राष्ट्रवादीचे नांदेड जिल्हाध्यक्ष गोरठेकर यांनी पक्ष सोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 04:01 PM2019-07-29T16:01:19+5:302019-07-29T16:04:20+5:30

भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार

NCP's Nanded district president Gorthekar left the party | राष्ट्रवादीचे नांदेड जिल्हाध्यक्ष गोरठेकर यांनी पक्ष सोडला

राष्ट्रवादीचे नांदेड जिल्हाध्यक्ष गोरठेकर यांनी पक्ष सोडला

googlenewsNext

नांदेड : राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्याची घोषणा करत आगामी निवडणूक ही भोकर मतदारसंघातून लढवणार असल्याचे स्पष्ट केले़ पक्ष कोणता हे अद्याप त्यांनी घोषित केले नसले तरीही ते भाजपाच्या वाटेवर आहेत़ 

नांदेडमध्ये सोमवारी गोरठेकर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती़ या बैठकीत आगामी कार्यकाळातील निर्णयाबाबत प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली़ यावेळी बहुतांश कार्यकर्त्यांनी गोरठेकर जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य राहील असे सांगून गोरठेकरांच्या निर्णयाला पाठिंबा राहील, ही भूमिका मांडली़ भोकर व नायगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता़ 

गोरठेकर यांनी भूमिका मांडताना मागील १० वर्षात आमच्या कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला त्याचा हिशोब आता पूर्ण केला जाईल हे ठणकावताना सर्वसामान्यांसाठीच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे ते म्हणाले़ कुस्ती लढताना ती मोठ्या पैलवानाशी लढावी, असे सांगताना त्यांनी आगामी निवडणूक ही भोकर मतदारसंघातून लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत़ 

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने धोका दिल्याचे भोकरच्या आमदार अमिताताई चव्हाण यांनी म्हटले होते़ त्याबाबत राष्ट्रवादीने धोका दिला नाही तर काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनीही अशोकरावांना मतदान करा असे म्हटले नसल्याचे सांगितले़ त्यांचेच कार्यकर्ते प्रचारात उतरले नाहीत़ इतकेच नव्हे तर काँग्रेसने आपल्यावरही पाळत ठेवली होती़ विश्वासच नाही तर सोबत राहण्याची काय गरज होती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला़ काँग्रेसने आपल्याला दोनवेळा पराभूत केले़ मात्र आम्ही ब्र ही काढला नाही़ त्यामुळे आता कोण काय म्हणते याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे गोरठेकर यांनी सांगितले़ 

राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यास पक्षातील राहू-केतू कारणीभूत असल्याचे सांगितले़ हे राहू-केतू म्हणजे माजी आ़शंकरअण्णा धोंडगे आणि किनवटचे आ़ प्रदीप नाईक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ मेहनत आम्ही करायची आणि धोंडगे व नाईक यांनी सौदेबाजी करत आपल्या मुलाला, नातेवाईकाला पदे मिळवून घ्यायची़ काँग्रेसनेही गरज पडल्यासच या राहू-केतूंना जवळ घेतले़ यामुळे पक्षात राहायचे कशाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ निवडणुकीच्या काळात येणारे निरीक्षकही काँग्रेसशी मॅनेज असायचे असा आरोपही त्यांनी केला़  

जिल्ह्यात गोरठेकर आणि कुंटूरकर घराणे हे राजकारणातील मोठे घराणे होते़ याच घराण्यांच्या मदतीने शंकरराव चव्हाण यांनी जिल्ह्यात राजकारण केले़ मात्र अशोकराव चव्हाण यांनी या घराण्यांची वाट लावली, असेही त्यांनी सांगितले़ मागील १० वर्षात सत्तेत नसताना कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यात आला़ मात्र त्याचा आता आगामी काळात निश्चितच हिशोब केला जाईल, असेही ते म्हणाले़ यावेळी सभापती दत्तू रेड्डी, राजेश कुंटूरकर, मारोतराव कवळे, रमेश सरोदे, दत्ताहरी पाटील, गणेशराव गाढे, विश्वनाथ बन्नाळीकर, भास्कर भिलवंडे, महंमद जावेद, उत्तम बाभळे, जीवन पाटील, धर्मराज देशमुख यांनीही भावना व्यक्त केल्या़

Web Title: NCP's Nanded district president Gorthekar left the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.