लाट की परिवर्तन; आज होणार फैसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 12:52 AM2019-10-24T00:52:08+5:302019-10-24T00:53:11+5:30

Maharashtra Assembly Election 2019गेल्या दोन निवडणुकांत भावनेच्या लाटेवर स्वार होऊनच मतदान करणाऱ्या शहरातील मतदारांचा कौल यंदा कोणाला मिळणार याचा फैसला गुरुवारी (दि.२४) होणार आहे. शहरातील चार पैकी तीन मतदारसंघांत दोन्ही वेळा याच पद्धतीने मतदारांनी मतदान केल्याने यंदा पुन्हा लाट की परिवर्तन याचा निर्णयच मतमोजणीत होणार आहे.

 Change of wave; Today will be the decision! | लाट की परिवर्तन; आज होणार फैसला!

लाट की परिवर्तन; आज होणार फैसला!

Next

नाशिक : गेल्या दोन निवडणुकांत भावनेच्या लाटेवर स्वार होऊनच मतदान करणाऱ्या शहरातील मतदारांचा कौल यंदा कोणाला मिळणार याचा फैसला गुरुवारी (दि.२४) होणार आहे. शहरातील चार पैकी तीन मतदारसंघांत दोन्ही वेळा याच पद्धतीने मतदारांनी मतदान केल्याने यंदा पुन्हा लाट की परिवर्तन याचा निर्णयच मतमोजणीत होणार आहे.
नाशिक शहरात नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि देवळाली असे चार मतदारसंघ असून, यंदा सर्वच मतदारसंघांत विशेष चुरस होती. २००९ मध्ये नाशिक शहरातील चार पैकी नाशिक पूर्व, पश्चिम, मध्य या तीन मतदारसंघांवर मनसेने प्रथमच झेंडा फडकावला होता. त्यामुळे प्रस्थापितांना धक्का बसला होता. राज ठाकरे यांच्या नव्या पक्षाच्या भावनेवर नाशिककर स्वार झाले होते. २०१४ मध्ये अशाच प्रकारे मोदी लाटेच्या भावनेवर स्वार होत तिन्ही मतदारसंघांत भाजपाचे तीन आमदार निवडून दिले होते. यंदा भाजपा बरोबरच शेवटच्या टप्प्यात राष्टÑवादीनेदेखील जोरदार प्रयत्न केल्याने लाट की परिवर्तन हे मतदार ठरविणार आहेत.
नाशिक पूर्वमध्ये भाजपामध्ये नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर मनसेतून आलेल्या अ‍ॅड. राहुल ढिकले यांना उमेदवारी देण्यात आली तर उमेदवारी नाकारल्याने बाळासाहेब सानप यांनी राष्टÑवादीचे घड्याळ मनगटावर बांधले. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली. परंतु मतदान झाल्यानंतरदेखील कोणीच या मतदारसंघाविषयी खात्री देऊ शकत नाही. मध्यमध्ये आमदार देवयानी फरांदे यांना उमेदवारी सहज मिळाली. मात्र कॉँग्रेस- राष्टÑवादी आणि मनसे असे उभय पक्षांचे आव्हान उभे ठाकले. त्यातच सर्वच पक्षात  फाटाफूट झाली आहे. त्यामुळे मतदार कोणाला कौल देतात ते महत्त्वाचे आहे.
नाशिक पश्चिम मतदारसंघात यंदा सर्वाधिक राजकीय घडामोडी घडल्या. भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांच्यासमोर मित्रपक्ष शिवसेनेनेच बंड करून आव्हान उभे केले. हा मतदारसंघ शिवसेनेला मिळाला नाही म्हणून पक्षानेच बंडखोर विलास शिंदे यांना पुरस्कृत केले असल्याचे चित्र उभे राहिले. शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी राजीनामा देऊन वापरलेल्या दबावतंत्रानंतर भाजपानेदेखील त्यांच्या भरवशावर न राहता स्वबळावरच निवडणूक लढविली. तथापि, राष्टÑवादीचे उमेदवार डॉ. अपूर्व हिरे यांनी त्यांचीच नव्हे तर सर्वच उमेदवारांची दमछाक केली. त्यातच मनसेने उमेदवार दिलीप दातीर यांच्या उमेदवारीनेदेखील रंगत आणली. त्यामुळे या मतदारसंघातील निकालदेखील लक्षवेधी असणार आहे.
देवळाली मतदारसंघात घोलप कुटुंबीयांपैकी विद्यमान आमदार डॉ. योगेश घोलप यांना तीस वर्षांत प्रथमच तुल्यबळ आव्हान उभे करण्यात विरोधकांना यश मिळाले, असे सांगितले जाते. भाजपाच्या नगरसेविका असलेल्या डॉ. सरोज आहिरे यांनी राष्टÑवादीकडून उमेदवारी करताना बºयापैकी घोलप यांची दमछाक केली. त्यातच ऐनवेळी मनसेत दाखल झालेल्या सिद्धांत मंडाले यांनीदेखील रंगत आणली.
मतदानाची टक्केवारी धडधड वाढविणारी
नाशिक शहरात देवळाली मतदारसंघाचा अपवाद वगळला तर अन्य तीन मतदारसंघांत २०१४ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी काही प्रमाणात घसरली आहे. नाशिक पूर्वमध्ये २०१४ मध्ये ५२.३८ टक्के इतके मतदान होते. यंंदा ते ५०.६६ टक्के इतके झाले. नाशिक पश्चिममध्ये २०१४ मध्ये ५१.७३ टक्के मतदान होेते. यंदा ते ५४.३४ टक्के इतके झाले. नाशिक मध्य मतदारसंघात तर जिल्ह्यात निच्चांकी मतदान झाले. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात ५१.७३ टक्के इतके मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा ४८.४० म्हणजे तीन टक्क्यांनी मतदान कमी झाले आहे. घसरलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार हे गुरुवारी (दि.२४) निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
मतमोजणी कक्षात अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश
मतमोजणीच्या ठिकाणी जाणाºया मतदान प्रतिनिधी आणि माध्यम प्रतिनिधींसाठी निवडणूक शाखेने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगातर्फे अधिकृत प्रवेशिकेवरच प्रवेश दिला जाणार आहे. माध्यम प्रतिनिधींना, मीडिया सेंटर व्यतिरिक्त अन्यत्र मतमोजणी परिसरात कुठेही मोबाइलचा वापर करण्यास सक्त मनाई असणार आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर मीडिया सेंटरमधून माध्यम अधिकारी, समन्वय अधिकारी यांच्यामार्फतच माध्यमांना मतमोजणी केंद्रात गाईडेड टूरसाठी प्रवेश दिला जाईल. माध्यमाच्या प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात जाताना आपले मोबाइल मीडिया सेंटरमध्ये जमा करावे लागणार आहेत.

Web Title:  Change of wave; Today will be the decision!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.