दहावी, बारावीचा निकाल १० जूनपूर्वी लावण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 02:27 PM2020-05-06T14:27:36+5:302020-05-06T14:28:15+5:30

सर्व जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्तांना शासनाचे ४ मे रोजी आदेश 

Governments Movements to get the result of 10th and 12th before 10th June | दहावी, बारावीचा निकाल १० जूनपूर्वी लावण्याच्या हालचाली

दहावी, बारावीचा निकाल १० जूनपूर्वी लावण्याच्या हालचाली

googlenewsNext
ठळक मुद्देउत्तरपत्रिका तपासणीच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना संचारबंदी शिथिल

- सुनील जोशी 

नांदेड : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) तथा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १० जूनपूर्वी लावण्याच्या हालचाली जोरात सुरू झाल्या आहेत. परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अन्य कर्मचाऱ्यांना संचारबंदी शिथिल करण्यात यावी, असे आदेश सर्व जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्तांना शासनाने ४ मे रोजी दिले आहेत. 

यंदा बारावीची परीक्षा १८ मार्च रोजी संपली. दहावीचीपरीक्षा २३ मार्चला संपणार होती. परंतु २३ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. पुढे त्यात आणखी वाढ झाल्याने बोर्डाने दहावीचा शेवटचा भूगोलचा पेपरही रद्द केला. सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला. या दरम्यान कोरोना पॉझिटिव्हची वाढती संख्या लक्षात घेता १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला.  लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल कधी लागतो? याकडे सर्वांचे लक्ष होते. कारण, उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीसाठी अडचण निर्माण होत होती. जवळपास ८० टक्के बारावीच्या उत्तरपत्रिका तर दहावीच्या ७० टक्के  उत्तरपत्रिका बोर्डात पोहोचल्या होत्या. उर्वरित उत्तरपत्रिका परीक्षकाकडेच पडल्या आहेत. परीक्षक तपासून मॉडरेटरकडे सादर करतो. लॉकडाऊनमुळे त्या मॉडरेटरकडे पोहोचल्याच नाहीत. पुढे बोर्डातही गेल्या नाहीत. त्यामुळे निकाल रखडतो की काय? अशी शक्यता निर्माण झाली होती.

नियमानुसार दहावी व बारावीचा परीक्षेचा निकाल १० जूनपूर्वी घोषित करणे आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी ४ मे रोजी सर्व जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांच्या नावे आदेश काढून उपरोक्तप्रमाणे सूचना दिल्या                    आहेत. यासाठी काही अटी व शर्थी लागू करुन सूट देण्यात यावी किंवा प्रवासाकरिता परवानगी/पास देण्यात यावा, असे नमूद केले आहे. 

कामाचे स्वरूप : १) उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रावरुन किंवा माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांकडे पाठविणे. २) शिक्षक अथवा शिपायामार्फत उत्तरपत्रिका शाळेतून परीक्षकांच्या घरी घेऊन जाणे. ३) परीक्षकाकडून मॉडरेटरकडे उत्तरपत्रिका पोहोचविणे. ४) मॉडरेटरकडील उत्तरपत्रिका संबंधित विभागीय मंडळाकडे जमा करणे. ५) परीक्षेतील गैरमार्गप्रकरणी चौकशी करण्यासाठी शिक्षण मंडळाच्या नियुक्त अधिकाऱ्यांनी प्रवास करणे

अटी व शर्ती
प्रवास करताना संबंधितांनी त्या कामासाठी मंडळाने दिलेले लेखी आदेश व स्वत:चे ओळखपत्र जवळ बाळगणे व संबंधित अधिकाऱ्यांनी मागणी केल्यास त्यांना दाखविणे वर नमूद कामासाठी अधिनस्त असलेल्या नऊ मंडळातील अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांना प्रवास करता येईल. च्त्यासाठी खाजगी/ सार्वजनिक वाहन वापरता येईल. अथवा वाहतुकीसाठी मंडळाच्या मान्य ठेकेदाराकडील वाहने भाडेतत्त्वावर वापरता येईल. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराकडून मिळालेले ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. तसेच ठेकेदाराकडून अशा कर्मचाऱ्यांची स्वाक्षरीत यादी संबंधित कार्यालयाने प्रमाणित करुन घेणे बंधनकारक राहील. 

Web Title: Governments Movements to get the result of 10th and 12th before 10th June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.