पावसाळी सहलीला जाताय, मग नाशिक जिल्ह्यातील या स्थळांना द्या पसंती

By अझहर शेख | Published: July 17, 2019 06:51 PM2019-07-17T18:51:03+5:302019-07-17T19:06:55+5:30

पावसाळी हंगामातील पर्यटन करताना खबरदारी नक्कीच घ्यायला हवी. यामध्ये प्रामुख्याने घरातून निघण्यापुर्वी आपल्या वाहनांची आवश्यक ती तपासणी गरजेची आहे. ‘वाहन व्यवस्थीत तर जीवन सुरक्षित’ याचा विसर पडू देऊ नये. तसेच पर्यटनस्थळांवर पोहचल्यानंतर विशेषत: धबधबे, घाटमार्ग, धरण परिसरात बेभानपणे वर्तन अजिबात अपेक्षित नाही. प्रत्येकाने स्वयंशिस्त बाळगावी.

After a rainy season, go to these places in your district | पावसाळी सहलीला जाताय, मग नाशिक जिल्ह्यातील या स्थळांना द्या पसंती

पावसाळी सहलीला जाताय, मग नाशिक जिल्ह्यातील या स्थळांना द्या पसंती

googlenewsNext
ठळक मुद्देसुचनाफलकांच्या संदेशाकडे दुर्लक्ष अजिबात करू नये.सेल्फीसाठी आटापिटा नकोआपत्कालीन परिस्थितीकडे दुर्लक्ष करू नका

अझहर शेख, नाशिक : पावसाळा म्हटला की, सगळ्यांनाच निसर्गसौंदर्याची भुरळ पडतेच, मग, पावसाळी सहलीचे बेत मनामनात आखले जाऊ लागतात. पावसाचे वातावरण कोणाला आवडत नाही, अशी अपवादानेही एखादी व्यक्ती सापडणार नाही. पाऊस सर्वांनाच हवाहवासा वाटतो. ‘गदिमां’च्या शब्दांत सांगायचे झाले तर, ‘‘ पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा, पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा...’’

शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाने अद्याप जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे डोंगररांगा हिरवाईने नटल्या असून धरणीने जणू हिरवा शालू पांघरल्याचा भास जिल्ह्यातील आदिवासी तालुके म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ या तालुक्यांसह जवळच्या अहमदनगर जिल्ह्यातील मात्र नाशिकपासून अवघ्या ७० किलोमीटरवर असलेल्या अकोले तालुक्यातील भंडारदरा हा परिसर पावसाळी पर्यटनासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनाकरिता या भागांचा दौऱ्या ‘विकेण्ड प्लॅन’ आखण्यास हरकत नाही.
--

*आपल्या सर्वांच्या आवडीच्या दुधसागर धबधबा
शहरापासून जवळच असलेला व सर्वांच्या आवडीचा दुधसागर धबधबा. गोदावरी खळाळली की, गंगापूर गावाजवळ सोमेश्वर मंदिरापासून पुढे हा धबधबा नाशिककरांना सहज पहावयास मिळतो. या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे दगडी कातळावरून नदीपात्रात कोसळणा-या जलधारांचे नजरेस पडणारे ‘अर्धवर्तुळ’. दुधसागर धबधबा बघितला नाही, अशी नाशिकमधील एखादी व्यक्ती सापडली तर ती अपवादच.
---
* ‘हॉट’ डेस्टिनेशन त्र्यंबकेश्वर
नाशिक पासून अवघ्या ३० कि.मी अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर परिसरात पर्यटक पावसाळ्यात सहलीला गेले नाही तर नवलच. शहराची सातपूर गावापासून पुढील वेस ओलांडल्यानंतर अर्ध्या तासाचा प्रवास पुर्ण होत नाही, तोच निसर्गसौंदर्याकडे मनुष्य आकर्षिला जातो. सह्याद्रीच्या डोंगररांगांना चढलेला हिरवाईचा साज डोंगरावर उतरून आलेले नभ, बरसणा-या सरी फेसाळणारे धबधबे, खळाळून वाहणारे ओहोळ थंड वा-याची झुळूक अशा मनोहारी अल्हाददायक वातावरणाची मोहिनी त्र्यंबकेश्वर भटकंतीदरम्यान न पडल्यास नवलच.

