माहूर किल्ला संवर्धनासाठी पुरातत्व विभाग उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 05:10 PM2019-12-26T17:10:53+5:302019-12-26T17:26:59+5:30

रामगड किल्ल्याचे थातूरमातूर काम झाल्याने तीन वर्षांत ‘जैसे थे’ अवस्था

Departments of archeology not interested for the conservation of the Mahur fort | माहूर किल्ला संवर्धनासाठी पुरातत्व विभाग उदासीन

माहूर किल्ला संवर्धनासाठी पुरातत्व विभाग उदासीन

googlenewsNext
ठळक मुद्देसुविधांअभावी पर्यटकांनी फिरविली पाठऐतिहासिक रामगड किल्ला आज पडझडीच्या मार्गावर

माहूर : समुद्रसपाटीपासून २६ फूट उंचीवर इ. स. ७५८ मध्ये बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक रामगड किल्ल्याच्या संवर्धनाबाबत पुरातत्व विभागाच्या उदासीनतेमुळे हा ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सुविधांअभावी पर्यटकांनीसुद्धा या किल्ल्याकडे पाठ फिरविली आहे. 

तीर्थक्षेत्र माहूर हे भौगोलिकदृष्ट्या १९:४५ उत्तर रेखांश आणि ७७:५३ रेखांश पठारावर असलेला प्राचीन ऐतिहासिक ठेवा आहे़ या किल्ल्याला दोन तट आहेत. किल्ल्याचा विस्तार ९ कि.मी. असून या किल्ल्याला डोंगरी किल्ला, गिरी दुर्ग गोंड किल्ला असेही म्हटल्या जाते. किल्ल्याचा पहिला तट राष्ट्रकूट राजींनी तर दुसरा तट देवगिरी साम्राज्याचे राजा रामदेवराय यादव यांनी बांधला आहे. विशेष बाब अशी की, राष्ट्रकुटांनी देवगिरी किल्ला, कंधारचा किल्ला व माहूरचा रामगड किल्ला एकाच कालखंडात बांधला असल्याचे बांधकाम शैली व वास्तुच्या बाबीतील साम्यावरून स्पष्ट होते. प्रवेशद्वारावर संरक्षणासाठी अर्धवर्तुळाकार भिंत बांधलेली आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून पुढे नागमोडी रस्त्याने दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत जाता येते. मुख्य प्रवेशद्वारापासून पुढे नागमोडी वाटेने दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत जाता येते. मुख्य प्रवेशद्वार १३ फूट उंच आणि १० फूट रुंद आहे. पहिल्या प्रवेशद्वारातून ७२५ फूट अंतरावर दुसरे प्रवेशद्वार आहे. रामगिरी किल्ल्यातील इंजाळा तलाव (फुलतीर्थ) जलाशय दुसरे मातृतीर्थ  आहे. 

चोहोबाजूंनी चिरेबंदी बांधकाम असून दोन दोन कठडे आहेत. हवामहलची उंची ५३ फूट व लांबी ५२ फूट आहे. हत्ती दरवाजातून पुढे गेल्यास उजवीकडे पश्चिमेस चिनी महल बांधलेला आहे. या ठिकाणीसुद्धा सैनिक तैनात असायचे. चिनी महलाच्या पश्चिमेस निशाण बुरूजाजवळ दोन मशीद आहेत. किल्ल्यामध्ये त्याकाळी जलव्यवस्थापनाची साधने म्हणजे बारव, तलाव, कटोरा बावडी, गौतम झरा आहेत. जवळपास ५० टक्के भाविक किल्ला पाहण्यासाठी व पर्यटनाचा व निसर्गसान्निध्याच्या सहवासाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी येतात. मात्र, कोट्यवधी रुपये डागडुजीसाठी खर्च केलेला हा किल्ला काम झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षांतच पूर्वीसारख्याच बकाल अवस्थेत पोहोचला. पुरातत्त्व विभागाचे पण या किल्ल्याकडे लक्ष नसल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून किल्ल्याची राखण करून घेत केवळ राखणदारीची औपचारिकता करण्यात येत आहे. त्यामुळे किल्ल्याची संपूर्ण माहिती पर्यटकांना देणारी यंत्रणा व इतर कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक पर्यटकांनी या किल्ल्याकडे पाठ फिरविली आहे.

७० हेक्टर ४० आर क्षेत्र विस्तार
किल्ल्यात संकटकाळातून बाहेर पडण्यासाठी चोरदरवाजाही बांधण्यात आलेला आहे.याचबरोबर सभामंडपाची दक्षिण उत्तर लांबी ४२ फूट व रुंदी २१ फूट आहे. सभामंडपात एकूण १८ स्तंभ आहेत. किल्ल्यात समान आकाराचे ४५ बुरुज आहेत. हा किल्ला ७० हेक्टर ४० आर क्षेत्रावर विस्तारलेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीची लांबी ६ हजार २५४ तर रुंदी २४ फूट आहे. अशाप्रकारची लांबी क्वचितच आढळते. हा ऐतिहासिक रामगड किल्ला आज पडझडीच्या मार्गावर असून पुरातत्त्व विभागाने तीन वर्षांपूूर्वी १२ कोटी रुपये खर्चून किल्ल्याची डागडुजी व दुरुस्ती केली. मात्र करण्यात आलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले. माहूर हे पवित्र तीर्थक्षेत्र प्रभू दत्तात्रेयांचे जन्मस्थान, निद्रास्थान, महासती माता अनसूया, अत्री ऋषीचा आश्रम, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक रेणुकामातेचे मूळ शक्तीपीठ असल्याने जगभरातून दररोज हजारो भाविक माहूरगडावर ये-जा करतात.

Web Title: Departments of archeology not interested for the conservation of the Mahur fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.