Police officer escapes with bullet in his pistol | आरोपीच्या पिस्तुलात गोळी अडकल्यानेच बचावला पोलीस अधिकारी

आरोपीच्या पिस्तुलात गोळी अडकल्यानेच बचावला पोलीस अधिकारी

नांदेड : कुख्यात आरोपी शेरसिंघ ऊर्फ टायगर याच्यासोबत झालेल्या पोलीस चकमकीत शेरसिंघने पोलिसांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या होत्या़ त्यातील  दुसरी गोळी झाडल्यानंतर पिस्तुलातच अडकून बसल्याने काही पावलाच्या अंतरावर असलेला अधिकारी बालंबाल बचावला़ स्थागुशाच्या पथकाने शेरसिंघच्या हातात पिस्तूल असताना मोठ्या हिमतीने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला़ परंतु ऐनवेळी शेरसिंघने गोळी चालविल्याने पोलिसांनाही त्याच्या दिशेने गोळी झाडण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता़ 

रविवारी रात्री मेट्रो शूजमध्ये बंदुकीच्या धाकावर लूट करणाऱ्यांमध्ये अजय ढगे आणि शेरसिंघचा सहभाग होता़ त्यातील अजय ढगे हा नाकाबंदीत पोलिसांच्या हाती लागला़ तर शेरसिंघ हा फरार होता़ दुसऱ्या दिवशी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तो बारड ते बारसगाव रस्त्यावर एका आखाड्यावर असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानंतर एक अधिकारी अन् तीन कर्मचारी शेरसिंघला पकडण्यासाठी गेले़ आखाड्यावर चारचाकी वाहनात बसलेल्या शेरसिंघच्या अगदी जवळ पथकातील हे कर्मचारी अन् अधिकारी गेले होते़ त्याचवेळी शेरसिंघने आपल्या जवळील पिस्तूल पोलिसांच्या दिशेने रोखत़ समोर याल तर गोळीने उडवितो अशी धमकी दिली़ 

यावेळी स्थागुशाचे अधिकारी शेरसिंघला बोलण्यात व्यस्त करीत होते़ तर इतर तीन कर्मचारी एक-एक पाऊल पुढे जात होते़ शेरसिंघपासून पंधरा ते वीस पावलांचे अंतर असताना एका कर्मचाऱ्याने दगड उचलून शेरसिंघच्या दिशेने भिरकावला़ तो दगड शेरसिंघने चुकविला़ त्यानंतर त्या कर्मचाऱ्याने शेजारीच असलेल्या गोठ्याच्या बाजूने शेरसिंघला दुसऱ्या बाजूने घेरण्याचा प्रयत्न केला़ यावेळी शेरसिंघवर त्या कर्मचाऱ्याने काठीही उगारली़ तोच शेरसिंघने त्याच्या दिशेने गोळी झाडली़ परंतु सुदैवाने ती गोळीचा निशाणा चुकला़ 

काही सेकंदातच शेरसिंघने दुसऱ्या बाजूला असलेल्या अधिकाऱ्याच्या दिशेने गोळी चालविली़ परंतु ती गोळी पिस्तुलातच अडकल्याने अधिकारी बचावला़ यावेळी अधिकाऱ्याने झाडलेल्या गोळीने शेरसिंघचा मात्र अचूक नेम धरला़ अन् त्यातच तो गंभीर जखमी झाला़ अवघ्या काही मिनिटाचा हा थरार चित्रपटातील एका दृश्याप्रमाणेच होता़ शेरसिंघच्या हातातील पिस्तुलात आणखी चार गोळ्या शिल्लक होत्या़ त्यामुळे अधिकाऱ्यावर झाडलेली गोळी जर पिस्तुलात अडकली नसती तर मोठा अनर्थ झाला असता़ असेच या घटनेवरुन पुढे येते.

पोलिसांच्या हिमतीचे कौतुक
शेरसिंघ हातातील पिस्तूल पोलीस कर्मचाऱ्यांच्या दिशेने रोखून होता़ असे असताना स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी अन् कर्मचारी यांनी मोठ्या हिमतीने त्याला घेरण्याचा प्रयत्न केला़ काही पावलावर शेरसिंघ असताना त्याच्याशी बोलणे सुरुच होते़ परंतु तो ऐकून घेण्याचा मनस्थितीत नव्हता़ शेरसिंघपासून काही अंतरावर असलेल्या एका कर्मचाऱ्याने त्याच्यावर दगड भिरकाविला, काठीही उगारली़ तोच शेरसिंघने गोळी चालविली़ सुदैवाने या घटनेत कोणीही कर्मचारी जखमी झाले नाही़ परंतु थरारक चकमकीत पोलिसांच्या हिमतीचे कौतुक होत आहे़

अख्खी यंत्रणा चकमकीच्या ठिकाणी
सोमवारी सायंकाळी शेरसिंघचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर मंगळवारपासून विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड, उपअधीक्षक अभिजित फस्के यांच्यासह शहरातील सर्वच ठाणे प्रमुख हे गेल्या चार दिवसांपासून अर्धापूर हद्दीतील घटनास्थळी तपासात आहेत़ नेमकी घटना कशी घडली? याबाबत व्हिडीओ तयार करण्यात आला आहे़ घटनास्थळावरील प्रत्येक बाबींचा अहवालात उल्लेख करण्यात आला आहे़ 

Web Title: Police officer escapes with bullet in his pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.