Nanded Mumbai Flight: नांदेडकरांची प्रतीक्षा संपली! २५ डिसेंबरपासून नांदेड-मुंबई विमान टेक ऑफ करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 15:25 IST2025-12-09T15:20:44+5:302025-12-09T15:25:01+5:30
Nanded-Mumbai Flight: नांदेड ते मुंबई विमानसेवा सध्या मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी उपलब्ध राहणार आहे.

Nanded Mumbai Flight: नांदेडकरांची प्रतीक्षा संपली! २५ डिसेंबरपासून नांदेड-मुंबई विमान टेक ऑफ करणार
नांदेड : येथील विमानतळावरून स्टार एअर कंपनीकडून पाच विमानसेवा सुरू आहेत. परंतु नांदेडकरांना प्रतीक्षा होती ही नांदेड-मुंबई विमानसेवेची. आता ही प्रतीक्षा संपली असून येत्या २५ डिसेंबरपासून नांदेडहून मुंबईसाठी विमान टेक ऑफ करणार आहे. स्टार एअरच्या वेबसाईटवर तिकिटासाठी बुकिंगही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नांदेडकरांना आता थेट मुंबईसाठी उड्डाण करता येणार आहे.
या निर्णयामुळे विमान प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्टार एअर कंपनीकडून नांदेडातून बंगळूर, हैद्राबाद, अहमदाबाद, पुणे आणि दिल्ली या पाच विमानसेवा सध्या सुरू आहेत; परंतु नांदेडकरांना गेल्या अनेक वर्षांपासून नांदेड-मुंबई विमानसेवेची प्रतीक्षा होती. त्यासाठी मंत्रालय स्तरावर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी अनेकवेळा पाठपुरावाही केला होता. त्यानंतर ही विमानसेवा नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार, असे सांगितले जात होते. परंतु तांत्रिक कारणामुळे त्यास विलंब झाला.
आता येत्या २५ डिसेंबरपासून मुंबईसाठी विमाने उड्डाण करतील. या विमानसेवेमुळे नांदेडसह, हिंगोली, परभणी, यवतमाळ, लातूर, वाशिम यासह अनेक जिल्ह्यांतील प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर नांदेडहून अमृतसरसाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणीही पुढे येत आहे तर गोव्याला विमानाने जाण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रवाशांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सध्या तीन दिवस विमानसेवा
नांदेड ते मुंबई विमानसेवा सध्या मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी उपलब्ध राहणार आहे. परंतु लवकरच ही विमानसेवा आठवडाभर करण्यात येणार आहे. नांदेडहून मुंबईसाठी यापूर्वी असलेल्या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. आता पुन्हा एकदा ही विमानसेवा सुरू झाल्याने मुंबई अन् तिथून इतर शहरे गाठणे अधिक सोयीचे होणार आहे.