Proposals for the caste validity certificate | जातवैधता प्रमाणपत्रासाठी समितीकडे प्रस्तावांचा ढिगारा
जातवैधता प्रमाणपत्रासाठी समितीकडे प्रस्तावांचा ढिगारा

ठळक मुद्देजात पडताळणी समिती वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया

श्रीनिवास भोसले।
नांदेड : जिल्हा जात पडताळणी समितीने मागील वर्षभरात जवळपास १६ हजार ८०० विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र अदा केले आहे़ परंतु, मागील महिनाभरापासून विद्यार्थ्यांची गर्दी वाढल्याने समितीकडे जातवैधता प्रमाणपत्राच्या प्रस्तावांच्या फाईलचा ढिगारा पडला आहे़ विद्यार्थ्यांना वेळेत जातवैधता प्रमाणपत्र न मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होवू शकते़
सध्या वैद्यकीय, अभियांत्रिकीच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज करण्याची आॅनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे़ या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार की नाही या संभ्रमावस्थेत असलेल्या अनेकांनी प्रमाणपत्रच काढले नाही़ दरम्यान, मराठा आरक्षणानुसार वैद्यकीय तसेच अभियांत्रिकीचे प्रवेश करण्याचा निकाल आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे़
१६ टक्के मराठा आरक्षणानुसार वैद्यकीय तसेच अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया पार पडणार असल्याचा निकाल न्यायालयाने दिला़ त्यामुळे मराठा समाजातील तरूणांची जात प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी एकच गर्दी होत आहे़
बहुतांश विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षण निर्णय झाला तेव्हाच एसईबीसीचे प्रमाणपत्र काढून ठेवले आहे़ परंतु, जातवैधता प्रमाणपत्र काढले नाही़ त्यातच ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अथवा अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळाला तर त्यांना ठरावीक मुदतीत कागदपत्रे पडताळणी करताना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे़ त्यामुळे आरक्षण असूनही वैधता प्रमाणपत्राअभावी अनेकांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित रहावे लागेल, अशी परिस्थिती आहे़
जिल्हा जात पडताळणी समितीने वर्षभरात १८ हजार प्रलंबित प्रस्तावांपैकी १६ हजार ८०० प्रस्ताव निकाली काढले़ त्याचबरोबर मागील महिनाभरात सातशेहून अधिक प्रस्ताव दाखल झाले असून त्यापैकी जवळपास १२८ प्रस्ताव निकाली काढून विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र वितरित केल्याचे समाज कल्याण आयुक्त तथा जिल्हा जात पडताळणी समिती सदस्य जलील शेख यांनी सांगितले़
आजघडीला जिल्हा जात पडताळणी समितीकडे शेकडो प्रस्ताव पडून असून ते तत्काळ निकाली काढणे गरजेचे आहे़ जात सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे़ यामध्ये एससीसाठी १९५० चा पुरावा, एसईबीसी, ओबीसीसाठी १९६७ चा तर व्हीजेएनटीसाठी १९६१ मधील पुरावा लागतो़ त्यात प्रवेश निर्गम, खासरा पानी, खरेदी खत, विक्री खत, जुने शासकीय कागदपत्रे, कोतवालबुक आदी कागदपत्रांचा समावेश आहे़ वडील अथवा रक्ताचे नातेसंबंध असणाऱ्या व्यक्तीचे कागदपत्रेही प्रस्तावासोबत जोडता येतात़

विद्यार्थ्यांना वेळेत जातवैधता प्रमाणपत्र देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे़ कोणीही बाहेरच्या व्यक्तीच्या भुलथापांना बळी पडू नये़ प्रस्तावासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडलेली असल्यास दुसºयाच दिवशी जातवैधता प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना अदा केले जाईल़ त्रुटी असलेली कागदपत्रे असल्यास तपासणीस वेळही लागतो़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी आवश्यक आणि योग्य कागदपत्रे प्रस्तावासोबत जोडावीत़
- शेख जलील, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात पडताळणी समिती, नांदेड़


Web Title: Proposals for the caste validity certificate
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.