अंत्यसंस्काराबाबत जिल्हा रुग्णालय व प्रशासनात समन्वयाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 12:23 PM2020-05-31T12:23:46+5:302020-05-31T12:24:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील हिंगणी येथील ५१ वर्षीय ग्रामस्थाचा दुसरा रिपोर्ट येण्यापूर्वी तो मयत झाल्याने त्याचे पार्थिव ...

 Lack of coordination between district hospital and administration regarding funeral | अंत्यसंस्काराबाबत जिल्हा रुग्णालय व प्रशासनात समन्वयाचा अभाव

अंत्यसंस्काराबाबत जिल्हा रुग्णालय व प्रशासनात समन्वयाचा अभाव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील हिंगणी येथील ५१ वर्षीय ग्रामस्थाचा दुसरा रिपोर्ट येण्यापूर्वी तो मयत झाल्याने त्याचे पार्थिव कुटुंबीयांकडे देण्याऐवजी त्याच्यावर कोविड-१९ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंत्यसंस्कार करणे आवश्यक असताना तसे झाले नाही. परिणामी सदर मयताच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व नातेवाईकांनी गर्दी केली होती. मात्र दोन दिवसानंतर संबंधित मयत हा कोरोना विषाणू बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालय व शहाद्यातील प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोना विषाणू बाधित अथवा संशयित रुग्णाचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वी संबंधित रुग्ण हा मयत झाल्यास त्यास कोवीड-१९ मधील मार्गदर्शक तत्व केंद्र शासनाचे नियम व जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनांनुसार शासकीय अधिकाऱ्यांनी मयताच्या मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचे स्पष्ट आदेश असून मार्गदर्शक तत्व आहे. मात्र हिंगणी येथील घटनेत याकडे दुर्लक्ष झाल्याने अथवा जिल्हा रुग्णालय व शहाद्याचे प्रांताधिकारी तथा इंसिडेन्स कमांडर यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने हा प्रकार घडला आहे.
काही दिवसांपूर्वी लांबोळा, ता.शहादा येथे एक महिला मयत झाली होती. ही महिला संशयीत असल्याची शंका जिल्हा रुग्णालय व स्थानिक प्रशासनाला असल्याने तिच्या घशातील स्वॅबचे नमुने घेतले होते. दुर्दैवाने तिचा अहवाल येण्यापूर्वी ती मयत झाल्याने तिच्या पार्थिवावर शासकीय नियमानुसार कोवीड-१९ मधील मार्गदर्शक तत्त्वानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे या मयत महिलेवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिचा अहवाल हा निगेटीव्ह आला होता. मात्र हिंगणी येथील मयताचा पहिला अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर प्रशासनाला शंका आल्याने प्रशासनाने त्या नागरिकाचा मृत्यू होण्यापूर्वी दुसऱ्यांदा घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. या दुसºया नमुन्यांचा अहवाल येण्यापूर्वी दुर्दैवाने तो इसम मयत झाला.
संबंधित इसम मयत झाल्यानंतर व त्याचप्रमाणे त्याचा अहवाल प्रतीक्षेत असल्याने जिल्हा रुग्णालय व स्थानिक प्रशासनाने मयताचे पार्थिव कुटुंबीय व नातेवाईक यांच्या ताब्यात देण्याऐवजी शासकीय नियमानुसार त्यावर अंत्यसंस्कार करणे गरजेचे होते. जिल्हा रुग्णालयाने याबाबत स्थानिक प्रशासनाला कळविणे आवश्यक असताना असे झाले नाही अथवा यासंदर्भात शहादा येथील स्थानिक प्रशासनाशी कुठलीही चर्चा केली नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने या मयताचे पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्यावर हिंगणी येथे नातेवाईक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुसºया दिवशी रात्री उशिरा संबंधित मयत हा कोरोना विषाणू बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ग्रामस्थांसह प्रशासनामध्ये खळबळ उडाली. प्रशासनाने मयताच्या संपर्कातील २८ नागरिकांना होम क्वारंटाईन केले असून त्यांच्या घशातील नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
असाच काहीसा प्रकार शहादा शहरातील गरीब-नवाज कॉलनीत आढळलेल्या ६२ वर्षीय कोरोना बाधित रुग्णासंदर्भात घडला आहे. या रुग्णांचा अहवाल आल्यानंतर प्रशासनाने त्याच्या कुटुंबियासह संपर्कातील नागरिकांची शोधमोहीम सुरू केली. यात कुटुंबियातील नऊ व सदर इसमाने ज्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते तेथील डॉक्टरांसह सात कर्मचाºयांना होम क्वारंटाईन केले असून त्यांचे नमुने घेतले आहेत. प्रशासनाने या दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील एकूण ४४ जणांचे नमुने घेतले असले तरी जिल्हा रुग्णालयाने यातील फक्त १५ नागरिकांचे नमुने तपासणीसाठी स्वीकारले आहेत, असे का घडले? जिल्हा रुग्णालयाने ४४ पैकी १५ नमुने का स्वीकारले असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. एकंदरीत या दोन घटनांवरून जिल्हा रुग्णालय व शहादा येथील इन्सिडेंट कमांडर स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने कोरोना विषाणूमुक्त असलेल्या तालुक्यात पुन्हा कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्याने संपूर्ण तालुक्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. लांबोळा येथील घटनेबाबत जी खबरदारी प्रशासनाने बाळगली ती हिंगणी येथील घटनेबाबत का नाही याची चौकशी आता जिल्हा प्रशासनाने करण्याची गरज आहे.

सिव्हील हॉस्पिटलकडून हिंगणी येथील नागरिक मयत झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाशी कोणतीही चर्चा न करता रुग्णालय प्रशासनाने संबंधित मयताच्या नातेवाईकांना शव देण्यात आले. चर्चा झाली असती तर लांबोळा येथील महिलेप्रमाणे आपण स्वत: उपस्थित राहून अंत्यसंस्कार केला असता. हिंगणी व शहादा येथील कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या संपर्कातील ४४ व्यक्तींचे स्वॅब नमुने चाचणीसाठी पाठवले पण फक्त १५ नागरिकांचे नमुने घेण्यात आले आहेत.
-डॉ.चेतन गिरासे, प्रांताधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर, शहादा.

Web Title:  Lack of coordination between district hospital and administration regarding funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.