जिल्ह्यातील १४३१ बालके झाली वर्षभरात कुपोषण मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 01:37 AM2021-05-08T01:37:38+5:302021-05-08T01:38:36+5:30

गेल्या चौदा महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर कामाचा अतिरिक्त ताण पडून शहरी भागासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालेले असताना, नाशिक जिल्हा परिषदेने आदिवासी आणि दुर्गम भागातील कुपोषित बालकांच्या आरोग्याची व पोषण आहाराची घेतलेल्या काळजीने सुमारे १,४३१ बालके कुपोषण मुक्त झाले आहेत. 

1431 children in the district became malnutrition free throughout the year | जिल्ह्यातील १४३१ बालके झाली वर्षभरात कुपोषण मुक्त

जिल्ह्यातील १४३१ बालके झाली वर्षभरात कुपोषण मुक्त

Next
ठळक मुद्देकोरोनाकाळातील उपक्रम : जिल्हा परिषद यशस्वी

नाशिक : गेल्या चौदा महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर कामाचा अतिरिक्त ताण पडून शहरी भागासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालेले असताना, नाशिक जिल्हा परिषदेने आदिवासी आणि दुर्गम भागातील कुपोषित बालकांच्या आरोग्याची व पोषण आहाराची घेतलेल्या काळजीने सुमारे १,४३१ बालके कुपोषण मुक्त झाले आहेत. 
कुपोषणमुक्तीसाठी राबविण्यात आलेल्या या उपाययोजनांचा नाशिक पॅटर्न यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने मार्च, २०२० मध्ये मासिक बैठकीत घेतलेल्या आढाव्यात जिल्ह्यात ३,४०७ मध्यम गंभीर कुपोषित बालके  होती, तर ९१० तीव्र गंभीर कुपोषित बालके होती. त्यात प्रामुख्याने पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, बागलाण, सिन्नर, निफाड या तालुक्यातील दुर्गम व मागास भागातील  बालकांचा समावेश होता. 
मार्च महिन्यात काेरोनामुळे देशभर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर या कुपोषित बालकांच्या आरोग्याचा व पोषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कुपोषित बालके हे ग्रामीण भागातील गरीब जनतेची असल्याने अशा कुटुंबाच्याच उदरनिर्वाहाचा लॉकडाऊनमुळे प्रश्न निर्माण झालेला असताना, बालकांच्या पाेषणाचा प्रश्न गंभीर झाला. 
त्यातच अंगणवाड्या 
बंद करण्यात येऊन अंगणवाडीसेविकांनीही जिवाच्या भीतीने ग्रासले होते, परंतु महिन्यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत सर्व अंगणवाडीच्या बालकांना घरीच पोषण आहार पुरविण्याचा निर्णय घेण्यात येऊन अंगणवाडीसेविकांच्या मार्फत ते वाटप करण्यात आले. 
एवढेच नव्हे, तर महिन्यातून दोन ते तीन वेळा कुपोषित बालकांच्या घरभेटी देऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्याबरोबरच पोषण आहार वेळेवर दिला जातो की नाही, याचीही खातरजमा करण्यात आली. याच काळात जिल्हा परिषदेने एक मूठ पोषण आहार योजना राबवून ग्रामपंचायतींच्या माध्यमातून 
कुपोषित बालकांना पोषण आहार देण्यास सुरुवात केली. परिणामी, कुपोषणाच्या प्रमाणात कमालीची घट झाली. 
असा आहे नाशिक पॅटर्न 
कुपोषण मुक्तीच्या पॅटर्नमध्ये नाशिक जिल्हा परिषदेने कोरोना काळात घरोघरी जाऊन बालकांना नियमित गरम ताजा पोषण आहार, अमृत आहार, तसेच पोषणकल्पवडी व मायक्रोन्युट्रीएंट हा अतिरिक्त आहार वाटप केला होता. ग्रामपंचायतींवर गावातील कुपोषित बालकांची जबाबदारी सोपवून एक मूठ पोषण आहार ही अभिनव योजना राबविण्यात आली आहे.
कुपोषणाचा आढावा
nमहिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अश्विनी आहेर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या मासिक बैठकीत गेल्या वर्षाच्या तुलनेत कुपोषणाचा आढावा घेतला असता, जिल्ह्यात मध्यम गंभीर कुपोषीत बालकांची संख्या २,४१४ इतकी तर तीव्र गंभीर बालकांची संख्या ३७२ इतकीच असल्याचे निदर्शनास आली आहे.  गेल्या वर्षाच्या तुलनेत मध्यम गंभीर बालकांच्या संख्येत ९९३ने तर तीव्र गंभीर बालकांमध्ये ४३८ने संख्या कमी झाली आहे. 

Web Title: 1431 children in the district became malnutrition free throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.