सक्षम ताटे खूनप्रकरण: आरोपींना पाठबळ देणाऱ्या पोलिसाला सहआरोपी करा: गुणरत्न सदावर्ते
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 19:15 IST2025-12-02T19:15:19+5:302025-12-02T19:15:36+5:30
आरोपींकडून सक्षम ताटे याच्या कुटुंबीयास व बहिणीच्या जिवास धोका असून, त्यांना तत्काळ पोलिस संरक्षण द्यावे

सक्षम ताटे खूनप्रकरण: आरोपींना पाठबळ देणाऱ्या पोलिसाला सहआरोपी करा: गुणरत्न सदावर्ते
नांदेड : नांदेडमध्ये २७ नोव्हेंबर रोजी झालेली ऑनर किलिंगची घटना अतिशय दुर्दैवी असून, नियोजनबद्ध पद्धतीने सक्षम ताटे या तरुणाचा निर्घृण खून झाला. घटनेच्या दिवशी सकाळी बहिण-भाऊ ठाण्यात आले असता आरोपींना पाठबळ देत चिथावणी देणाऱ्या इतवारा ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यास याप्रकरणी सहआरोपी करावे, अशी मागणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
सोमवारी सकाळी ॲड. गुणरत्न सदावर्ते व जयश्री पाटील यांनी मृत सक्षम ताटे याच्या घरी भेट दिली. या घटनेचा निषेध करताना ही बाब मानवी विचारांच्या पलीकडील असून, अतिशय क्रूर पद्धतीने सक्षमची हत्या झाल्याचे ते म्हणाले. पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अनेक गंभीर आरोप केले. खूनप्रकरणी पोलिसांनी केवळ एक एफआयआर दाखल केला आहे. वास्तविक पाहता, खुनाची घटना घडण्यापूर्वी त्याच दिवशी सकाळी बहिण-भाऊ ठाण्यात आले होते. सक्षमविरोधात तक्रार देण्यासाठी बहिणीवर दबाव आणण्यात आला. मात्र, त्यास नकार दिला असता तिचा मोबाइल फोडला. यावरून ठाण्यात वाद झाला असता उपस्थित पोलिस कर्मचारी धीरज कोमुलवार यांनी तुमचे घरचे भांडण दररोज आमच्यापर्यंत आणू नका, एखाद्याला संपवा म्हणजे त्रासातून कायमची मुक्तता होईल, असे बोलून चिथावणी दिली. शिवाय तुझे वय कमी आहे, एखाद्याला मारून टाक, लवकर सुटशील, असे म्हणून खून घडण्यास सदर कर्मचारी कारणीभूत ठरला असून, त्याच्याविरूद्ध तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सदावर्ते यांनी केली.
केस लढवण्यास आपण तयार
तपासातील त्रुटी पोलिस अधीक्षक व तपास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या असून, आरोपींकडून सक्षम ताटे याच्या कुटुंबीयास व बहिणीच्या जिवास धोका असून, त्यांना तत्काळ पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, सक्षमच्या कुटुंबीयांची इच्छा असल्यास ही केस लढवण्यास आपण तयार असल्याचे सदावर्ते म्हणाले.