देगलूर पोटनिवडणूक पावली; दुरावलेल्या भाऊजी-मेहुण्यांचे एक तपानंतर मनोमिलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 06:37 PM2021-10-20T18:37:58+5:302021-10-20T18:46:51+5:30

२०१४ मध्ये एका सर्वेक्षणाच्या आधारे मिळालेल्या पराभवाच्या संकेताने काँग्रेसने खतगावकर यांचे तिकीट कापले आणि मोदी लाटेत प्रबळ उमेदवार म्हणून अशोकराव चव्हाण यांना नांदेड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.

Thanks to Deglaur by-election; Ashokrao Chavhan and Bhaskarrao Patil Khatgaonkar reunited after 12 yrs | देगलूर पोटनिवडणूक पावली; दुरावलेल्या भाऊजी-मेहुण्यांचे एक तपानंतर मनोमिलन

देगलूर पोटनिवडणूक पावली; दुरावलेल्या भाऊजी-मेहुण्यांचे एक तपानंतर मनोमिलन

googlenewsNext
ठळक मुद्दे २०१० नंतर अशोकराव चव्हाण खतगावकर यांच्या निवासस्थानीतब्बल एका तपानंतर भाऊजी-मेहुण्यांचा हा योग जुळून आला.

- श्रीनिवास भोसले

नांदेड :  राजकीय अस्तित्वामुळेच एकमेकांपासून दुरावलेल्या भाऊजी-मेहुण्यांचा तब्बल एका तपानंतर मनोमिलनाचा योगही राजकारणामुळेच आला. रविवारी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली. त्यानंतर सोमवारी सकाळी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाऊजींच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी अशोकरावांवर पुष्पवृष्टी करत खतगावकर कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे जावई माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि चिरंजीव अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये सोबत काम केले. परंतु २०१४ मध्ये एका सर्वेक्षणाच्या आधारे मिळालेल्या पराभवाच्या संकेताने काँग्रेसने खतगावकर यांचे तिकीट कापले आणि मोदी लाटेत प्रबळ उमेदवार म्हणून अशोकराव चव्हाण यांना नांदेड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. यावेळी त्यांचा विजयदेखील झाला. मात्र, नाराज झालेल्या भास्कररावांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु, २०१० पासून ते आजपर्यंत अशोकराव चव्हाण यांनी राजेंद्र नगरस्थित खतगावकर यांच्या निवासस्थानी भेट दिली नव्हती. तब्बल एका तपानंतर हा योग सोमवारी जुळून आला. यावेळी  माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, किशोर स्वामी, सरजितसिंघ गिल, रवी खतगावकर, दीपक पावडे आदींची उपस्थिती होती.

त्यातच खतगावकर हेदेखील तब्बल सात वर्षानंतर रविवारी अशोकराव चव्हाण यांच्या घरी गेले होते. यावेळी अशोकराव चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण यांनी त्यांचे औक्षण करून स्वागतही केले. देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकरांच्या विजयात दादांचा फायदाच होईल, असे कार्यकर्ते बोलत आहेत. मात्र, पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आणि भाजपमध्ये सापत्न वागणूक मिळत असल्याने भास्करराव खतगावकर यांनी केलेली घरवापसी ही केवळ पक्षातील घरवापसी नसून चव्हाण आणि खतगावकर कुटुंबीयांचे नातेसंबंध आणखी वृद्धिंगत करणारी ठरली आहे.

चंद्रकांत पाटील यांची नास्त्याची संधी हुकली
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी माजी खासदार भास्करराव खतगावकर यांना फोन करून मी सोमवारी नास्त्याला तुमच्या घरी येणार असल्याचे सांगितले. त्यावेळी भास्कररावांनीही आपले स्वागत आहे, असे बोलले. परंतु, रविवारी दादांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस प्रवेशाची घोषणा केली. आपसूकच सोमवारी खतगावकर यांच्याकडे होणाऱ्या नास्त्याची पाटील यांची संधी हुकल्याचे भाजपच्या सुत्रांनी सांगितले.

नायगाव, नांदेड उत्तरची समीकरणेही बदलतील
माजी खासदार भास्करराव खतगावकर हे नम्र आणि सुशील नेतृत्व म्हणून त्यांना मानणारा वर्ग आहे. दादांच्या काँग्रेस प्रवेशाने देगलूर-बिलोली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पारडे निश्चितच जड भरेल, असा विश्वास नागरिकांतून व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे भविष्यात नांदेड उत्तर आणि नायगाव विधानसभा मतदारसंघातही खतगावकरांमुळे कॉंग्रेसला फायदा होईल. या दोन्ही मतदारसंघात खतगावकरांना मानणारा एक वर्ग आहे.

पोकर्णां यांना कॉंग्रेस महानगर अध्यक्ष पदाच्या लॉटरीची संधी
माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांचे संघटन कौशल्य चांगले आहे. त्यातच मुस्लीम आणि ओबीसी समाजासोबतचे त्यांचे सख्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे आमदार अमरनाथ राजूरकर यांना महानगराध्यक्ष पदावरून बढती देत प्रदेश कार्यकारिणीत घेतले. त्यांच्या ठिकाणी आता माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांना महानगराध्यक्ष पद दिले जाईल, असे बोलले जात आहे.

... तर भाऊजी अन्‌ मेहुणीत होऊ शकते लढत
भास्करराव खतगावकर यांनी भविष्यात स्वत:साठी काहीही मागणार नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. परंतु, भविष्यात त्यांची सून तथा विद्यमान जि.प. सदस्या मीनल खतगावकर यांना नायगाव अथवा नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, नायगावचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या पत्नी पूनम पवार आणि मीनल खतगावकर या नात्याने मावस बहिणी पडतात. त्यामुळे भविष्यात नायगाव विधानसभा निवडणुकीत भाऊजीविरुद्ध मेहुणीची लढतही होऊ शकते.

Web Title: Thanks to Deglaur by-election; Ashokrao Chavhan and Bhaskarrao Patil Khatgaonkar reunited after 12 yrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.