Bharveer Jawan Arjun Walunj passes away | भरवीरचे जवान अर्जुन वाळुंज यांचे निधन
भरवीरचे जवान अर्जुन वाळुंज यांचे निधन

नाशिक : चांदवड तालुक्यातील भरवीर येथील सैन्य दलातील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज (२८) यांचे अरुणाचल प्रदेशातील टेंगा येथे निधन झाले. त्यांचा पार्थिव देह भरवीर येथे आणण्यात येणार असून, तेथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अर्जुन यांच्या निधनाचे वृत्त समजताच भरवीर गावावर शोककळा पसरली.
त्यांच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, विवाहित बहीण, पत्नी असा परिवार आहे. अर्जुन यांचे प्राथमिक शिक्षण भरवीर येथे, तर बारावीपर्यंतचे शिक्षण चांदवड येथे झाले आहे. २०१० मध्ये ते लष्करामध्ये दाखल झाले. सहा महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह आसरखेडे येथील उत्तम पाटील गांडुळे यांची कन्या पूनम हिच्याशी झाला. त्यांची नियुक्ती सिलिगुडी विभागातील टेंगा येथे होती. तेथेच त्यांचे निधन झाल्याचे लष्कराच्या सूत्रांनी कळविले आहे.
अर्जुन यांच्या निधनाचे वृत्त कळल्यावर आप्तेष्ट, नातलग घरी येताच अर्जुनच्या आई, वडील व भावाने एकच हंबरडा फोडला. अर्जुन हा अल्पभूधारक शेतकरी प्रभाकर पुंजाजी वाळुंज यांचा मुलगा असून, शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. मुलगा नोकरीस लागल्याने कुटुंबाला मोठा आधार मिळाला होता. अर्जुनच्या अचानक निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


Web Title: Bharveer Jawan Arjun Walunj passes away
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.