कौतुकास्पद ! नांदेडच्या गिर्यारोहकाकडून ६१११ मीटर उंचीचे माऊंट युनाम शिखर सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 11:57 PM2021-08-05T23:57:39+5:302021-08-05T23:59:40+5:30

देशातील ८ गिर्यारोहकांपैकी महाराष्ट्रातील एकमेव गिर्यारोहक...!

Admirable! Mount Yunam Peak 6111 meter above sea level from Nanded teacher | कौतुकास्पद ! नांदेडच्या गिर्यारोहकाकडून ६१११ मीटर उंचीचे माऊंट युनाम शिखर सर

कौतुकास्पद ! नांदेडच्या गिर्यारोहकाकडून ६१११ मीटर उंचीचे माऊंट युनाम शिखर सर

Next

- गोविंद टेकाळे
अर्धापूर(नांदेड) : - तालुक्यातील मालेगाव येथील शिक्षक असलेले गिर्यारोहक ओमेश पांचाळ यांनी हिमाचल प्रदेशातील लाहौल भागात असलेले माऊंट युनाम हे ६१११ मी.उंची असलेले शिखर सर केले असून या मोहीमेत देशातील ८ गिर्यारोहकांपैकी ते एकमेव महाराष्ट्रातील गिर्यारोहक होते.५ ऑगस्ट रोजी ते मालेगाव ता.अर्धापूर या मूळ गावी परतले असता गावकर्यांनी त्यांचे मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून जल्लोषात स्वागत केले.

२४ जुलै रोजी मनाली येथून निघाल्यानंतर किलॉंग जिस्पा,बारालाचा यामार्गे भरतपूर येथून त्यांची चढाई सुरू झाली. सुरूवातीला भरतपूर येथे पोहोचल्यानंतर त्यांचा ऑक्सिजन ५५ इतकाच दाखवत होता.परंतू विविध पद्धतीने वातावरणाशी जुळवून घेत त्यांनी स्वत:ची ऑक्सिजन पातळी वाढवून ८० पर्यंत नेली व चढाईसाठी सज्ज झाले.याठिकाणाहून त्यांच्या चमूमधील १ जण आजारी पडल्यामूळे त्यांना माघार घ्यावी लागली.भरतपूर ते कॅम्प१ ही खडी चढाई असून ओढे-नाले क्रॉस करत सर्व जण कॅम्प १ जो कि १७००० फूटांवरती आहे तेथे पोहोचले.इथे पोहचल्यानंतर पुन्हा एकदा सर्व गिर्यारोहकांची ऑक्सिजन लेव्हल तपासण्यात आली.सर्व काळजी घेत व लोड फेरी करत सर्वांनी २ दिवस याठिकाणी घालवले. 
 


समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणावर गेल्यानंतर शरीराला त्या वातावरणाशी समरस होण्यासाठी वेळ द्यावा लागतो व शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवावे लागते. त्यासाठी सतत पाणी पिणे,दिवसा न झोपणे,शारिरिक हालचाली करत राहणे आवश्यक असते.हळूहळू उंची गाठत जावे लागते.आवश्यक ती सर्व काळजी घेत ३० तारखेला सकाळी शिखराला गवसणी घालण्याचे ठरले.चढाईला सुरू करण्याअगोदर सर्व सदस्यांना चढाईचे योग्य प्रशिक्षण देण्यात आले होते.सकाळी २.३० वा.चढाईला सुरूवात झाली.परंतू चमूतील अजून एक सदस्य  थकवा वाटत असल्या कारणाने माघारी परतला.शेवटच्या कॅम्पवरून म्हणजे १७००० फूटांवरून २०१०० चे अंतर गाठायचे होते.वाटेत अणकुचीदार दगड व खडकांनी आच्छादलेला रस्ता साधारणपणे ६ तास चालल्यानंतर शेवटच्या टप्प्यात बर्फ लागतो व शिखरमाथ्यावर पोचल्यानंतर तेथून चंद्रभागा व मुलकिला या रांगेतील पर्वत दिसू लागले.
 

पावसापासून व बर्फ वर्षावापासून बचाव करत सर्वजण १०.३० वा. युनाम शिखराच्या माथ्यावर पोहोचले.परत उतरत असताना वातावरण अचानक बदलल्यामूळे सगळीकडे व्हाईटआऊट झाले,परंतू रस्त्याचा अंदाज घेत‌ गाईडच्या मदतीने  त्यांनी कॅम्पसाईट गाठली. अशाप्रकारे २०१०० फूटांवरील शिखर सर करून ओमेश पांचाळ यांनी नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

Web Title: Admirable! Mount Yunam Peak 6111 meter above sea level from Nanded teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.