त्र्यंबकेश्वर भटकंती दरम्यान अंजनेरी गावाचा फेरफटका आवर्जून मारावा. तेथून पुन्हा मुख्य रस्त्यावर येत दोन किलोमीटर पुढे घोटी-त्र्यंबक रस्त्याने घाटमार्गाने पेगलवाडी, पहिने गावांच्या परिसराला भेट द्यावी. येथील निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करतो. तसेच तेथून पुन्हा माघारी येत त्र्यंबकेश्वर गाठल्यानंतर परिसरात ब्रम्हगिरी पर्वत, मेटघर किल्ला परिसराचे सौंदर्य न्याहाळावे. तेथून पुढे जव्हार रस्त्याने काही अंतर गेल्यास दुगारवाडी धबधबा बघता येतो. मुख्य रस्त्यावरून डावीकडे वळण घेतल्यानंतर दुगारवाडी धबधब्याकडे जाता येते. जवळच्या गावातून गाईड सोबत घेतल्यास गैरसोय टळते.
---
 इंद्रपुरी अर्थात इगतपुरी
पावसाळ्यात इगतपुरी तालुक्यातील भटकंतीला प्राधान्य दिल्यास निराशा मुळीच होणार नाही. कारण मनसोक्त बरसणा-या पर्जन्यराजाच्या वर्षावात ओलीचिंंब झालेली इंद्रपुरी अर्थात इगतपुरीचे सौंदर्य डोळ्यांची पारणे फेडणारे असेच असते. इगतपुरी गाठताना घोटी टोलनाका सोडल्यानंतर काही मीटर पुढे गेल्यावर डावीकडे भावली धरणाकडे पिंप्री सदोगावामार्गे जावे. मुंबई-नाशिक महामार्गापासून अवघ्या ५कि.मी. अंतर आतमध्ये गेल्यावर जणू आपण खरच इंद्रपुरीत आलो की काय असा भास न झाल्यास नवलचं. पिंप्रीसदो गाव ओलांडताच हिरव्यागार भातशेतीचे दृश्य नजरेस पडते. तसेच हिरवाईने नटलेल्या डोंगररांगाच्या कुशीत ढगांची झालेली गर्दी लक्ष वेधून घेते. थंड वा-याची मंद झुळूक वातावरण मोहून टाकते. पांढ-या शुभ्र जलधारा डोंगररांगावरून ओसंडून वाहताना दिसतात, जणू वरूणराजाचा सह्याद्रीवर होत असलेला हा जलाभिषेकच म्हणावा लागेल.

भावली धरणाच्या परिसरात पोहचताच पहिला धबधबा डाव्या हाताला दिसतो तो म्हणजे ‘गायवझरा’. येथील कोकणी आदिवासी बांधवांनी दिलेले हे नाव. गायवझराचे सौंदर्य अनोखेच आहे. या धबधब्याचा आनंद लुटल्यानंतर वळणावळणाच्या रस्त्यावरून भंडारद-याच्या दिशेने जावे. काही अंतर पुढे गेल्यास एका वळणावर ‘सुपवझरा’ हा धबधबा आपले स्वागत करतो. सुपवझराचा आनंद लूटून झाल्यानंतर पुढे मार्गस्थ व्हावे. काही अंतर चालल्यानंतर डोंगररांगांच्या अगदी जवळ पोहचल्याचा भास होतो. तेथेही उजव्या बाजूला एक ओसंडून वाहणारा मात्र वृक्षराजीमध्ये लपलेला धबधबा पहावयास मिळतो. चारचाकीतून या धबधब्याकडे लक्ष वेधले जात नाही; मात्र पाण्याचा आवाज सहजच कानी पडतो.

---
वणीचा सप्तश्रृंग गड
नाशिकच्या उत्तरेस ६५ कि.मी. अंतरावर ‘सह्याद्री’च्या पूर्व-पश्चिम पर्वत रांगेत समुद्र सपाटीपासून सुमारे ४ हजार ५६९ फुट उंचीवर डोंगर पठारावर हे ठिकाण आहे. येथील निसर्ग सौंदर्य व भक्तीने भारावलेलं वातावरण भाविक व पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आले आहे. सप्तश्रृंग गडाचा परिसर पावसाळ्यात बघण्यासारखा असतो. धुके, हिरवाईचा साज या भागातील सौंदर्य वाढवितो. डोंगरदºयातून गडावर जाणारी वाट नागरिकांचे लक्ष वेधून घेते.
चौहोबाजूंना पसरलेली हिरवळ, डोंगरावरून वाहणारे लहान-मोठे धबधबे आकर्षित करतात. महाराष्टÑात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी श्री सप्तश्रृंगी देवीचे मंदीर अर्धे पीठ मानले जाते. या गडावर देवीचे भव्य मंदिर आहे. देवीची मुर्ती स्वयंभू आहे. गडाच्या पायथ्याचे गाव दरेगाव आहे. वणी गावापासून गडावर सहज चारचाकी, दुचाकी वाहनातून जाता येते. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसदेखील नाशिकवरून गडावर जाण्यासाठी उपलब्ध आहेत. या सर्व बसेस वणीमार्गे जातात. वणीपासून काही अंतरावर नांदूरी गाव लागते. या गावातून गडावर जाण्याचा रस्ता आहे. पायी जाण्यासाठीदेखील भाविक पर्यटक नांदूरी गावातून जाणा-या रस्त्याची निवड करतात. समुद्रसपाटीपासून फूट उंचीवर हे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. गडावर माकडांची संख्या भरपूर आहेत. त्यामुळे सावधानता बाळगावी.

