Bitter water filled two water bodies | कडवाच्या पाण्याने दोन जलकुंभ भरले
कडवा धरणातून राबविण्यात आलेल्या सुमारे ८० कोटी रुपयांच्या पाणीयोजनेचे काम पूर्ण झाले असून, या पाण्याने गुरुवारी सायंकाळी उद्योगभवन व शिवाजीनगर येथील दोन जलकुंभ भरण्यात आले.

ठळक मुद्देआजपासून वितरण : महिनाभरात सिन्नरसह उपनगरांना पाणी वितरणाचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : कडवा धरणातून राबविण्यात आलेल्या सुमारे ८० कोटी रुपयांच्या पाणीयोजनेचे काम पूर्ण झाले असून, या पाण्याने गुरुवारी सायंकाळी उद्योगभवन व शिवाजीनगर येथील दोन जलकुंभ भरण्यात आले. या दोन जलकुंभातून शुक्रवारी सकाळपासून पाण्याचे वितरण सुरू केले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, गटनेते हेमंत वाजे यांनी दिली.
गेल्या दोन महिन्यांपासून कडवा धरणातून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणि जलशुद्धीकरणापासून ते शहरातील या दोन जलकुंभांपर्यंत पाणी आणण्याची चाचणी सुरू होती. कोनांबे येथील जलकुंभातून शुद्धीकरण झालेले पाणी गुरुवारी सायंकाळी शिवाजीनगर व उद्योगभवन या जलकुंभात दाखल झाले. जलशुद्धीकरण केंद्रापासून गॅ्रव्हिटीने हे पाणी या जलकुंभांमध्ये आले. शिवाजीनगर येथील पावणेसहा लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ आणि उद्योगभवन येथील साडेबारा लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ या पाण्याने भरण्यात आल्याचे डगळे यांनी सांगितले.
या दोन जलकुंभातून शुक्रवारी सकाळपासून पाण्याचे वितरण करण्यास प्रारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजीनगर येथील जलकुंभ भरण्यास अगोदर ९ तास लागत होते. आता साडेतीन तासात सदर जलकुंभ भरण्यात येतो. तर उद्योगभवन येथील जलकुंभ भरण्यास अगोदर १४ तास लागत होते आता हा जलकुंभ ५ ते ६ तासात भरला जाणार आहे. त्यामुळे या दोन जलकुंभातून ज्या भागांना पाणी जाते अशा भागात दिवसाआड पाणी देण्याचा विचार असल्याचे डगळे यांनी सांगितले.
शिवाजीनगर, उद्योगभवन या दोन जलकुंभातून व्यवस्थित वितरण सुरू झाल्यानंतर येत्या आठ दिवसांत बीपीटी आणि गोंदेश्वर या भागातील जलकुंभात पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचेही नियोजन जमल्यानंतर शहर व उर्वरित भागाला महिनाभरात सुव्यवस्थित वितरण करण्याचे नियोजन असल्याचे डगळे, लोखंडे व वाजे यांनी सांगितले. महिनाभरात पूर्ण क्षमतेने कडवा पाणीयोजना सुरू होऊन सिन्नरकरांना दररोज किंवा दिवसाआड पाणी मिळेल असा आशावाद डगळे यांनी व्यक्त केला.
यावेळी नगरसेवक पंकज मोरे, सोमनाथ पावसे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, विजय जाधव, शैलेश नाईक, मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास, श्रीकांत जाधव, बाळासाहेब उगले, रुपेश मुठे, सुजाता तेलंग, सुजाता भगत, मंगला शिंदे, ज्योती वामने, निरुपमा शिंदे, किरण खाडे यांच्यासह नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.सिन्नर येथील शिवाजीनगर भागातील जलकुंभात कडवा पाणीयोजनेचे पाणी आल्यानंतर पाणीवितरणची माहिती देताना नगराध्यक्ष किरण डगळे. समवेत उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, हेमंत वाजे, व्यंकटेश दूर्वास, प्रमोद चोथवे, विजय जाधव, शैलेश नाईक, सोमनाथ पावसे, पंकज मोरे, श्रीकांत जाधव, बाळासाहेब उगले, रुपेश मुठे, सुजाता तेलंग, सुजाता भगत, मंगला शिंदे, ज्योती वामने, निरुपमा शिंदे, किरण खाडे आदी. अडचणींमुळेच पाणीयोजना सुरू होण्यास विलंबशेतातून जलवाहिनी टाकू देण्यास काही शेतकऱ्यांनी केलेला विरोध, तांत्रिक अडचणी, पेट्रोल पाइपलाइन क्रॉसिंग, वनविभागाची परवानगी, पाणीगळती, जलशुद्धीकरण केंद्रात वीज आणणे, समृद्धी महामार्गाच्या कामामुळे येणाºया अडचणी यामुळे पाणीयोजना सुरू होण्यास विलंब झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महिनाभरात शहरासह सर्व उपनगरात कडवा पाणीयोजनेच्या पाण्याचे वितरण सुरू होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: Bitter water filled two water bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.