Corona Virus In Nanded : उमरीत कोरोनाचा संशयित आढळला; होम क्वारंटाईन नागरिकांवर नाही कोणाचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 08:43 PM2020-03-30T20:43:12+5:302020-03-30T20:56:57+5:30

21 मार्चपासून परतलेल्या तरुणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Corona Virus In Nanded: Sensation in Umari after Corona suspect found | Corona Virus In Nanded : उमरीत कोरोनाचा संशयित आढळला; होम क्वारंटाईन नागरिकांवर नाही कोणाचे लक्ष

Corona Virus In Nanded : उमरीत कोरोनाचा संशयित आढळला; होम क्वारंटाईन नागरिकांवर नाही कोणाचे लक्ष

Next
ठळक मुद्देपर गावातून परतलेले होम कॉरंटाईन बाहेर फिरताना आढळले

उमरी  : तालुक्यातील अब्दुल्लापुरवाडी येथे  कोरोना साथ रोगाचा एक  संशयित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातीच्या काळात तालुक्यात याबाबत काळजी घेतली जात होती  मात्र आता  या प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता दिसून येत आहे. 
      
आज ३० मार्च रोजी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास तीस वर्षे वयाचा एक तरुण  संशयित रुग्ण उमरीच्या  ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला.  वैद्यकीय अधीक्षक डॉ शंकर चव्हाण यांनी त्यास तपासले असता , कोरोना साथरोगाच्या संदर्भातील सर्व  लक्षणे त्याला दिसून आली.   तसेच हा रुग्ण गेल्या २१  मार्च रोजी पुणे येथून त्याची सासुरवाडी असलेल्या  अब्दुल्लापुरवाडी येथे आलेला आहे.  मध्यंतरीच्या कालावधीत तो कुठे गेला ?  कुणाकुणाशी त्याची भेट झाली ?  कोणत्या कार्यक्रमात सामील झाला ?  याची माहिती यंत्रणेमार्फत आता  घेण्यात येत आहे . मात्र तब्बल बारा दिवस त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते हे विशेष होय .

याच गावात पुणे येथून ५०  ते ६० नागरिक आलेले आहेत. या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन देवराये यांनी दिली.  याबाबत तालुक्यात काम करणाऱ्या इतर खात्याच्या   प्रशासकीय यंत्रणेची   कमालीची उदासीनता दिसून येत आहे .  सध्या उमरी तालुक्यात कोरोना साथरोगा विषयी सतर्कता बाळगली जाते .    तसेच बाहेरून आलेल्या नागरिकांची नोंदणी केली जाते.  ही कामे आशा वर्कर ,  अंगणवाडी कर्मचारी , आरोग्य विभागाचे कर्मचारी  आदींकडे  सोपविण्यात आली .  तलाठी , ग्रामसेवक ही  कामे  करीत असल्याचे सांगण्यात येत असले तरीही  मोजकेच तलाठी व  ग्रामसेवक या कामामध्ये दिसून येतात.  कारण अंगणवाडी कर्मचारी व आशा वर्कर यांना गावात योग्य माहिती दिली जात नाही.

या महिला कर्मचारी गावातील रहिवासी  असल्याने त्यांच्यावर काही मर्यादा येतात. होम क्वारंटाईन  असलेल्या एवढ्या लोकांना बाहेर फिरण्यासाठी त्या मज्जाव करू शकत नाहीत.   मात्र तलाठी व ग्रामसेवक या कर्मचाऱ्यांनी  याबाबत अधिक लक्ष देऊन  काम करण्याची गरज आहे.   त्यामध्ये बऱ्याच अंशी ते कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. उमरी तालुक्यात एकूण तीन मंडळ असून १९  सज्जा आहेत.  यात काम करण्यासाठी तलाठी पदाची १९  मंजूर पदे असली तरी फक्त १४  तलाठी कार्यरत आहेत. यातील बहुतांशी कर्मचारी हे नांदेड येथून अपडाऊन करतात.  सहा गावांच्या सज्जावर एक तलाठी काम करीत असून काही तलाठ्यांना सहा पेक्षाही अधिक गावे देण्यात आलेली आहेत.  म्हणून ते या गावावर एकाच वेळी लक्ष ठेवू शकत नाहीत . तसेच तालुक्यात ग्रामसेवकांची ४३  मंजूर पदे असून ४१  ग्रामसेवक कार्यरत आहेत.  दोन पदे रिक्त आहेत . असे असले तरीही तालुक्यातील बहुतांशी मोठ्या लोकवस्तीच्या गावातील ग्रामसेवक तसेच तलाठी गावाकडे फिरकतही नाहीत .  असे चित्र दिसून येत आहे. 

