नाशिकमध्ये ५४ वर्षानंतर बरसला डिसेंबरमध्ये सर्वाधिक पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 03:48 PM2021-12-02T15:48:51+5:302021-12-02T15:49:37+5:30

Nashik Rain : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी बुधवारी (दि.१) ऑरेंज ॲलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी पहाटेपासूनच शहराचे हवामान बदलून गेले.

After 54 years, Nashik received maximum rainfall in December | नाशिकमध्ये ५४ वर्षानंतर बरसला डिसेंबरमध्ये सर्वाधिक पाऊस

नाशिकमध्ये ५४ वर्षानंतर बरसला डिसेंबरमध्ये सर्वाधिक पाऊस

googlenewsNext

नाशिक : शहरासह जिल्ह्यात हंगामात जोरदार पर्जन्यवृष्टी होते; मात्र डिसेंबर महिन्यात आतापर्यंत कधी नव्हे इतका ६३.८ मिमी इतका पाऊस या मागील २४ तासांत शहरात पडला आहे. यापूर्वी १९६७ साली ३१ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याकडे होती. त्यापेक्षाही दुप्पट पाऊस यावर्षी पडल्याने नवा विक्रम स्थापित झाला आहे.

दक्षिण-पूर्व अरबी समुद्रासह मालदीव, लक्षद्वीपवर निर्माण झालेली चक्रीय स्थिती व तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात तयार झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे मागील २४ तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्रासह मालदीव, लक्षद्वीपमध्येही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. यामुळे उत्तर, मध्य महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपले. 

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी बुधवारी (दि.१) ऑरेंज ॲलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी पहाटेपासूनच शहराचे हवामान बदलून गेले. बुधवारी पहाटेपासून गुरुवारी (दि.२) सकाळपर्यंत शहरात मध्यम तर कधी दमदार सरींची संततधार सुरु होती. यामुळे मागील ५४ वर्षांत प्रथमच यावर्षी डिसेंबरच्या प्रारंभीच ६३.८मिमी इतका विक्रमी पाऊस झाला.

१९६७ साली डिसेंबर महिन्यात ३१ मिमी इतका पाऊस पडला होता. तेव्हापासून आजतागायत कधी नव्हे इतका गेल्या २४ तासांत ६३.८ मिमी पाऊस पडला. डिसेंबर महिन्यातील पर्जन्यमानाच्या या नव्या विक्रमाची हवामान खात्याकडून नोंद करण्यात आली आहे. मागील ५४ वर्षांमधील डिसेंबर महिन्यातील पर्जन्यमानाचे सर्व विक्रम यंदा मोडित निघाले आहे. 

१९६७ साली डिसेंबरमहिन्याअखेर ९७.४ मिमी इतका पाऊस झाल्याची उच्चांकी नोंद आहे. अद्याप डिसेंबर महिना संपूर्ण जायचा असून पुढे अजून जर अवकाळी पाऊस बरसला तर कदाचित हा देखील विक्रम मोडित निघण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे.

Web Title: After 54 years, Nashik received maximum rainfall in December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.