ऐन निवडणुकीच्या हंगामात आल्या परीक्षा; प्रचारासाठी तरूण कार्यकर्त्यांची होतेय वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 08:04 PM2019-10-15T20:04:32+5:302019-10-15T20:06:53+5:30

कॉलनीतील प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्यांची संख्या घटली

Maharashtra Election 2019 : examinations during the election season; lack of young workers for promotion of election | ऐन निवडणुकीच्या हंगामात आल्या परीक्षा; प्रचारासाठी तरूण कार्यकर्त्यांची होतेय वानवा

ऐन निवडणुकीच्या हंगामात आल्या परीक्षा; प्रचारासाठी तरूण कार्यकर्त्यांची होतेय वानवा

Next
ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पदवी परीक्षा सुरू आहेत़ उमेदवारांनी तरूण नोकरदारावर लक्ष केंद्रित केले आहे़ 

नांदेड : स्वारातीम विद्यापीठाच्या महाविद्यालयीन हिवाळी सत्राच्या परीक्षा १० आॅक्टोबरपासून सुरू झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या ऐन प्रचारात तरूण कार्यकर्त्यांची वानवा जाणवत आहे़ 

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पदवी परीक्षा सुरू आहेत़ विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात  होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांची हिवाळी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरू झाली होती़ त्यामुळे   या सर्व धामधुमीपासून विद्यार्थी अलिप्त राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आहेत़ महाविद्यालयीनस्तरावर तरूण कार्यकर्त्यांची फौज निवडणुकीच्या मैदानात दिसत नाही़ त्यामुळे शहरात कोणत्याच पक्षाच्या प्रचारात महाविद्यालयीन विद्यार्थी दिसत नसल्याचे चित्र आहे़ 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातंर्गत संलग्नित असलेल्या महाविद्यालयात प्रथम सत्राच्या   पदवी व पदव्युत्तर तसेच इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत़ नियोजित वेळेनुसार विद्यापीठाने या परीक्षा घेतल्या असल्या तरी विधानसभा निवडणुकीतच या परीक्षा  सुरू आहेत़ त्यामुळे राजकीय पक्षांना या तरूण कार्यकर्त्यांची मदत होत नाही़ 

शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे़ परीक्षेच्या निमित्ताने हे विद्यार्थी शहरात राहत आहे़ गावातील राजकारणात सक्रिय असलेल्या या तरूणांना निवडणुकीत मात्र सहभागी होता येत नाही़ विद्यापीठाने निवडणुकीच्या अनुषंगाने परीक्षेच्या वेळापत्रकात काही बदल केले आहेत़ ११, १२ आॅक्टोबर रोजी नियोजित परीक्षेचे पेपर तसेच १९ तारखेला होणारा पेपर पुढे ढकलला आहे़ तर  २१  ते २५ आॅक्टोबरपर्यंतच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलल्या  आहेत़ असे असले तरी परीक्षेचा अभ्यास सोडून विद्यार्थी प्रचारात उतरण्यास तयार नाहीत. शहरातील कॉलनी, गल्लीत प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या तरूणांची संख्या घटल्यामुळे नेत्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे़ त्यामुळे  उमेदवारांनी तरूण नोकरदारावर लक्ष केंद्रित केले आहे़ 

 यासंदर्भात भारतीय स्टुडंटस  फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दिलीप कंधारे यांनी, विद्यार्थी हा खऱ्या अर्थाने समाजकारण व राजकारणाची दिशा निश्चित करीत असतो़ त्यामुळे समाजकारण व राजकारणाची दिशा बदलते़ परंतु महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या  विद्यापीठ परीक्षेच्या कालावधीत आल्यामुळे विद्यार्थ्यांना निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणे शक्य होत नसल्याचे सांगितले़ 

Web Title: Maharashtra Election 2019 : examinations during the election season; lack of young workers for promotion of election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.