मुंबईहून कोरोना पोहोचला तोरणमाळला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 01:19 PM2020-08-07T13:19:22+5:302020-08-07T13:19:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : धडगाव तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे मुंबईहून ...

Corona reached Toranmal from Mumbai ... | मुंबईहून कोरोना पोहोचला तोरणमाळला...

मुंबईहून कोरोना पोहोचला तोरणमाळला...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : धडगाव तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे मुंबईहून कोरोना पोहोचून एका ३५ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल धुळे येथे पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. सुरूवातीला शहरी भागात असलेला आता हा संसर्ग ग्रामीण भागात पोहोचू लागल्याने चिंता वाढत आहे. त्यातच आदिवासी दुर्गम-अतिदुर्गम भागात याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले तोरणमाळ येथे पर्यटकांची गर्दी वाढू नये यासाठी ग्रामपंचायतीने तोरणमाळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण असून निसर्ग सौंदर्य असून पावसाळ्यात या भागातील सौंदर्य मोठ्या प्रमाणावर खुलते. याठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. लॉकडाऊन असल्याने कंटाळवाणा झालेले नागरिक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येथे गर्दी करीत होते. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव होण्याची भीती व्यक्त केली जात होती. यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीने तोरणमाळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला व सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले राणीपूर येथेच पर्यटकांना येण्यास बंदी घातली होती. परंतु तोरणमाळ हा अतिदुर्गम भाग कोरोनापासून लांब असताना अचानक तोरणमाळला मुंबईहून आलेले जावई व मुलगीच धुळे येथे पॉझिटीव्ह निघाल्याने त्यांच्या संपर्कात आलेली तोरणमाळ येथील एका हॉटेल व्यावसायिक ३५ वर्षीय महिलेला त्रास जाणवू लागल्याने भीतीपोटी त्यांना धुळे येथे घेऊन जाण्यात आले. त्यांचा कोरोना अहवाल ५ आॅगस्ट रोजी धुळे येथे पॉझिटीव्ह आल्याने तोरणमाळ येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्या ३५ वर्षीय महिलेच्या जवळील एकूण १६ जणांचे स्वब तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. उर्वरित संपर्कात आलेल्यांची माहिती गोळा करून त्याना होम क्वारंटाईन करण्यात येत असून तोरणमाळ कंटेनमेन्ट झोन तसेच बफर झोन करण्यात आले आहे. याठिकाणी तहसीलदार तथा इनसिडेंट कमांडर सपकाळे, धडगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश बडे यांच्या मार्गदर्शनाखाली झापी प्राथमिक आरोग्य केंद्राचे परमांत रावले, मालती ठाकरे व आरोग्य कर्मचारी जवळील पाड्यांवर सर्वेक्षण करीत असून विविध उपाययोजना करीत आहेत.
तोरणमाळ १४ दिवस लॉकडाऊन
तोरणमाळ येथील ३५ वर्षीय महिलेचा अहवाल धुळे येथे पॉझिटीव्ह आल्याने तोरणमाळ येथे खळबळ उडाली असून तोरणमाळ हे १४ दिवस लॉकडाऊन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Corona reached Toranmal from Mumbai ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.