हॉर्न वाजवून, इमर्जन्सी ब्रेक लावले तरीही वाचू शकले नाहीत मजूर; जाणून घ्या कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 05:01 PM2020-05-08T17:01:39+5:302020-05-08T17:06:01+5:30

कोणतीही गाडी सिंग्नलनूसार धावत असते़ लाल रंगाचे सिंग्नल दिलेले असेल तर गाडी एअरब्रेकच्या आधारे थांबविण्याचे काम लोकोपायलट करीत असतो़ परंतु, हिरवे सिंग्नल असेल तर गाडीचे ब्रेक लावले जावू शकत नाही़ 

The workers could not alive even after sounding the horn and applying the emergency brake; Know the reason | हॉर्न वाजवून, इमर्जन्सी ब्रेक लावले तरीही वाचू शकले नाहीत मजूर; जाणून घ्या कारण

हॉर्न वाजवून, इमर्जन्सी ब्रेक लावले तरीही वाचू शकले नाहीत मजूर; जाणून घ्या कारण

googlenewsNext
ठळक मुद्देविभागीय रेल्वे व्यवस्थापकासह अधिकारी, डॉक्टर घटनास्थळीराज्य पोलिस करतेय अपघाताचा तपास इमर्जन्सी ब्रेकनंतरही विशेष अंतरावर थांबते रेल्वे

- श्रीनिवास भोसले

नांदेड : हैदराबाद येथून मनमाडकडे जाणाऱ्या मालगाडीच्या खाली चिरडून पंधरा मजूरांचा मृत्यू झाला़ हे सर्व मजूर रेल्वे पटरीवर झोपलेले होते़ ही बाब लोकोपायलट अन् गार्डच्या लक्षात आली़ त्यानंतर त्याने हॉर्न वाजवून इमर्जन्सी ब्रेकही दाबले़ परंतु, ब्रेकींग डिस्टन्स न मिळाल्याने रूळावर झोपलेले मजूर चिरडल्या गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांना ‘लोकमत’ला दिली़

जालना येथील कंपनीत काम करणारे उत्तरप्रदेशातील मजूर लॉकडाऊनमुळे रेल्वे पटरीने आपल्या गावी निघाले होते़ परंतु, त्यांच्यावर शुक्रवारी पहाटे काळाने त्यांच्यावर घाला घातला़ अपघाताची माहिती मिळताच दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक उपिंदर सिंग आणि त्यांच्या सर्व टिमने घटनास्थळाकडे धाव घेतली़ यासंदर्भात विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सटाणा शिवारात झालेल्या मालगाडी अपघातात १४ मजूरांचा जागीच मृत्यू झाला आहे़ तर दवाखान्यात घेवून जाताना दोन मजुरांचा मृत्यू झाला, एका जखमीस औरंगाबादच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे़ घटनास्थळी राज्य पोलिस दलाचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी तत्काळ हजर झाले असून पुढील तपास राज्य पोलिस करीत असल्याचे उपिंदर सिंग यांनी सांगितले़

अपघात झालेली गाडी हैदराबादकडून मनमाडकडे जात होती़ गाडीमध्ये कोणताही माल नव्हता़ पटरीवर काहीतरी असल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने तत्काळ हॉर्न वाजवून इमर्जन्सी ब्रेकही लावले़ परंतु,  आवश्यक ब्रेकींग डिस्टन्सच्या अगोदर गाडी थांबू शकत नाही़ त्यामुळे रेल्वे रूळावर झोपलेले मजूर  गाडी थांबण्याच्या स्थितीत असताना चिरडून मरण पावले, असा प्राथमिक अंदाज असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी सांगितले़  इतर  मजूर हे ट्रॅकच्या बाजूला झोपले होते़ त्यामुळे त्यांचा प्राण वाचला़ हा आत्महत्येचा प्रयत्न वाटत नाही़ अन्यथा इतर लोकांचाही मृत्यू झाला असता़ त्यामुळे हा अपघातच असल्याचे प्रथमदर्शी दिसून येत असल्याचेही सिंग यांनी सांगितले़ या घटनेचा तपास राज्य पोलीस करीत असून इतर सविस्तर माहिती तपासाअंती पुढे येईल, असे त्यांनी सांगितले़

इमर्जन्सी ब्रेकनंतरही विशेष अंतरावर थांबते रेल्वे
मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांमधील वजनानूसार त्या गाड्या ठराविक स्पीडने धावतात़ परंतु, आपत्कालिन परिस्थितीमध्ये गाडीसमोर कोणी आले, पटरी अथवा गाडीत काही खराबी आढळून आल्यास लोकोपायलट इमर्जन्सी ब्रेक लावू शकतो़ परंतु, इमर्जन्सी ब्रेक लावल्यानंतरही गाडी ८०० ते १२०० मिटर अंतरावर जावून थांबते़  सदर घटनेत रूळावर काही तरी आहे हे लक्षात आल्यानंतर लोकोपायलटने ब्रेक लावले़ पण, आवश्यक अंतर (ब्रेकिंग डिस्टन्स) न मिळाल्यानेच १५ मजूरांचा चिरडून मृत्यू झाल्याचा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे़

अपघातग्रस्त गाडी धावत होती रिकामी़़़
अत्यावश्यक वस्तू अन्नधान्य, खते, बियाणे, कोळसा, भाजीपाला, दुध, शेतमाल यासह जीवनावश्यक वस्तू घेवून भारतीय रेल्वेमध्ये मालवाहतूक सेवा सुरू आहे़ याकरीता सर्व रेल्वे स्थानकावरील आणि नियंत्रण कार्यालयातील कामकाजही सुरू आहे़ दरम्यान, अपघातग्रस्त रेल्वे हैदराबादकडून मनमाडकडे रिकामी कशासाठी धावत होती, ही बाब तपासानंतरच पुढे येईल़  

लोकोपायलट ब्रेक कधी लावू शकतो?
कोणतीही गाडी सिंग्नलनूसार धावत असते़ लाल रंगाचे सिंग्नल दिलेले असेल तर गाडी एअरब्रेकच्या आधारे थांबविण्याचे काम लोकोपायलट करीत असतो़ परंतु, हिरवे सिंग्नल असेल तर गाडीचे ब्रेक लावले जावू शकत नाही़ त्यात जर गाडीच्या गार्डने लाल झेंडी दाखविली तर लोकोपायलट ब्रेक लावू शकतो़ तसेच आपत्कालिन परिस्थितीत ब्रेक लावण्याचा अधिकारदेखील लोकोपायलटला असतो़

Web Title: The workers could not alive even after sounding the horn and applying the emergency brake; Know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.