Attempts to smash ATMs due to beat marshal | बीट मार्शलमुळे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला
बीट मार्शलमुळे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

नाशिक : गोदाकाठावर वास्तव्य करणाऱ्या एका चोरट्याने रविवार कारंजा येथील पंजाब नॅशनल बॅँकेच्या एटीएममध्ये सोमवारी (दि.१८) मध्यरात्री एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला, गस्तीवर असलेल्या बीट मार्शल पोलिसांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ संशयित सनी रावत (१९) यास बेड्या ठोकल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास येथील एटीएम केंद्रात सनी रावत याने लोखंडी हत्याराने एटीएम यंत्रावर घाव घालण्यास सुरुवात केली. यामुळे यंत्राचा पत्रा कापला केलो, परंतु आतमध्ये असलेल्या रोकडच्या ट्रेपर्यंत त्याला पोहोचता आले नाही. दरम्यान, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे गस्तीवर असलेले बीट मार्शल भगवान गवळी व त्यांच्यासोबत असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांना एटीएममध्ये संशयास्पद हालचाली लक्षात आल्या. त्यामुळे त्यांनी तत्काळ दुचाकी थांबवून एटीएम केंद्राजवळ जात शटर खाली ओढले. यामुळे संशयित सनी गाळ्यात अडकला. पोलिसांनी तत्काळ बिनतारी संदेश यंत्रणेवरून पोलीस ठाण्याला माहिती देत अतिरिक्त पोलिसांची मदत बोलावून घेतली. फौजफाटा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केंद्राच्या परिसरात वाहने उभी करून रस्ता रोखला. पोलिसांनी सनीला तत्काळ ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.

Web Title:  Attempts to smash ATMs due to beat marshal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.