'एमआयएम-वंचित' काडीमोडामुळे राजकीय गणिते बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:39 PM2019-09-11T12:39:22+5:302019-09-11T12:43:37+5:30

काँग्रेसला मिळणार दिलासा 

Political results will change due to the clash of MIM and Vanchit Bahujan Aaghadi | 'एमआयएम-वंचित' काडीमोडामुळे राजकीय गणिते बदलणार

'एमआयएम-वंचित' काडीमोडामुळे राजकीय गणिते बदलणार

Next
ठळक मुद्देदोन्ही पक्षांतील इच्छुक उमेदवार धास्तावलेमतविभाजनाचा फटका बसण्याची भीती

- विशाल सोनटक्के

नांदेड : तेलंगणातून नांदेडमार्गे महाराष्ट्रात दाखल झालेल्या एमआयएम पक्षाने नांदेडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. दुसरीकडे नांदेड जिल्ह्यावर प्रकाश आंबेडकर यांचाही प्रभाव असल्याने एमआयएम वंचितसोबत आल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील राजकारणात वंचित फॅक्टरला कमालीचे महत्त्व आले होते.  मात्र अवघ्या काही महिन्यांच्या मैत्रीनंतर हे दोन्ही पक्ष वेगळे झाले आहेत. पर्यायाने जिल्ह्यातील राजकीय गणितेही बदलणार आहेत. आगामी विधानसभा लढण्यासाठी एमआयएमसह वंचितकडून अनेकांनी फिल्डींग लावली होती. मात्र या दोन्ही पक्षांतील इच्छुकही आता धास्तावल्याचे चित्र आहे. 

नांदेड जिल्ह्याची आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला अशीही ओळख आहे. १९५७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरिहरराव सोनुले हे शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या तिकिटावरुन निवडून आले होते. त्यानंतर १९८७ च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसचे अशोकराव चव्हाण यांच्याविरोधात प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत चव्हाण यांना २ लाख ८३ हजार १९ इतकी मते मिळाली होती तर आंबेडकर यांनी १ लाख ७१ हजारांहून अधिक मते खेचली होती. जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघात आजवर भारिपचा उमेदवार निवडणूक लढवत आलेला आहे. १९९३ मध्ये किनवट विधानसभा मतदारसंघातील कम्युनिस्ट पक्षाचे आमदार सुभाष जाधव यांचे अपघाती निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भारिपच्यावतीने भीमराव केराम निवडून आले होते. या निकालानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या या प्रयोगाने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते.

नांदेड जिल्हा तेलंगणाच्या सीमेलगत आहे. त्यामुळे हैदराबादमधील एमआयएम पक्षाचा प्रभाव जिल्ह्यातील मुस्लिम कार्यकर्त्यांवर होता.  २०१२ मध्ये  झालेल्या नांदेड महानगरपालिका निवडणुकीत ११ नगरसेवक निवडून आणत एमआयएमने महाराष्ट्राच्या राजकारणात धडाकेबाज प्रवेश केला होता. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही एमआयएमने आपली ताकद दाखवून दिली होती.  नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचे अब्दुल रहीम यांनी ३२ हजार ३३३ मते तर नांदेड दक्षिणमधून सय्यद मोईन हे ३४ हजार ५९० मते खेचत तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. दुसरीकडे भारिपच्या बळीराम भुरके यांनीही हदगाव मतदारसंघातून २२ हजार ९०४ मते मिळवित तिसरा क्रमांक राखला होता. विशेष म्हणजे, भारिप पूर्वीपासूनच विधानसभेच्या निवडणुका येथे स्वतंत्रपणे लढवत आलेली आहे. २००४ मध्ये नांदेड मतदारसंघातून भारिप उमेदवारांनी २९ हजार मते खेचली होती तर हदगाव मतदारसंघातून भारिप उमेदवाराला २७ हजार ९६६ इतकी मते मिळाली होती. पर्यायाने नांदेडमधील राजकीय गणिते बदलली होती. या आघाडीचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला होता.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा धक्कादायक पराभव झाला. यावेळी वंचित आघाडीने तब्बल १ लाख ६७ हजार मते खेचत चव्हाण यांच्या पराभवाचा मार्ग प्रशस्त केला होता. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीतही वंचित फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावण्याचे संकेत मिळत होते. त्यामुळेच या दोन्ही पक्षाकडे  इच्छुकांच्या रांगा लागल्या होत्या. हदगावसह नांदेड शहरातील दोन्ही मतदारसंघात ही आघाडी प्रभावी ठरेल, असा कयास बांधला जात असतानाच वंचित आणि एमआयएमची ही मैत्री तुटल्याने आता या दोन्ही पक्षाकडील इच्छुक उमेदवारही धास्तावल्याचे चित्र आहे. 

मनपात उघडले नव्हते एमआयएमचे खाते
मध्यंतरीच्या काळात एमआयएमचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन पक्षाबाहेर गेले. त्यानंतर मनपामध्ये निवडून आलेल्या ११ पैकी ९ नगरसेवकांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने एमआयएमची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली. यामुळेच २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमला नांदेड महानगरपालिकेत खातेही उघडता आले नाही. मात्र त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा उदय झाला आणि या आघाडीने एमआयएमसोबत हातमिळवणी केल्याने एमआयएमलाही पुन्हा बळकटी मिळाली होती.

एमआयएमच्या दक्षिणच्या उमेदवाराकडे लक्ष
एमआयएमने वंचितशी काडीमोड घेतल्याचे घोषित करुन विधानसभा निवडणुकीसाठी आपले तीन जागचे उमेदवार घोषित केले आहे. त्यात नांदेडमधून नांदेड उत्तर मतदारसंघासाठी फेरोज लाला यांची उमेदवारी घोषित केली आहे. फेरोजलाला यांनी नांदेड दक्षिणमधून तयारी चालवली होती. ऐनवेळी त्यांना आता उत्तरच्या मैदानात टाकण्यात आले आहे. त्यामुळे एमआयएमचा नांदेड दक्षिणचा उमेदवार कोण? याकडे लक्ष लागले आहे. एमआयएमचा पूर्वी राहिलेला एक पदाधिकारी पुन्हा एमआयएममध्ये प्रवेशासाठी इच्छुक आहे. त्या प्रवेशाला काहींनी विरोध दर्शविला आहे.

Web Title: Political results will change due to the clash of MIM and Vanchit Bahujan Aaghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.