माकडांना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. सप्तशृंग गडाच्या पूर्वेला असलेला मार्कंन्डेय पर्वत, गडाच्या दक्षिणेला असलेले गणेश मंदिर व सतीचा कडा, आजुबाजूला पाण्याने तुडूंब भरलेली धरणे लक्ष वेधून घेतात. गुजरात राज्यातून येणाºया भाविकांना सापूतारा, कनाशी, अभोणामार्गे सप्तशृंग गडावर येता येते. रस्ता रूंद झाल्याने महामंडळाच्या बसेस देखील थेट गडावर जातात.
----
...अशी घ्या खबरदारी
पावसाळी हंगामातील पर्यटन करताना खबरदारी नक्कीच घ्यायला हवी. यामध्ये प्रामुख्याने घरातून निघण्यापुर्वी आपल्या वाहनांची आवश्यक ती तपासणी गरजेची आहे. ‘वाहन व्यवस्थीत तर जीवन सुरक्षित’ याचा विसर पडू देऊ नये. तसेच पर्यटनस्थळांवर पोहचल्यानंतर विशेषत: धबधबे, घाटमार्ग, धरण परिसरात बेभानपणे वर्तन अजिबात अपेक्षित नाही. प्रत्येकाने स्वयंशिस्त बाळगावी. आपल्यामुळे कोणाच्या आनंदावर पाणी फिरणार नाही, याची काळजी घ्यावी. अतिउत्साहीपणा प्रत्येकाने टाळायला हवा. सुचनाफलकांच्या संदेशाकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. पर्यटनस्थळांवर स्वच्छता राखावी, मद्यप्राशनासाठी पावसाळी पर्यटनाचा बेत आखणे धोक्याचे ठरेल.


सेल्फीसाठी आटापिटा नको
जुलै आणि आॅगस्ट हे दोन महिने अर्थात आषाढ अन् श्रावण या मराठी महिन्यांत पावसाळी पर्यटनाची संधी उपलब्ध होणार आहे.पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटताना मद्यप्राशनाचा मोह आवर्जून टाळावा तसेच ‘सेल्फी’ घेण्यासाठी आटापिटा करू नये, जेणेकरून आपली व आपल्या मित्र परिवाराची सुरक्षा धोक्यात येणार नाही. पावसाला सुरूवात झाली असून जुलैच्या दुस-या आठवड्यापासून निसर्गाचे रूपडे पालटलेले दिसून येण्यास सुरूवात होईल. शहराजवळच्या त्र्यंबकेश्वर, भावली, इगतपुरी या भागांत पर्यटनाला जाता येईल.

आपत्कालीन परिस्थितीकडे दुर्लक्ष करू नका
पावसाळी पर्यटनाला बाहेर पडताना सोबत पॉवरबॅँक ठेवावी जेणेकरून मोबाईल बंद पडणार नाही. पर्यटन करताना कोठे काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपल्यासारख्याच त्या पर्यटकांनाही मदतीचा हात द्यावा. मोबाईल नेटवर्क मिळत नसले तरी आपत्कालीन १००, १०१, १०८ हे क्रमांक डायल होतात. त्यावरून निश्चित स्वरूपाची मदत मिळवावी. नेटवर्क असल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. अपघातांच्या घटनांकडे दुर्लक्ष करू नये.
--------
पावसाळी पर्यटनाचा आनंद नागरिकांनी अवश्य लुटावा; मात्र हा आनंद लुटताना आपण बेभानपणे वागणार नाही ना? या प्रश्नाचे उत्तर स्वत:ने स्वत:ला विचारावे आणि त्यानुसार निर्णय घ्यावा. पावसाळी पर्यटनासाठी जाताना बेभान होऊन चालणार नाही. बेभानपणे पर्यटनाच्या नावाखाली केले जाणारे वर्तन निसर्ग, पर्यावरणासह स्वत:च्या जीवालाही घातक ठरणारे आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनात सतर्कता बाळगणे तितकेच गरजेचे.
-नितीनकुमार मुंडावरे, प्रादेशिक व्यवस्थापक, राज्य पर्यटन विकास महामंडळ

Web Title: After a rainy season, go to these places in your district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.