Closer to target: Speed given by rainfall; Nashik's state level progress in tree planting | लक्ष्याच्या जवळ : पावसाने दिली गती; वृक्षलागवडीत नाशिकची राज्यस्तरीय प्रगती
लक्ष्याच्या जवळ : पावसाने दिली गती; वृक्षलागवडीत नाशिकची राज्यस्तरीय प्रगती

ठळक मुद्देवृक्षारोपण १कोटी ७७ लाख ७२ हजार ७६३पर्यंत पोहचले.संततधारेमुळे मिळणार चांगले यशया महिनाअखेर लक्ष्य पूर्ण करण्याचा वनविभागाचा निर्धार

नाशिक : राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानात नाशिक जिल्ह्याला १ कोटी ९६लाख ३० हजार ५८१ रोपे लागवडीचे लक्ष्य देण्यात आले होते. यापैकी बुधवारी (दि.१४) सायंकाळपर्यंत जिल्ह्याचे वृक्षारोपण १कोटी ७७ लाख ७२ हजार ७६३पर्यंत पोहचले. जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली असून यामहिनाअखेर लक्ष्य पूर्ण करण्याचा नाशिक वनविभागाचा निर्धार आहे.
१ जुन ते ३० सप्टेंबर या कालावधीत वन मंत्रालयाला राज्यभरात वनविभागासह अन्य यंत्रणांच्या माध्यमातून ५० कोटी वृक्ष लागवडीचा अखेरचा ३३ कोटींचा टप्पा पूर्ण करावयाचा आहे. या अभियानाचे हे शेवटचे वर्ष असून २०१६ साली २ कोटी वृक्ष लागवडीपासून या अभियानाला राज्यस्तरावर प्रारंभ केला गेला. याअंतर्गत यंदा नाशिक जिल्ह्याने पुन्हा आघाडी घेतली असून २२ दिवसांत ४३ टक्क्यापर्यंत जिल्ह्याला यश आले होते; मात्र त्यानंतर पावसाने अचानकपणे दडी मारल्यामुळे वृक्षारोपणाची स्थिती गंभीर बनली होती. परिणामी वृक्षारोपण जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये खोळंबले होते. दडी मारल्यानंतर पंधरवड्यापासून पावसाने पुन्हा समाधानकारक हजेरी लावल्याने वृक्षारोपणालाही वेग आला. परिणामी नाशिक जिल्ह्याने ९०.५४ टक्क्यांपर्यंत वृक्षलागवडी यशस्वीपणे पूर्ण केल्याची माहिती सहायक वनसंरक्षक राजेंद्र मगदुम यांनी दिली.
या अभियानांतर्गत नाशिक वनविभागाला ८८ लाख १९ हजार ७३६, सामाजिक वनीकरण विभागाला २५ लाख तर वनविकास महामंडळाला १८ लाख ३४ हजार रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट दिले गेले होते. त्यापैकी वनविभागाने ९४ तर वनविकास महामंडळाने ८२ टक्क्यांपर्यंत लागवड पूर्ण केली आहे. तसेच सामाजिक वनीकरण विभाग मात्र पुढे असून या विभागाने उद्दिष्टापेक्षा पुढे जाऊन अद्याप २७ लाख ७८ हजार रोपे लावल्याचा दावा केला आहे.

संततधारेमुळे मिळणार चांगले यश
राज्यातील वृक्षाच्छादित जमिनींचे क्षेत्र वाढावे या उद्देशाने या अभियानाची सुरूवात राज्यस्तरावर केली गेली. याअंतर्गत लावलेल्या रोपांचे मोजमाप आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात केले जाते. यावेळी लावलेल्या रोपांपैकी जीवंत राहिलेल्या रोपांचे निरिक्षण नोंदविले जाते. यंदा पावसाने अचानक दडी मारल्यामुळे अभियान संकटात सापडले होते; मात्र पंधरवड्यापासून समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने पुन्हा वृक्षलागवडीला वेग आला असून हे अभियान यशस्वी होण्याची शक्यताही अधिक वाढली आहे. चांगल्या पावसामुळे लावलेल्या रोपांपैकी जगलेल्या रोपांची संख्याही वाढण्यास मदत होणार असल्याचा आशावाद उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी व्यक्त केला.


Web Title: Closer to target: Speed given by rainfall; Nashik's state level progress in tree planting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.