्यंत दुर्दैवी आहे. हा हल्ला का केला, त्या मागचे कारण काय याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. घडलेल्या प्रकाराबाबत पक्षाच्या नेत्यांना माहिती देण्यात आली आहे.

- सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक

इन्फो...

पोलीस बंदोबस्त असूनही हल्ला

नाशिक महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयात सुमारे साडेआठशे रुग्णांवर उपचार सुरू आहे. महापालिकेने दक्षतेचा भाग म्हणून याठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. महापालिकेने अतिक्रमण हटवण्याच्या कामासाठी पंधरा पोलीस कर्मचारी प्रतिनियुक्तीवर घेतले आहेत. त्यातील नऊ पोलीस बिटको रुग्णालयात तर सहा पोलीस कर्मचारी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात तैनात करण्यात आले आहेत. त्यानंतरही पोलीस बंदाेबस्त असतानाही अशाप्रकारचा हल्ला झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.

इन्फो...

मनपाचे रुग्णालयच असुरक्षित तर...

गेल्याच महिन्यात शहरातील मानवता रुग्णालयासह चार खासगी रुग्णालयात हल्ले झाले होते. हा प्रकार घडत नाही तोच शनिवारी (दि.१५) महापालिकेच्या रुग्णालयाच्या बाबतीत असा प्रकार घडला आहे. शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयात पोलीस बंदोबस्त असतानाही अशाप्रकारचे हल्ले घडत असतील तर खासगी रुग्णालयाच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

.इन्फो..

सध्याची परिस्थिती फार वेगळी आहे. रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहे अशा वेळी रुग्ण आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्यांना त्रास होईल अशाप्रकारचे वर्तन कोणीही करू नये. रुग्णालयात इंजेक्शन किंवा औषधे मिळत नसतील तर त्यासाठी यंत्रणा आहेत. मात्र ते मिळाले नाही म्हणून गोंधळ घातला जात असेल तर संबंधितांवर कारवाई केलीच पाहिजे.

- डॉ. हेमंत सोननीस, अध्यक्ष, आयएमए, नाशिक

Web Title: The commissioner ordered strict action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.