सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 21:22 IST2025-12-07T18:28:43+5:302025-12-07T21:22:45+5:30
सप्तशृंगी गडाच्या घाटातून कार १२०० फूट खोल दरीत कोसळून ६ जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
Saptashrungi Gad Accident: नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर दुर्दैवाने काळाने घाला घातला. सप्तशृंगी गडावरून परतत असताना, गणपती पॉइंटजवळ एक इनोव्हा कार (एमएच १५ बीएन ०५५५) सुमारे १००० ते १२०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील सहा जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे.
या दुर्घटनेत दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश असून, कारमध्ये एकूण सात प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. मात्र, दरीची प्रचंड खोली आणि दुर्गम भाग यामुळे मदतकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
नेमकी दुर्घटना कशी घडली?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भाविक देवीचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर होते. दुपारी गणपती पॉइंटजवळ असताना, चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कारने संरक्षक कठडा तोडला आणि थेट खोल दरीत कोसळली. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून, मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही.
बांधकाम विभागाच्या कामावर ग्रामस्थांची तीव्र नाराजी
या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घाटाच्या काही भागातील संरक्षक भिंतींचे काम अपूर्ण असल्यामुळे हा अपघात घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संरक्षणाची पुरेशी व्यवस्था नसताना या रस्त्यावरून वाहतूक सुरू असल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या भीषण अपघातामुळे सप्तशृंगीगड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत जाहीर
"नाशिक जिल्ह्यात सप्तश्रृंगी गडावरून एक वाहन कोसळून झालेल्या अपघातात सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असून संपूर्ण यंत्रणा तेथे सज्ज ठेवण्यात आली आहे. या भाविकांच्या वारसांना पाच लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य राज्य सरकारच्या वतीने देण्यात येईल," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.