बागलाण तालुक्यात बंदी असतानाही चंदन वृक्षांवर कुऱ्हाडीचे घाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 01:09 AM2021-10-08T01:09:47+5:302021-10-08T01:10:05+5:30

बागलाण तालुक्यातील वनसंवर्धन व्हावे, यासाठी गावागावात चराई बंदी आणि कुऱ्हाड बंदी असतानाही शेतकऱ्यांच्या खासगी क्षेत्रात चंदनवृक्षांची राजरोस कत्तल केली जात आहे; मात्र चालू वर्षात वनक्षेत्रात केवळ एकच घटना घडल्याची नोंद असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Ax wounds on sandalwood trees despite ban in Baglan taluka! | बागलाण तालुक्यात बंदी असतानाही चंदन वृक्षांवर कुऱ्हाडीचे घाव !

बागलाण तालुक्यात बंदी असतानाही चंदन वृक्षांवर कुऱ्हाडीचे घाव !

Next
ठळक मुद्देवन विभागाच्या दप्तरी अवघ्या एका घटनेची नोंद; खासगी क्षेत्रातही कत्तल सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क/ शशिकांत बिरारी

कंधाणे : बागलाण तालुक्यातील वनसंवर्धन व्हावे, यासाठी गावागावात चराई बंदी आणि कुऱ्हाड बंदी असतानाही शेतकऱ्यांच्या खासगी क्षेत्रात चंदनवृक्षांची राजरोस कत्तल केली जात आहे; मात्र चालू वर्षात वनक्षेत्रात केवळ एकच घटना घडल्याची नोंद असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लागवड न करता बऱ्याच शेतकऱ्यांच्या बांधावर जगलेल्या चंदनाच्या झाडांची सात-बाऱ्यावरही नोंद नसल्याने त्यांची जेव्हा चंदन तस्करांकडून कत्तल केली जाते, तेव्हा त्याची दखल वन विभागही घेत नाही आणि पोलीस स्टेशनही तक्रार दाखल होत नसल्याने कारवाई करीत नाही. त्यामुळे तस्करांचे फावत आहे.

 

एकेकाळी व्याघ्र बागलाण म्हणून ओळख असलेला बागलाण तालुका काळाच्या ओघात प्रचंड वृक्षतोडीमुळे आपले गतवैभव गमावून बसला होता .वृक्षतोडीमुळे तालुक्यातील डोंगर उघडेबोडके झाले होते. या डोंगरांना पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यास गावागावातील युवकांचा व नागरिकांचा सिंहाचा वाटा आहे. सध्या तालुक्यात चंदन तस्करांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, रात्रीचा फायदा घेत खासगी क्षेत्रातील चंदनाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात चोरी करण्यात येत आहे. बागलाण तालुक्यातील वनपरिक्षेत्रात चंदनाच्या वृक्षाची लागवड करण्यात आलेली नाही. चंदनाच्या वनऔषध उपयोगामुळे बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात चंदन तस्कर झाडांची कत्तल करून चोरटी वाहतूक करीत आहेत. मागील महिन्यात निकवेल व दहिंदुले शिवारातून चंदनाच्या झाडांची कत्तल करण्याच्या घटना घडल्या आहेत. आजपर्यंत चंदन चोरीच्या फक्त एका घटनेची वनविभागाकडे नोंद झाली असून, या घटनेतील आरोपीही वन विभागास मिळून आलेला नसल्याचे वन विभागाने सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी वर्गाबरोबरच स्थानिक पोलीस प्रशासनाने खांद्याला खांदा लावून या चंदनतस्करांच्या मुसक्या वेळीच आवळल्या नाहीत तर बागलाणमधून चंदनाची झाडे नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

इन्फो...

तालुक्यातील वनक्षेत्र (हेक्टरमध्ये)

सटाणा - ६८१२.७९८

डांगसौदाणे- ४२६०.१३९

विरगाव - ३७००.७९०

केळझर- ६४३८.०२७

एकूण क्षेत्र - २१२११.७५४

 

इन्फो...

 

देखरेखीसाठी कर्मचारी

 

वनपरिक्षेत्र अधिकारी-१

 

वनपाल- २ (एक रिक्त)

वनरक्षक- १२ (एक रिक्त)

एकूण कर्मचारी -१७

 

कोट...

 

तालुक्यातील वृक्षतोड व चंदन चोरीच्या घटनांना आळा बसण्यासाठी वनपाल व वनरक्षक यांच्यामार्फत गस्तीपथक तयार करून चोरटी वृक्षतोडीला पायबंद घालण्यात येईल.

 

- प्रशांत खैरणार, वनपरिक्षेत्र अधिकारी, बागलाण.

 

इन्फो...

कुऱ्हाड बंदीला फासला हरताळ

शासनाच्या व युवकांच्या सहभागातून वनसंवर्धन मोहिमेद्वारे बागलाणमधील अनेक गावांनी स्वयंस्फूर्तीने यात सहभाग नोंदवला. यात गावागावातील नागरिकांना आकर्षित करण्यासाठी संत तुकाराम वनराई पुरस्कार घोषित करून गावागावात चराई बंदी व कुऱ्हाड बंदीची शपथ घेत वनसंवर्धनेचा वसा नागरिकांनी उचलला; पण नव्याचे नऊ दिवस म्हणतात तसेच बऱ्याच ठिकाणी चोरटी लाकूड तोड करणाऱ्या ठेकेदाराकडून या योजनेला हरताळ फासण्यात आला. स्थानिकांना हाताशी धरत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून, खासगी क्षेत्रातील वृक्षांबरोबरच परिक्षेत्रातील वृक्षांनाही लक्ष्य केले जाऊ लागले आहे.

Web Title: Ax wounds on sandalwood trees despite ban in Baglan taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.