वर्ढे टेंभे येथे विहिरीत पडलेला बिबट्या सुखरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:47 PM2020-02-22T12:47:57+5:302020-02-22T12:48:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील वर्ढे टेंभे येथे भक्ष्याचा पाठलाग करीत असताना अडीच ते तीन वर्षे वयाचा बिबट्या ...

Pupils in the well at Wardhe Tambhe are safe | वर्ढे टेंभे येथे विहिरीत पडलेला बिबट्या सुखरुप

वर्ढे टेंभे येथे विहिरीत पडलेला बिबट्या सुखरुप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील वर्ढे टेंभे येथे भक्ष्याचा पाठलाग करीत असताना अडीच ते तीन वर्षे वयाचा बिबट्या विहिरीत पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुखरूप जेरबंद केले असून दोंडाईचा रस्त्यावरील वनविभागाच्या कार्यालयात ठेवले आहे. विहिरीत पडलेला बिबट्या व त्याचा भक्ष्य असलेला कुत्रा दोघांनाही वाचविण्यात यश आले आहे. बिबट्या व कुत्र्यामध्ये सुमारे दोन ते अडीच तास सुरू असलेल्या द्वंद्वात कुत्र्याच्या भुंकण्यामुळे व बिबट्याच्या डरकाळ्यांंनी परिसर दणाणून गेला होता.
शुक्रवारी सकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान वर्ढे टेंभे गावातील ग्रामपंचायत कार्यालयनजीकच्या जुन्या व कोरड्या विहिरीत कुत्र्याचा पाठलाग करीत असताना बिबट्या पडल्याची घटना घडली. सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान या विहिरीजवळील वसाहतीतील नागरिकांना कुत्र्याचे भुंकणे व डरकाळ्या ऐकू आल्याने ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली असता ३५ ते ४० फूट खोल असलेल्या विहिरीत बिबट्या आढळून आल्यानंतर त्यांनी या घटनेची खबर वनविभागाला दिली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनक्षेत्रपाल अनिल पवार, वनपाल एस.एस. इंदवे, एस.एस. देसले, वनरक्षक प्रवीण वाघ, संतोष राठोड, एस.जी. मुकाडे, आर.ए. ठाकरे, के.एम. पावरा, वाय.बी. पिंजारी, जी.आर. वसावे, आर.झेड. पावरा, वाहन चालक आबा न्याहळदे, नईम मिर्झा, एस.जे. वाघ यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक असलेल्या पिंंजऱ्यासह धाव घेतली. तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील नाना पाटील यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी उपस्थित होत त्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले.
गावातील विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती मिळाल्याने आजूबाजूच्या खेड्यांवरील शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. गर्दीला नियंत्रित करण्यासह बिबट्याला सुरक्षित जेरबंद करण्याचे आव्हान पोलीस व वनविभागासमोर होते. बिबट्याच्या डरकाळ्या व नागरिकांची आरडाओरड यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस विभागाला यावेळेस उपस्थित नागरिकांना सौम्य लाठीमार करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाºयांनी पिंजरा विहिरीत सोडला. त्यानंतर अर्ध्या तासाच्या कालावधीनंतर बिबट्या पिंजºयात अडकला. बिबट्या सुरक्षितरित्या पिंजºयात जेरबंद झाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाºयांनी पिंजरा विहिरीबाहेर काढला व बिबट्याला विभागाच्या दोंडाईचा रस्त्यावरील कार्यालयात आणले. सध्या बिबट्या सुरक्षित असून त्याला वरिष्ठांच्या सूचनेनुसार सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक एस.बी. केवटे व सहायक उपवनसंरक्षक आर.एच. झगडे यांनी दिली.
बिबट्याला सुरक्षित जेरबंद केल्यानंतर या परिसरात गेल्या काही दिवसांपासून तीन ते चार बिबट्यांचा संचार असल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. या माहितीनंतर वनविभागाने परिसरातील बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

Web Title: Pupils in the well at Wardhe Tambhe are safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.