रंगभूमीवर नाटक आणताना, त्याची 'सेल्फ लाईफ' ठरवून घ्यावी : दिलीप प्रभावळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 10:20 PM2020-01-04T22:20:38+5:302020-01-04T22:27:21+5:30

प्रत्येक प्रॉडक्टची एक्स्पायरी डेट असते. नाटकही एक उत्पादनच आहे. तेव्हा ते प्रॉडक्शन रंगभूमीवर आणताना नटांनी त्याचे ‘सेल्फ लाईफ’ ठरवणे गरजेचे आहे.

When bringing drama to the theater, its self-life should be decided upon: Dilip Prabhavalkar | रंगभूमीवर नाटक आणताना, त्याची 'सेल्फ लाईफ' ठरवून घ्यावी : दिलीप प्रभावळकर

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा सत्कार करताना महापौर संदीप जोशी, डॉ. सतीश देवपुजारी, डॉ. पंकज चांदे, पद्मगंधाच्या शुभांगी भडभडे, विजया ब्राह्मणकर

Next
ठळक मुद्देनटाने भूमिका जगू नये तर साकारावीपद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रत्येक प्रॉडक्टची एक्स्पायरी डेट असते. नाटकही एक उत्पादनच आहे. तेव्हा ते प्रॉडक्शन रंगभूमीवर आणताना नटांनी त्याचे ‘सेल्फ लाईफ’ ठरवणे गरजेचे आहे. नाटक कधी बंद करतोस, असे म्हणण्यापेक्षा, नाटक बंद का केलेस, असा प्रश्न उपस्थित होणे कधीही आरोग्यदायी असल्याचा नाट्यधडाच प्रथितयश रंगकर्मी व लेखक दिलीप प्रभावळकर यांनी आज येथे दिला.
पद्मगंधा प्रतिष्ठानच्यावतीने दिलीप प्रभावळकर यांना ‘नलिनी बाळकृष्ण देवपुजारी स्मृती जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी प्रभा देऊस्कर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत प्रभावळकर यांनी रंगकर्मीचे धडे देण्यासोबतच, स्वत:च्या रंगकर्मी आयुष्याचा पटही उलगडत नेला. यावेळी, महापौरसंदीप जोशी, डॉ. सतीश देवपुजारी, कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे, पद्मगंधाच्या अध्यक्ष शुभांगी भडभडे व उपाध्यक्ष विजया ब्राह्मणकर उपस्थित होते.
१३५ कुटुंब असणाऱ्या सहनिवासात माझे बालपण गेले. त्यामुळे, तेथे कोणत्याही प्रकारच्या अभिव्यक्तीला सहजच वाव मिळाला. गणेशोत्सवात नाटक करत असतानाच वृंदावन दंडवते यांनी मला रंगायनमध्ये नेले आणि राज्य नाट्य स्पर्धेतून नाटकांच्या मुख्य प्रवाहात आलो. ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकात रत्नाकर मतकरी यांच्या कल्पनेने मी चेटकीणीची भूमिका साकारली. प्रयोग गाजला आणि माझ्या पात्राची तुलना शेक्सपिअरच्या ‘मॅकबेथ’मधील चेटकीणीशी झाली. त्या काळात पुरुषाने बाईचे पात्र निभावणे कौतुकाचाच विषय ठरला. चि.वि. जोशी यांच्या ‘चिमणराव’मधील चिमणराव प्रचंड गाजला. पुढे व्ही. शांताराम यांनी मला चित्रपटात ऑफर दिली. मात्र, व्यस्त शेड्युलमुळे मी तो चित्रपट नाकारला. मात्र, पुढे चित्रपटात पदार्पण केलेच. माझ्या आयुष्यात काही भूमिकांसाठी तयारी केली तर काही भूमिका अगदी वेळेवर निभवाव्या लागल्या. मात्र, ‘चौकट राजा’ ही भूमिका अक्षरश: आदळल्याचे ते म्हणाले.
या चित्रपटात मी स्मिता तळवलकरांच्या नवऱ्याची भूमिका साकारणार होतो आणि गतिमंद मुलाची भूमिका परेश रावल साकारणार होते. कोल्हापूरला चित्रिकरण होते. मी मुंबईहून निघणार तोच स्मिताचा फोन आला आणि तुला नवरा नाही तर गतिमंद साकारायचा हे तिने सांगितले. मी चाट पडलो. ती भूमिका साकारावी, यासाठी माझ्याकडे कुठलेही स्टडी मटेरियल नव्हते की तसा काही अनुभव. मात्र, ऐनवेळी ती भूमिका साकारली. या चित्रपटात वास्तविक गतिमंद मुलांसोबत मी नृत्य केले आहे. दडपणाखाली तुमची क्रिएटीव्हीटी काम करते, हे यातून सिद्ध झाले. विशेष म्हणजे, खºया जगातील वास्तव व चित्रपटातील वास्तवाच्या कोपऱ्यात मी उभा होतो, हा आयुष्याचा महत्त्वाचा अनुभव मी यातून घेतल्याचे प्रभावळकर सांगत होते. मी ती भूमिका जगलो नाही आणि जगायचीही नव्हती. कोणताही चांगला नट भूमिका जगावी, असे कधीच सांगणार नाही तर ती भूमिका निभवावी, असेच सांगेल. स्वत:तला मी, रंगमंचावर वावरणाऱ्या पात्रातील मी आणि प्रेक्षकांमध्ये असणारा मी, या ‘तीन-मी’ ला समजून भूमिका साकारावी लागते, असे ते म्हणाले. ‘लगे रहो मुन्नाभाई’मध्ये मला वृद्धाश्रमातील टवाळखोर म्हाताऱ्यांपैकी एक भूमिका साकारायची होती. मात्र, राजू हिराणी व विधू विनोद चोपडा यांनी मला बघताच, त्यांना माझ्यात गांधी दिसला. मी बारीक होतो मात्र उंच गांधी कसा? तर आम्हाला हवा असलेला गांधी असाच, असे ते म्हणाले आणि ती भूमिका माझ्या खात्यात जमा झाल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला. यावेळी त्यांनी तात्या विंचू, साळसूदमधील क्रूर खलनायक, हसवाफसवी हे लिहिलेले नाटक व ऐन भरात असताना मोह टाळून बंद केलेले प्रयोग, ‘कागदी बाण’ हे पुस्तक व ‘बोक्या सातबंडे’ या श्रुतींची झालेली कथा, नाटक व सिनेमा अशा विविधांगी बाजूने आपल्या भावना व्यक्त केल्या. स्वस्तीमंत्र अनुराधा कुऱ्हेकर व पुष्पा कानेटकर यांनी म्हटले. डॉ. अंजली पारनंदीवार यांनी सरस्वती स्तवन केले. प्रास्ताविक शुभांगी भडभडे यांनी केले तर आभार संगीता वाईकर यांनी मानले.

