पारंपरिक व्यवसायाला बसली खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:18 AM2021-05-18T04:18:55+5:302021-05-18T04:18:55+5:30

उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा मुदखेड - गतवर्षी सोयाबीन बियाणाच्या तक्रारीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. यावर्षी पुन्हा ...

The traditional business is in jeopardy | पारंपरिक व्यवसायाला बसली खीळ

पारंपरिक व्यवसायाला बसली खीळ

googlenewsNext

उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा

मुदखेड - गतवर्षी सोयाबीन बियाणाच्या तक्रारीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. यावर्षी पुन्हा या अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी शेतकऱ्यांनी बियाणांची उगवण क्षमता तपासून पेरणी करावी, असे आवाहन नांदेड तालुक्यातील वाडी बु. येथील कृषी सहायक शंकर पवार यांनी केले आहे.

लोंबकळणाऱ्या तारा हटविल्या

देगलूर - तालुक्यातील येरगी गावातील अनेक वर्षांपासून वीज खांबावरील तारा लोंबकळल्या होत्या. तसेच ठिकठिकाणच्या झाडांच्या फांद्या अडकल्या होत्या. त्यामुळे या तारा धोकादायक बनल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेचे संतोष पाटील यांनी याकडे महावितरण विभागाचे लक्ष केंद्रित केले. त्यानंतर धोकादायक असलेल्या लाेंबकळणाऱ्या विद्युत तारा हटविण्यात आल्या.

वन्य प्राण्यांची भटकंती

शिवणी: यावर्षी उन्हाळ्याच्या प्रारंभी नदी-नाले कोरडे पडल्यामुळे व जंगलात कुठेही पाणी उपलब्ध नसल्यामुळे वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. किनवट तालुक्यात गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, परंतु पावसाचे पाणी वाहून गेल्यानंतर नदी-नाले कोरडे पडले. जंगलात वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन

निवघा बाजार - हदगाव तालुका कृषी कार्यालयाकडून हदगाव तालुक्यातील मनुला बु. येथील शेतकऱ्यांना खरीप हंगाम पेरणीपूर्व बियाणाबाबत कोणती काळजी घ्यावी याबाबत तालुका कृषी अधिकारी आर.डी.रणवीर यांनी मार्गदर्शन केले. खरीप हंगामातील पेरणीच्या वेळी सोयाबीन बियाणाचा तुटवडा निर्माण होण्याची संभावना असल्याने शेतकऱ्यांनी घरचेच सोयाबीन बियाणे वापरावे असे आवाहन केले आहे.

भाजीपाला उत्पादक संकटात

बामणीफाटा - हदगाव तालुक्यातील बामणीफाटा, पळसा, मनाठा, चिंचगव्हाण, करमोडी, कवाना, पिंगळी परिसरातील आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून आठवडी बाजार बंद आहे. त्यामुळे भाजीपाला जागेवरच सडून जात आहे. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

कोहळ्यांचे उत्पादन घेणारे अडचणीत

हदगाव - शेतमाल बाजारात येण्याच्या वेळेस संचारबंदी सुरू होत असल्याने शेतमालाचे भाव पडले आहेत. कोहळे काढण्याची वेळ आली आणि बाजार बंद असल्याने काढलेले कोहळे शेतातच ठेवावे लागत आहे. साठवणूक करण्याची व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

ग्रामीण भागात साध्या पद्धतीने लग्न सोहळे

बामणीफाटा - मागील दोन महिन्यांपासून बामणीफाटा, पळसा, मनाठा परिसरात लग्नसराई सुरू आहे. यामध्ये नवदाम्पत्यांनी साध्या पद्धतीने तर काहींनी साखरपुड्यातच लग्न उरकले. तसेच काहींनी आपल्या लग्नाचे मुहूर्त पुढे ढकलले आहेत. नातेवाईक मानपानाचा सोपस्कार विसरून सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रिका पोहोचवित आहेत. तसेच फेसबुक, व्हाॅट्‌सॲपवरून नवदाम्पत्यांना आशीर्वाद देत आहेत.

वनकामगारांचा आंदोलनाचा इशारा

भोकर - मागील १० महिन्यांपासून काम केल्यानंतर वनीकरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पगार देण्यास नकार दिल्यामुळे कामगारांनी धरणे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक वनीकरणाचे विभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर बाबासाहेब कदम, गोविंद राठोड, विठ्ठल कदम, अमृता सोनटक्के, विठ्ठल डोंगरे, दुर्गाबाई चव्हाण आदींच्या सह्या आहेत.

कामगारांचे प्रश्न सोडवा

माहूर - लॉकडाऊनमध्ये कामगारांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी भारतीय मजदूर संलग्न कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. कोरोनाने मयत झालेल्या बांधकाम कामगारांना संबंधित ग्रामपंचायत त्यांच्या नातेवाईकांना मृत्यू प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

नसरतपूर जोडरस्त्याची पाहणी

नांदेड - तालुक्यातील नसरतपूर जोडरस्ता व रेल्वे ब्रीज रस्त्याची आ.बालाजी कल्याणकर यांनी पाहणी केली. सदर रस्त्याची मागील अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. येत्या पावसाळ्यापर्यंत या रस्त्याचे काम करावे अशी मागणी नागरिकांनी केली होती. दरम्यान, आ.कल्याणकर यांनी रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

लसीकरण सुरू

नांदेड - सिडको परिसरातील मातृसेवा आरोग्य केंद्र येथे तब्बल आठ दिवसानंतर ४५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला. यासाठी सकाळी ५ वाजेपासून केंद्रावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली हाेती. १०० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला.

स्लॅबमुळे अपघाताची शक्यता

धर्माबाद - शहरातील अनेक प्रभागातील नालीवरील स्लॅबच्या उंचीमुळे व काही ठिकाणी स्लॅब मोडकळीस आल्यामुळे या स्लॅबमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. याकडे संबंधित प्रभागाचे नगरसेवक व पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.

किनवटमध्ये परशुराम जयंती

किनवट - येथील श्री बालाजी मंदिरात १४ मे रोजी सकाळी १० वाजता ब्राह्मण युवा मंच ता.किनवटच्या वतीने परशुराम जयंती साजरी करण्यात आली. भगवान परशुराम यांच्या प्रतिमेला अभिषेक, महापूजा, महाआरती करण्यात आली. प्रा.डॉ.मार्तंड कुलकर्णी यांनी भगवान परशुराम यांच्या कार्यावर विचार मांडले.

Web Title: The traditional business is in jeopardy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.