‘बर्ड फ्लू’चा कहर; दहा लाख कोंबड्या मारणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 02:39 AM2021-02-09T02:39:35+5:302021-02-09T02:39:54+5:30

नवापूरमध्ये ५० कोटींचे नुकसान

One million hens to be killedi in nandurbar | ‘बर्ड फ्लू’चा कहर; दहा लाख कोंबड्या मारणार!

‘बर्ड फ्लू’चा कहर; दहा लाख कोंबड्या मारणार!

Next

- रमाकांत पाटील

नंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या नवापुरात १५ वर्षांनंतर पुन्हा दुसऱ्यांदा बर्ड फ्लू पक्ष्यांवरील संसर्गजन्य साथ पसरली आहे. या साथीमुळे  नवापूर व परिसरातील १० लाख कोंबड्या  शास्रोक्त पद्धतीने नष्ट करून त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या साथीमुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे सुमारे ५० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. धुळे आणि  जळगावत जिल्ह्यातही या आजाराचे काही प्रमाणात लोण पसरले आहे.

नवापूर येथे पोल्ट्री व्यावसायिकांसाठी अनुकूल वातावरण असल्याने माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांनी प्रोत्साहन दिले. तीन दशकांपासून येथे माेठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू आहे. मात्र २००६ मध्ये देशात पहिल्यांदाच येथे बर्ड फ्लूची साथ आली. त्यावेळी तब्बल पाच लाख पक्षी नष्ट करण्यात आले होते. शासनाने व्यावसायिकांना २० कोटींची मदत दिली होती. त्या आजारातून सावरण्यास या व्यवसायाला दाेन वर्षे लागली होती. पुन्हा नव्याने हा व्यवसाय उभारीस आला. तेव्हापेक्षा पोल्ट्री व्यावसायिकांची संख्या कमी झाली. पण कोंबड्यांची संख्या मात्र २००६च्या तुलनेत आता दुप्पट झाली आहे. 

हरियाणा कनेक्शन 
शासकीय सर्वेक्षणानुसार या नुकसानीचा अंदाज ३० कोटीपर्यंत आहे. त्यासंदर्भात सूक्ष्म सर्वेक्षणही सुरू आहे. या परिसरात फेरफटका मारल्यानंतर या आजाराचे हरियाणा कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. एका पोल्ट्री व्यावसायिकाने हरियाणात अतिशय स्वस्तदरात पक्षी मिळाल्याने डिसेंबरमध्ये २० हजार पक्षी आणले होते. मात्र हे पक्षी आजारी होते. 

पोल्ट्री धारकांना २००९ नुसार भरपाई दिली जाते. त्यात साधारणपणे ९० रुपये प्रति पक्षी  दिले जातात. मात्र, प्रत्यक्षात तीन ते चारपटीने खर्च झाला आहे, पशुखाद्याचे दरही खूप आहेत. ही मदत खूपच कमी असल्याने पोल्ट्री धारक पुन्हा उभाच राहू शकत नाही.
- अरीफभाई बलेसरिया, अध्यक्ष, पोल्ट्री असोसिएशन, नवापूर

बर्ड फ्लूबाबत २००६ च्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहेत. पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- डॉ. राजेंद्र भारुड,
जिल्हाधिकारी, नंदुरबार

धुळे : बर्ड फ्लूचा शिरकाव
धुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मेहेरगावच्या एक किलोमीटरपर्यंतचा भाग बाधित क्षेत्र, तर १० किलोमीटरचा परिसर हा निगराणीक्षेत्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तालुकानिहाय समितींचे गठन करण्यात आले आहे, तर दोन पोल्ट्रीफार्म सील केले आहेत. २,४७५ पक्षी रविवारी नष्ट केले.

Web Title: One million hens to be killedi in nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.