संदीप जोशी यांनी केली मदतीची घोषणा
यावेळी बोलताना महापौर संदीप जोशी यांनी महिलांद्वारे चालविण्यात येणाऱ्या पद्मगंधाच्या या पुरस्कार सोहळ्यात पुढच्या वर्षापासून नागपूर महानगरपालिकेचा सहभाग असेल, अशी घोषणा केली. या सोहळ्यातील एक महत्त्वाचा वाटा महापालिका स्वीकारेल, असा विश्वास त्यांनी दिला.

मुलाखतकार बोलूच देईना!
दिलीप प्रभावळकर यांची मुलाखत घेणाऱ्या महिला मुलाखतकाराकडे स्वत:वर नियंत्रण ठेवण्याचे कसब शून्य होते. प्रभावळकरांचे बोलणे अर्धवट असतानाच मुलाखतकार लगेच दुसऱ्या प्रश्नाचा मारा करत असल्याने, बरेचदा ते अवघडल्यासारखे झाले होते. कदाचित मुलाखत घेण्यापेक्षा स्वत: काढलेले प्रश्न पूर्ण करण्याची घाई मुलाखतकाराच्या एकूणच देहबोलीत दिसून येत होती. मुलाखत देणाऱ्याची लिंक लागली की तो स्वत:च्या स्मृतीत रमलेला असतो आणि उपस्थितांसमोर व्यक्त होत असतो. अशात त्याची ती लिंक तोडली की तो निराश होतो. मधेच प्रभावळकरांनी त्यांना टॉण्टही मारले. मात्र, स्वत:च्याच आविर्भावात असलेल्या मुलाखतकाराला प्रभावळकरांनी मारलेला टॉण्ट समजला नसावा. कदाचित पुरुषांना कुठल्याही व्यासपीठावर नियंत्रित ठेवण्याचा अट्टहास भासवण्याचा हा प्रयत्न होता की काय, असे वाटत होते.

Web Title: When bringing drama to the theater, its self-life should be decided upon: Dilip Prabhavalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.