नांदेडात वंचित आघाडीने रोखली काँग्रेसची घोडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 06:21 PM2019-05-25T18:21:11+5:302019-05-25T18:31:56+5:30

अशोक चव्हाण विरूद्ध मोदी लढतीत प्रताप पाटील चिखलीकरांचा विजय

Vanchit Bahujan Aghadi breaks congress lead in Nanded Lok sabha election | नांदेडात वंचित आघाडीने रोखली काँग्रेसची घोडदौड

नांदेडात वंचित आघाडीने रोखली काँग्रेसची घोडदौड

googlenewsNext
ठळक मुद्देअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि बॅ. असदोद्दीन ओवेसी यांच्या पहिल्या सभे पासून मत विभाजन काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांबद्दल सर्वसामान्यांत असलेली नाराजीही पक्षाला भोवली

- विशाल सोनटक्के

नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा ४० हजार मतांच्या फरकाने धक्कादायक पराभव झाला. वंचित बहुजन आघाडीने १ लाख ६६ हजारांपर्यंत मारलेली मुसंडी यास प्रामुख्याने कारणीभूत ठरली. दुसरीकडे काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांबद्दल सर्वसामान्यांत असलेली नाराजीही पक्षाला भोवल्याचे दिसून येते.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात मोदी लाट असतानाही अशोक चव्हाण हे तब्बल ८१ हजारांहून अधिकच्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळेच या निवडणुकीतही चव्हाण पुन्हा विजयी होतील, असा कयास बांधला जात होता. मात्र वंचित बहुजन आघाडीने नांदेडमध्ये कमालीचा जोर लावला. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि बॅ. असदोद्दीन ओवेसी यांच्या पहिल्या सभेला नांदेडमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. येथूनच मतांच्या ध्रुवीकरणास सुरुवात झाली.  

महानगरपालिकेसह जिल्हा परिषद आणि इतर महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था नांदेडमध्ये काँग्रेसच्या ताब्यात आहेत. जिल्ह्यातील काँग्रेसच्या दुसऱ्या फळीबद्दल असलेली नाराजीही चव्हाण यांना भोवल्याची उघड चर्चा  आता सुरु आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीमुळे दलितांबरोबरच मुस्लिम आणि धनगर मतांचे काही प्रमाणात झालेले ध्रुवीकरण, त्यातच मराठा मते भाजपाकडे वळविण्यासाठी चिखलीकर यांनी आखलेली रणनिती यशस्वी झाल्याचे दिसते.  

काँग्रेसच्या निवडणूक प्रचारासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह गुलाम नबी आझाद, शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासह मातब्बर नेत्यांनी नांदेडमध्ये प्रचारसभा घेतल्या. या प्रचारात टिकेचा रोख भाजपा आणि नरेंद्र मोदी असा होता. राज ठाकरे यांच्या नांदेडमध्ये झालेल्या पूर्ण सभेतही नरेंद्र मोदी आणि भाजपा हेच टार्गेट राहिले. त्यामुळे आपसूकच ही निवडणूक अशोक चव्हाण  विरुद्ध  भाजपा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर अशी न राहता अशोक चव्हाण विरुद्ध नरेंद्र मोदी अशी झाली. यामुळे चिखलीकर यांचे काम सोपे झाले. मोदी विरुद्ध चव्हाण अशीच लढत व्हावी, यादृष्टीने भाजपनेही प्रयत्न केले. नांदेडमध्ये चिखलीकर यांनी चव्हाण यांच्यावर टीका करण्याचे टाळत भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा पाढा वाचला.  त्यामुळे स्थानिक विषय अलगदपणे बाजूला पडले.

नांदेड होते  भाजपच्या रडारवर
दीड वर्षापूर्वी नांदेड महापालिका जिंकायचीच असा निर्धार करुन भाजप निवडणूक रिंगणात उतरली होती. त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांसह निम्मे मंत्रिमंडळ नांदेडमध्ये होते. मात्र त्यानंतरही अशोक चव्हाण यांनी नांदेड महापालिकेची निवडणूक अक्षरश: एकतर्फी जिंकत भाजपाचे वारु रोखण्याचे काम केले होते. हा पराभव प्रदेश भाजपच्याही जिव्हारी लागला होता. तेव्हापासूनच भाजपाच्या रडारवर नांदेड होते. या अनुषंगाने या निवडणुकीत भाजपने नांदेडवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. नरेंद्र मोदी यांची सभा झाली. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मतदारसंघात तब्बल ४ सभा घेतल्या. दुसरीकडे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर हेही नांदेडमध्ये तळ ठोकून होते. त्यातच याही निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची सुप्त लाट निवडणूक निकालातून पुढे आल्याने काँग्रेसचा अभेद्य किल्ला ढासळला. 

स्कोअर बोर्ड
अशोक चव्हाण यांना ४ लाख ४६ हजार ६५८ मते मिळाली. भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर हे ४० हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. चिखलीकर यांना ४ लाख ८६ हजार ८०६ इतकी मते मिळाली. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांनी १ लाख ६६ हजार ९९६ मतांपर्यंत मजल मारली. भिंगे यांच्या याच मतांनी भाजपाच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला. 

Web Title: Vanchit Bahujan Aghadi breaks congress lead in Nanded Lok sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.