Government should announce how many industries are closed in the state - Sharad Pawar | राज्यात किती उद्योग बंद पडले हे सरकारने घोषीत करावे- शरद पवार
राज्यात किती उद्योग बंद पडले हे सरकारने घोषीत करावे- शरद पवार

ठळक मुद्देराज्यात सर्वच क्षेत्रात मंदीचे वातावरण शेतीमालाला भाव नाही

नांदेड : सत्तेवर असलेल्या भाजप सरकारचे मुख्यमंत्री आता लोकात जावून पाच वर्षात काय दिवे लावले हे सांगत आहेत़ पण प्रत्यक्षात देशात आणि राज्यात सर्वच क्षेत्रात मंदीचे वातावरण असून कारखाने बंद पडत आहेत, शेतीमालाला भाव नाही, दरडोई उत्पन्नात घसरण होत आहे़ अशाही परिस्थितीत राज्यात नवे उद्योग येत असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत़ हे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील किती कारखाने बंद पडले याची संख्या घोषीत करावी असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत शरद पवार यांनी दिले.

नांदेडमध्ये गुरूवारी शरद पवार हे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते़ बीड, लातूर जिल्ह्याचा दौरा  करून पवार हे बुधवारी रात्री उशिरा नांदेडमध्ये दाखल झाले़ गुरूवारी शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यास विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री कमलकिशोर कदम, गंगाधरराव कुंटूरकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, आ़ प्रदीप नाईक, माजी आमदार शंकर धोंडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
देश आणि राज्यातील परिस्थिती काय हे विचारताना राज्यात गेल्यावर्षी १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पवार यांनी सांगितले़ नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़ त्यात बँकांच्या लिलावाच्या नोटीस काढल्यानंतर जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्या करीत आहे़ कृषीमंत्री असताना राज्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली़ त्यावेळी स्वत: त्या शेतकऱ्याच्या घरी जावून माहिती घेतली़ दिल्लीत परतल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान डॉ़ मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करून आठच दिवसात ७१ हजार रूपयांच्या कर्जमाफीची घोषणा केल्याचेही ते म्हणाले़ 

आजचे भाजपा सरकार हे उद्योगपतींचे कर्ज माफ करताना शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडत असल्याचा आरोप त्यांनी केला़ दुसरीकडे आठ दिवसापूर्वी रिझर्व्ह बँकेने बंद पडलेल्या कारखानदारांचे तब्बल ८६ हजार कोटींचे कर्ज भरले आहे़ उद्योगांना कर्जमाफी करताना हाताना रोजगार मिळेल असे स्पष्टीकरण सरकार देत आहे़ पण त्याचवेळी पोटाला लागणारे अन्न पिकवणारा शेतकरी का दुर्लक्षीत केला जात आहे़  शेतीमालाचे भाव वाढले की सरकार इतर देशातून आयात करीत आहे़ ज्या पाकिस्तानाबाबत सरकार असे करू, तसे करू म्हणत आहे त्याच पाकिस्तानकडून कांद्याची आयात केली जात आहे़ शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला आम्ही खुर्चीवर बसू देणार नाही, सरकारने काय करायचे ते करावे असेही त्यांनी स्पष्ट केले़ 

Web Title: Government should announce how many industries are closed in the state - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.