खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात
By Admin | Updated: September 13, 2016 00:37 IST2016-09-13T00:34:43+5:302016-09-13T00:37:15+5:30
घोटी - त्र्यंबक रस्ता : प्रशासनाला जाग; नागरिकांमध्ये समाधान

खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात
घोटी : घोटी - त्र्यंबक रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने तसेच या रस्त्यावरून पायी चालणेही अवघड झाल्याने या रस्त्याची दुरु स्ती करावी, अशी मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने सपशेल दुर्लक्ष केल्याने याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच दखल घेत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
घोटी-त्र्यंबक रस्त्यावरील कुर्णोली ते भावलीपर्यंतचा रस्ता वाकी खापरी धरणात गेल्याने पर्यायी रस्त्याची निर्मिती करण्यात आली होती. मात्र हे काम अपूर्ण राहिल्याने या पावसाळ्यात या प्रमुख रस्त्यावर खड्डे पडून हा रस्ता रहदारीसाठी योग्य नव्हता. या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने रस्त्यावरील खड्ड्यात वृक्ष लागवड आंदोलन केले. त्यानंतर पाऊस कमी झाल्याने रस्तादुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विसर पडला होता. (वार्ताहर)