TRAI's new tariff card became a headache | ‘ट्राय’चे नवीन टेरीफ कार्ड बनले डोकेदुखी
‘ट्राय’चे नवीन टेरीफ कार्ड बनले डोकेदुखी

नांदेड : ब्रॉडकास्ट सेक्टरसाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथारिटी आॅफ इंडिया (ट्राय) ने नवीन टेरीफ कार्ड जारी केले. त्यानुसार सर्वसामान्यांचा फायदा त्यात दर्शविण्यात आला. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. केबल पाहणे महाग झाले. महागामोलाच्या प्लॅनचे पैसे भरुनही संबंधित चॅनेल कधी बंद केले जाईल, याचा नेम नाही. याप्रकाराला केबलमालक, संबंधित तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यामुळे ग्राहक वैतागले आहेत.
ट्राय’च्या निर्देशानुसार नवीन टेरीफ प्लॅनची आखणी सुरु आहे. वजिराबाद, मोंढा, शिवाजीनगर, श्रीनगर, अशोकनगर, तरोडा खु., व बु., गणेशनगर, पावडेवाडीनाका आदी परिसरातील केबलचालकांचे कर्मचारी टेरीफ प्लॅन घेवून ग्राहकांच्या घरोघरी जात आहेत. प्लॅन फायनल करण्यापूर्वीच अनेकांचे केबल कनेक्शन बंद करण्यात आले. यासाठीची पूर्वसूचना ग्राहकांना दिली जात नाही. जेव्हा ग्राहकच स्वत:हून केबलचालकाकडे विचारणा करतो, तक्रार करतो तेव्हा त्याला नियम सांगितला जातो.
नियमांची ज्यांना जाण आहे, असे ग्राहक केबल सुरु करण्याची जी प्रक्रिया ती पूर्ण करा, पैसे घ्या आणि केबल सुरु करा, असे संबंधितांना सांगतात, त्यालाही चालक, तांत्रिक कर्मचारी प्रतिसाद देत नाहीत. तब्बल तीन ते चार दिवस यासाठी घेत आहेत. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करावा लागतो. त्यानंतर फॉर्म भरल्या जातो, पैसे घेतल्या जातात आणि केबल कसेबसे सुरु केले जाते.

  • ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरही संबंधित चॅनल कधी बंद होईल, याचा नेम नाही. अनेक ग्राहकांना असा अनुभव येत आहे. यासंदर्भात विचारणा करण्याऱ्यालाही व्यवस्थित उत्तरे दिले जात नाहीत. केबलचा तांत्रिक कर्मचारी मालकाकडे तर मालक कंट्रोलरुमकडे बोट दाखवून आम्ही काही करु शकत नाही, आमच्या हाती काही नाही. तुम्ही कंट्रोल रुमला संपर्क करा’, ‘फारतर आमची जिल्हाधिकारी, ट्रायकडे तक्रार करा’ अशी उत्तरे मिळत असल्याने ग्राहक वैतागले आहेत. पैसे भरुनही हा वैताग कशासाठी? असा सवाल ग्राहकांचा आहे. अनेकांनी केबल बंद करण्याचा निर्णय घेतला तर काहींचे केबल चालक, तांत्रिक कर्मचारी यांच्याशी वाद होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: TRAI's new tariff card became a headache
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.