नागपूर विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर कामाचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 09:41 PM2020-09-14T21:41:17+5:302020-09-14T21:42:34+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागातील प्राध्यापकांची पदे तर मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेतच. परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदेदेखील रिक्त आहेत. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवरदेखील कामाचा ताण जास्त वाढलेला आहे.

Work stress on Nagpur University officials | नागपूर विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर कामाचा ताण

नागपूर विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर कामाचा ताण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागातील प्राध्यापकांची पदे तर मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेतच. परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदेदेखील रिक्त आहेत. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवरदेखील कामाचा ताण जास्त वाढलेला आहे. गट ‘अ’ व ‘ब’ प्रवर्गातील अधिकाऱ्यांची तर ७५ टक्के पदे रिक्त आहेत. अशा स्थितीत ‘नॅक’च्या मूल्यांकनात ‘ए प्लस’ श्रेणी व ‘एनआयआरएफ’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क) पहिल्या शंभरात स्थान कसे मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपूर विद्यापीठात कर्मचारी व अधिकारी मिळून एकूण ३८ टक्के पदे रिक्त आहेत. अनेक विभागात तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा घेतली जात आहे. ‘अ’ प्रवर्गातील ६० पैकी ४१ पदे रिक्त आहेत. तर ‘ब’ प्रवर्गातील ५२ पैकी ४३ पदे रिक्त आहेत. दोन्ही प्रवर्गातील रिक्त पदांची टक्केवारी अनुक्रमे ६८.३३ व ८२.६९ टक्के इतकी आहे. ‘क’ प्रवर्गात ४७६ मंजूर पदे असून त्यातील १५८ पदे रिक्त आहेत. तर ‘ड’ प्रवर्गात २७६ पदांपैकी ८९ पदे रिक्त आहेत. नागपूर विद्यापीठात गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापकांची पदभरती झालेली नाही. दुसरीकडे दरवर्षी विविध विभागातील कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. याचा फटका विभागांमधील प्रशासकीय प्रणालीला बसतो आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तर कामाचा विशेष ताण आहे. परीक्षा विभागात तर अनेकदा कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत आहे.
विविध विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. एकूण मंजूर पदांपैकी सुमारे ३८ टक्के पदे रिक्त आहेत. राज्य शासनाकडून पदभरतीला अद्यापही हिरवा ‘सिग्नल’ मिळालेला नाही.

शिक्षक भरतीदेखील रखडलेलीच
विद्यापीठातील पदव्युत्तर विभागांत ३३४ पदांना मंजुरी आहे. मात्र, सध्या केवळ १४० प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यामुळे रिक्त पदांचा आकडा १९४ एवढा आहे. येत्­या काही महिन्यात काही प्राध्यापक रिक्त होणार आहेत. त्यामुळे यात वाढ होणार आहे. शिक्षक भरतीदेखील अनेक वर्षांपासून रखडलेलीच आहे.

रँकिंग कसे वाढणार
विद्यापीठाच्या नॅक मूल्यांकनाची गाडी अद्यापही अडलेलीच आहे. यात रिक्त जागांची संख्या डोकेदुखी ठरू शकते. दुसरीकडे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ‘रँकिंग फ्रेमवर्क’ जाहीर करणाऱ्या ‘रँकिंग’मध्ये पहिल्या १०० मध्ये येण्यासाठी विद्यापीठाचा दर्जा वाढणे आवश्यक आहे. यासाठी रिक्त जागा भरल्या गेल्या पाहिजेत.

Web Title: Work stress on Nagpur University officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.