जागतिक बांबू दिन; ग्लाेबल वार्मिंगच्या समस्येवर बांबू हे रामबाण औषध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 07:00 AM2021-09-18T07:00:00+5:302021-09-18T07:00:11+5:30

Nagpur News ग्लाेबल वार्मिंगमुळे येत्या काळात पृथ्वीवरील तापमान २ अंशाने वाढेल आणि भारतातील समुद्राजवळ असलेले मुंबईसह १२ शहरे समुद्राच्या पाण्यात बुडतील, असा धक्कादायक रिपाेर्ट आयपीसीसीने नुकताच दिला आहे.

World Bamboo Day; Bamboo is the panacea for the problem of global warming | जागतिक बांबू दिन; ग्लाेबल वार्मिंगच्या समस्येवर बांबू हे रामबाण औषध

जागतिक बांबू दिन; ग्लाेबल वार्मिंगच्या समस्येवर बांबू हे रामबाण औषध

googlenewsNext
ठळक मुद्देपेट्राेल-डिझेल, वीज केंद्रातील काेळशालाही पर्याय

निशांत वानखेडे

नागपूर : ग्लाेबल वार्मिंगमुळे येत्या काळात पृथ्वीवरील तापमान २ अंशाने वाढेल आणि भारतातील समुद्राजवळ असलेले मुंबईसह १२ शहरे समुद्राच्या पाण्यात बुडतील, असा धक्कादायक रिपाेर्ट आयपीसीसीने नुकताच दिला आहे. प्रचंड वाढलेला इंधनाचा वापर आणि औष्णिक वीज केंद्रातील कार्बनचे उत्सर्जन हे कारणीभूत ठरले आहे. या भीषण समस्येवर बांबूची लागवड हा रामबाण उपाय ठरू शकताे, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

माजी आमदार व बांबू शेतीचे प्रणेते पाशा पटेल यांनी ग्लाेबल वार्मिंगची समस्या साेडविण्यासाठी बांबू लागडवडीचे महत्त्व विषद केले आहे. इंटरनॅशनल पॅनल ऑफ क्लायमेट चेंजच्या अहवालानुसार हवेतील कार्बन वाढले असून तापमान वाढले आहे. हे कमी करण्यासाठी काेळशापासून वीज निर्मिती बंद करावी लागेल आणि पेट्राेल, डिझेल या इंधनाचा वापर कमी करावा लागणार आहे. जमिनीच्या पाेटातून कार्बन काढणे, ही गाेष्ट मानवी विनाशाला कारणीभूत ठरणार आहे. यासाठी बांबू हा माेठा पर्याय ठरू शकताे, असा विश्वास पाशा पटेल यांनी व्यक्त केला.

असे आहेत बांबूचे फायदे

- बांबूपासून इथेनाॅलची निर्मिती हाेते. हे इथेनाॅल पेट्राेल, डिझेलचा पर्याय आहे. एक लिटर पेट्राेल जाळल्याने ३ किलाे कार्बन उत्सर्जन हाेते.

- औष्णिक वीज केंद्रात वीज निर्मितीसाठी दगडी काेळशाचा वापर बंद करून बांबूचा वापर उत्तम पर्याय आहे. बांबूचा उष्मांक व काेळशाचा उष्मांक सारखाच आहे.

- बांबूचे वृक्ष तुलनेत ३० टक्के अधिक कार्बन नष्ट करते.

- माणसाला एका वर्षात २८० किलाे ऑक्सिजनची गरज पडते. बांबूचे एक झाड वर्षाला ३२० किलाे ऑक्सिजन साेडते.

- बांबूपासून तांदूळ तयार हाेतो. फर्निचर, इमारती, कापड, लाेणचे, मुरब्बा व इतर अनेक वस्तू तयार हाेतात.

- बांबू प्लास्टिकला, लाेखंडाला व सिमेंटलाही पर्याय ठरताे. चंद्रपूरच्या चिचपल्ली गावात शासनाने १०० काेटीची बांबूची इमारत तयार केली आहे.

- बांबू लागवड वाढली तर वनाच्छादनाचा टक्का वाढेल. शेतकऱ्यांना लाभ मिळेल, राेजगारही वाढेल.

२०२२ मध्ये इथेनाॅल रिफायनरी

आसामच्या लुमालीगड येथे भारत, फिनलॅंड व नेदरलॅंड या देशांच्या सहकार्याने ३००० काेटींची गुंतवणूक करून बांबूपासून इथेनाॅल निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. ऑगस्ट २०२२ पर्यंत ही बांबू इथेनाॅल रिफायनरी सुरू हाेईल, अशी शक्यता आहे.

- गडचिराेलीत बांबूपासून वीज निर्मिती

सध्या गडचिराेलीजवळ वैनगंगा नदीच्या काठावर वायुनंदन पाॅवर लिमिटेडद्वारे बांबू, धानाचा भुसा व कपाशीच्या सरकीच्या मिश्रणातून यशस्वीपणे वीज निर्मिती केली जात आहे.

तर मानवजातीच्या विनाशाला सुरुवात

इंधनाचा वापर सुरू झाला तेव्हा कार्बनचे उत्सर्जन २८० पीपीएम हाेते. गेल्या वर्षी ते ४१२ पीपीएम हाेते व यावर्षी ते ४२२ पीपीएम आहे. पृथ्वीवरील सजीव सृष्टी सामान्य ठेवायची असेल तर कार्बन उत्सर्जन २३० पीपीएम मर्यादित राहणे गरजेचे आहे. उत्सर्जन ४५० पीपीएमवर गेल्यास मानवजातीच्या विनाशाला सुरुवात हाेईल.

यावर्षी आमच्या नर्सरीमधून शेतकऱ्यांनी ३ लाख बांबू राेपांची मागणी केली आहे. बांबूची लागवड नक्कीच वाढेल. राज्य शासनाने बांबूपासून वीज निर्मिती व्यवहार्य आहे का, हे तपासण्यासाठी समिती स्थापन केली आहे. समितीचा रिपाेर्ट आल्यावर माेठ्या प्रमाणात बांबूची गरज भासणार आहे. यामुळे वनाच्छादन वाढेल व शेतकऱ्यांचा फायदाही.

- पाशा पटेल, बांबू शेतीचे प्रचारक

Web Title: World Bamboo Day; Bamboo is the panacea for the problem of global warming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.