तिकीट इच्छुकांची रॅलीत लक्षवेधी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:48 AM2019-09-19T00:48:14+5:302019-09-19T00:48:41+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने निघालेल्या रोड शो मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची धडपड लक्षवेधी ठरली असून, त्यासाठी इच्छुकांनी लढविलेल्या शकला व क्लृप्त्या यात्रेच्या दरम्यान चर्चेच्या ठरल्या.

 Attention of ticket seekers rally at sight | तिकीट इच्छुकांची रॅलीत लक्षवेधी धडपड

तिकीट इच्छुकांची रॅलीत लक्षवेधी धडपड

Next

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने निघालेल्या रोड शो मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची धडपड लक्षवेधी ठरली असून, त्यासाठी इच्छुकांनी लढविलेल्या शकला व क्लृप्त्या यात्रेच्या दरम्यान चर्चेच्या ठरल्या. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी या इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघात शक्तिप्रदर्शनाची कोणतीही संधी सोडली नाही.
नाशिक येथे महाजनादेश यात्रेचा समारोप करण्यात येणार असल्याचे जाहीर झाल्यापासूनच विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी अनेक माध्यमांचा वापर करीत पक्षनेत्यांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. काहींनी यात्रा मार्गाची पाहणी करण्याचा फार्स केला तर काहींनी समारोपाच्या सभास्थळावर अधिकाऱ्यांसह भेटी दिल्या.
त्याचबरोबर विधानसभा मतदारसंघात यात्रा व जाहीर सभेची पत्रके वाटून स्वत:ची छबी घराघरांत पोहोचविली. मुख्यमंत्र्यांचे आगमन होण्यापूर्वी इच्छुकांनी रथाचा ताबा घेऊन जागाही सांभाळली होती. मात्र विशेष पोलीस पथक व बॉम्ब शोधक पथकाने या रथाची तपासणी केली असता, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी सदरचा रथ योग्य नसल्याचा अहवाल दिला.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शहरातील तीनही विधानसभा मतदार संघातून मार्गस्थ झाल्याने त्यांच्या रथावर भाजपाचे महाराष्टÑ प्रभारी भुपेंद्र यादव, पालकमंत्री गिरीष महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप आदी विराजमान झाले होते.
नगरसेवकाकडून असाही सत्कार
सिडकोतून मार्गक्रमण होत असताना वेगवेगळ्या नगरसेवकांनी त्यांच्या भागातील चौकांमध्ये अत्यंत जल्लोषात ढोल-ताशे, फुलांचे मोठे पुष्प क्रेनला बांधलेला हार घालत स्वागत केले. मात्र, भाजपाचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी थेट सिडकोच्या त्रिमूर्ती चौकाच्या अलीकडे स्वत:सह चिरंजिवांना क्रेनमध्ये उभे करून मुख्यमंत्र्यांना हार घालून सत्कार केला. त्यावेळी क्रेनच्या पंजात उभे राहून हार घातला.
शिवसेनेचे नगरसेवक स्वागताला
सिडकोतील सर्व विधानसभा इच्छुक उमेदवार आणि भाजपा नगरसेवकांकडून मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत केले जात असतानाच शिवसेनेच्या एका नगरसेवकानेदेखील मुख्यमंत्र्यांचे सपत्नीक स्वागत केले. युती जाहीर झालेली नसतानाही शिवसेनेचे नगरसेवक दांपत्य सत्काराला तत्पर उभे असल्याने त्याचीदेखील चर्चा झाली.
दोन हजारांहून अधिक बाइकस्वार
महाजनादेश यात्रेच्या अंतिम टप्प्याच्या निमित्ताने बुधवारी नाशकात दाखल झालेल्या मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी सिडकोचे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. सुमारे दोन हजारांहून अधिक बाइकस्वारांच्या उपस्थितीत पाथर्डी फाट्यावरून बाइक रॅलीला प्रारंभ झाला.

Web Title:  Attention of ticket seekers rally at sight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.