आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 05:53 IST2025-12-09T05:52:46+5:302025-12-09T05:53:29+5:30
ते मुख्यमंत्र्याच्या इशाऱ्यावर नाचतात, असा दावा केला. त्याचा धसका गटाच्या नेत्याने घ्यायला पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला. यावरून विधिमंडळ परिसरात चांगलीच चर्चा रंगली.

आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
मंगेश व्यवहारे
नागपूर : हिवाळी अधिवेशनादरम्यान पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीवरून रंगलेली चर्चा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वेगळ्याच वळणावर नेली. एक पक्ष दोन गटाच्या सरकारमध्ये एका गटाचे २२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या गळाला लागले आहेत.
ते मुख्यमंत्र्याच्या इशाऱ्यावर नाचतात, असा दावा केला. त्याचा धसका गटाच्या नेत्याने घ्यायला पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला. यावरून विधिमंडळ परिसरात चांगलीच चर्चा रंगली. या चर्चेत शिंदेसेनेच्या नेत्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनीही आपली स्पष्टोक्ती देत ते आमचेच आमदार असल्याचे सूतोवाच करीत आदित्य ठाकरेंच्या दाव्याला पूर्णविराम दिला.
शिंदेसेना खरी शिवसेना, तो आमचा मित्रपक्ष : मुख्यमंत्री
सत्ताधाऱ्यांच्या एका गटाचे २२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या गळाला लागले आहेत, ते मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचतात, अशी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सभागृहाबाहेर केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिंदेसेना खरी शिवसेना आहे. तो आमचा मित्रपक्ष आहे. त्यांचे आमदार घेऊन आम्ही काय करणार, ते आमचेच आमदार आहेत, असे राजकारण आम्ही करीत नाही. उलट शिंदेसेना मजबूत व्हायला हवी, अशी आमची भूमिका आहे.
आदित्य ठाकरेंचे सूत्र चुकीचे : संजय शिरसाट
शिंदेसेनेचे २२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या गळाला लागले आहेत, अशी माहिती विधिमंडळ परिसरात आदित्य ठाकरेंनी दिली. मुळात त्यांना माहिती देणारे सूत्रच चुकीचे आहे. महायुतीमध्ये कुठलेही मतभेद, मनभेद नाहीत. आमच्या आमदारांवर आमचा विश्वास असून, ते कुठेही जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधिमंडळ परिसरात दिली.