म्हणूनच मुंबई , पुणे,  नागपूर,  हैदराबाद ,  यवतमाळ येथून उमरी तालुक्यात आलेले अनेक नागरिक  होम क्वारंटाईन  असले तरी  वारंवार सूचना देऊनही ते घरामध्ये थांबत नाहीत . उमरीमध्ये असाच प्रकार  चालू असल्याने शेवटी  त्या  होम क्वारंटाईन  नागरिकांना नगरपालिकेतर्फे नोटिसा देऊन घरी बसवावे लागले.  यावरून वादविवादही झाले. शहरात ही अवस्था आहे तर खेडेगावातील परिस्थितीची कल्पनाच न केलेली बरी.   यातील अनेकजण गावामध्ये रिकामटेकडे फिरत आहेत  .  गप्पागोष्टी करण्यासाठी मित्रमंडळींमध्ये बसत आहेत.   याबाबतची माहिती वरिष्ठांकडे पोचविणे तसेच अशा प्रकारच्या नागरिकांना सूचना देणे ही बाब गावातीलच रहिवासी असलेल्या अंगणवाडी,  आशा वर्कर या कर्मचाऱ्यांना  अशक्‍य होत असल्याचे दिसून येत आहे.  मात्र नेमके याकडेच वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असताना दिसून येते आहे.

करोना सारख्या महाभयंकर साथीमुळे संपूर्ण जग हादरून गेलेले आहे आणि अगदी आपल्या गावात ,  गल्लीतच कोरोना सारख्या साथरोगाच्या  बाधित शहरातून अनेक नागरिक आलेले आहेत . म्हणून त्यांची अजून १४  एप्रिल पर्यंत गांभीर्यपूर्वक काळजी घेणे व त्यांच्यावर देखरेख ठेवणे गरजेचे झाले आहे . मात्र आता अन्नदान करणे , मास्क , सॅनिटायझर आदी  वस्तूंचे वाटप करणे अशा सवंग लोकप्रियतेच्या नावाखाली फोटोसेशन सुरू झाले आहे.  यावेळी  सोशल डिस्टन्सींगचा  फज्जा उडत असल्याचे विदारक चित्र   दिसून येत आहे .

विशेष म्हणजे अशाप्रकारच्या  प्रसिद्धीसाठी हपापलेले  काही कार्यकर्ते  व गावपुढारी , अधिकारी वर्गालाही यात सामावून घेऊन  आपला कार्यभार उरकण्याचा केविलवाणा  प्रयत्न करताना दिसत आहेत.  मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याला बळी न पडता  कठोर  भूमिका घेऊन  लॉकडाऊनची   काटेकोरपणे  अंमलबजावणी करावी अशी अनेक नागरिकातून मागणी होत आहे. 


तलाठी आपल्या सज्जावर सकाळी लवकरच दुचाकीवरून जातात व आवश्यक ती माहिती संकलित करतात.   सायंकाळी ते लवकरच परत घरी जातात.  गावामध्ये राहण्यासाठी त्यांच्याकडे कुठलीच व्यवस्था नाही. 
- माधव बोथीकर,तहसीलदार,उमरी.

Web Title: Corona Virus In Nanded: Sensation in Umari after Corona suspect found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.