‘स्वारातीम’ कडे परदेशी विद्यार्थ्यांचा वाढता कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 07:21 PM2019-12-27T19:21:35+5:302019-12-27T19:26:46+5:30

वर्षभरात परदेशी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध होणार

Increasing trend of foreign students towards SRT University | ‘स्वारातीम’ कडे परदेशी विद्यार्थ्यांचा वाढता कल

‘स्वारातीम’ कडे परदेशी विद्यार्थ्यांचा वाढता कल

Next
ठळक मुद्दे६१ परदेशी विद्यार्थी घेताहेत शिक्षणाचे धडे विशेषत: पीएचडी साठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे़

- भारत दाढेल

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत विविध अभ्यासक्रमासाठी  प्रवेश घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत असून  या विद्यार्थ्यांची संख्या आता ६१ वर पोहचली आहे़ परदेशी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी विद्यापीठात सुसज्ज वसतीगृह निर्माण होत आहे़ तसेच इतर  शैक्षणिक सवलती त्यांना मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ 

स्वारातीम विद्यापीठाची स्थापना १९९४ मध्ये झाल्यानंतर पाच, सहा वर्षानंतर विद्यापीठात इंटरनॅशनल स्टुडंट्स सेंटरची स्थापना करण्यात आली़ प्रारंभी एक ते दोनच विदेशी विद्यार्थ्यांचे प्रवेश या विद्यापीठात होते़ नंतर हा आकडा हळूहळू वाढू लागला़ विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाची ओळख जगभर झाल्यानंतर व येथील सुविधांची खात्री पटल्यानंतर परदेशी विद्यार्थ्यांनी या विद्यापीठात शिक्षण घेण्यास सुरूवात केली़ विद्यापीठ परिसर व विद्यापीठातंर्गत असलेल्या विविध महाविद्यालयात परदेशी विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत़ विशेषत: नांदेड शहरातील यशवंत महाविद्यालय, पीपल्स कॉलेज, नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज, सायन्स कॉलेज, परभणी जिल्ह्यातील श्री शिवाजी कॉलेज या ठिकाणी काही विद्यार्थी प्रवेशित आहेत़ तर विद्यापीठात अर्थ सायन्स, मिडीया सायन्स, कॉमर्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट सायन्स, केमिकल सायन्स, लाईफ सायन्स, फीजकील सायन्स, मॅथेमेटीक्स सायन्स, भाषा, साहित्य व संस्कृती आदी विषयासाठी ४७ विद्यार्थी व १४  विद्यार्थींनी  शिक्षण घेत आहेत़ विशेषत: पीएचडी साठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे़  विद्यापीठात स्वतंत्र निर्माण केलेल्या इंटरनॅशनल स्टुडंट्स सेंटरद्वारे परदेशी विद्यार्थ्यांच्या सर्व अडीअडचणी या विभागाचे संचालक डॉ़ टी़ विजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सोडविल्या  जातात़ येमेन, केनिया, सोमालिया आदी देशातील विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असला तरी  आगामी काळात १०  विविध देशातील अडीचशे विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षणासाठी येतील,  असे नियोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सद्यस्थितीत स्वारातिम विद्यापिठात   ६१ परदेशी विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे. यामध्ये स्कुल आॅफ लँगवेज, लिटरेचर अ‍ॅण्ड कल्चर स्टडीसाठी १०, स्कुल आॅफ लाईफ सायन्स विभाग -३, स्कुल आॅफ मॅथेमॅटीकल सायन्स-८, स्कुल आॅफ  फीजीकल सायन्स-४, स्कुल आॅफ मिडिया सायन्स- १, स्कुल आॅफ अर्थ सायन्स- २, स्कुल आॅफ  केमिकल सायन्स- ३, स्कुल आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट सायन्स-८, स्कुल आॅफ कॅम्युटर सायन्स- १२ विद्यार्थी प्रवेशित आहेत़ 

 स्वारातीम विद्यापीठाताील मी संशोधक विद्यार्थी असून मला या विद्यापीठाविषयी  जिव्हाळा  आहे़   या विद्यापीठाने अधिकाधिक आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी प्रवेशित करण्यासाठी  प्रयत्न करावेत, असे आम्हाला वाटते़ 
- मोहम्मद ना मुतहर, येमेन, संशोधक विद्यार्थी, 


माझा विद्यापीठातील शैक्षणिक अनुभव  चांगला आहे़ मला या ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त काही मिळाले.  विद्यापीठात  परदेशी विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय  शैक्षणिक फायदे तर मिळतातच तसेच इतर सुविधाही मिळतात़ 
- नमो हमूद सालेह, स्कुल आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट़ 

स्वाातीम विद्यापीठाच्या शैक्षणिक सुविधा आवडत असल्यामुळे मला आनंद होत आहे़ या विद्यापीठात चांगली पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळते़ आमच्या अभ्यासासाठी ते सहायक आहे़ 
 - गुद्दन अब्दुल्ला अली़, संशोधक विद्यार्थी़ 

स्वारातीम विद्यापीठ माहिती व ज्ञान मिळविण्याची भव्य जागा आहे़ या विद्यापीठातील सर्व सदस्य, प्राध्यापक, कर्मचारी मेहनत घेतात. त्यांनी कार्यप्रदर्शनातून परदेशी विद्यार्थ्यांची मने जिंकली आहेत़ 
 - मुजीब हुसेन सालेह़, संशोधक विद्यार्थी़

लवकरच परदेशी विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती
स्वारातीम विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुलभतेसाठी विशेष लक्ष दिले जाते़ त्यामुळेच परदेशी विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे़ सध्या या विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतीगृह निर्माण करण्याचे काम हाती घेतले असून वर्षभरानंतर ते या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होईल़परेदेशी विद्यार्थ्यांच्या भाषेची अडचण सोडविण्यासाठी इंग्रजीचा विशेष कोर्स विद्यापीठात राबविण्यात येतो़ विशेषत: यमन, केनिया, सोमालिया आदी देशातील विद्यार्थी विद्यापीठात शिक्षण घेत आहेत़ मात्र पुढील काळात १० देशातील अडीचशे विद्यार्थी प्रवेशित असतील, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत़  लवकरच परदेशी विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल़ तसेच या विद्यार्थ्यांसाठी विशेष  शिष्यवृत्तीसाठी प्रयत्न केले जातील, असे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी सांगितले.

Web Title: Increasing trend of foreign students towards SRT University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.