उद्योगांचे चाक मंदावले; कंपन्यांना माणसे अन् कामगारांना काम मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 10:22 AM2021-05-12T10:22:12+5:302021-05-12T10:23:16+5:30

Nagpur News लॉकडाऊनचा परिणाम सर्वत्र दिसून येत असून उद्योगांचे चाक मंदावले असून कंपन्यांना माणसे आणि कामगारांना काम मिळेनासे झाले आहे.

The wheel of industry slowed; Companies don't get jobs for people and workers! | उद्योगांचे चाक मंदावले; कंपन्यांना माणसे अन् कामगारांना काम मिळेना!

उद्योगांचे चाक मंदावले; कंपन्यांना माणसे अन् कामगारांना काम मिळेना!

googlenewsNext
ठळक मुद्देकच्च्या मालाचे दर वाढलेबाजारपेठांमध्ये मागणी कमी, उत्पादनात घट

मोरेश्वर मानापुरे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : विविध राज्यातील लॉकडाऊनमुळे बाजारपेठांमध्ये फिनिश मालाला मागणी कमी झाली आहे. त्यामुळे कंपन्यांनी उत्पादनात घट केली आहे. त्यातच काही उद्योजकांनी कंपन्या बंद केल्या असून कामगारात कपात केली आहे. काही कामगार स्वगृही परतले आहेत. लॉकडाऊनचा परिणाम सर्वत्र दिसून येत असून उद्योगांचे चाक मंदावले असून कंपन्यांना माणसे आणि कामगारांना काम मिळेनासे झाले आहे.

नागपूर जिल्ह्यात जवळपास २,२०० लघू, मध्यम आणि मोठे उद्योग आहेत. पण त्यापैकी बुटीबोरी आणि हिंगणा एमआयडीसीमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त उद्योग गेल्यावर्षीपासूनच बंद आहेत. कळमेश्वर औद्योगिक क्षेत्रात ८० टक्के कंपन्या सुरू आहेत. याशिवाय जिल्ह्यात सूक्ष्म उद्योग ३ हजारांपेक्षा जास्त आहेत. यातील अर्ध्यापेक्षा जास्त उद्योग फिनिश मालाच्या मागणीअभावी बंद आहेत. राज्यात बहुतांश जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. याशिवाय वाहतूक बंद असल्याने मालाची ने-आण बंद आहे. काही कंपन्यांना ऑर्डर आहेत, पण माल पाठविल्यानंतर पैसा येणे बंद झाले आहे. त्यामुळे अनेकांनी ऑर्डर असतानाही फिनिश माल पाठविणे बंद केले आहे. त्यातच सहा महिन्यात लोखंडाचे दर प्रति किलो १० रुपयांनी वाढले आहेत.

हिंगणा एमआयडीसी व बुटीबोरी औद्योगिक भागात इंजिनिअरिंग फॅब्रिकेशनच्या कंपन्या जास्त आहेत. पूर्वीचे बँकांचे देणे आहे. नव्याने भांडवल टाकण्याची कुणीचीही इच्छा नाही. शिवाय ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याने वेळेत कामे होते नाहीत. ही मोठी अडचण आता कंपन्यांपुढे आली आहे. जुने ऑर्डर कमी दरातील आहेत. कच्चा माल अर्थात लोखंड जास्त दरात खरेदी करून जुन्या ऑर्डरची पूर्तता करणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेकांनी सध्या तरी उत्पादन केले आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर बाजाराची स्थिती पाहून कंपन्या सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.

मिहान आणि परसोडी आयटी सेक्टरमध्ये आयटी कंपन्या सुरू असून तेथील ९० टक्के अभियंते आणि कर्मचारी घरूनच काम करीत आहेत. ग्लोबल स्तरावर आयटी क्षेत्राची स्थिती सध्या चांगली नसल्याने या क्षेत्रातही मंदीचे वातावरण आहे.

कंपन्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा

कच्च्या मालाचा मुबलक पुरवठा आहे, पण दर वाढले आहेत. बुटीबोरीत जवळपास ३५० कंपन्या सुरू असून ४० टक्के क्षमतेने उत्पादन करीत आहेत. शासनाचे नियमाने काम सुरू आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने काही कंपन्यांचे काम थांबले आहे.

प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन.

-तर कंपन्या बंद कराव्या लागतील

कच्च्या मालाचे वाढलेले दर, शासनाचे कठोर नियम आणि फिनिश मालाला मागणी नसल्याने पुढे अनेकांना कंपन्या बंद कराव्या लागतील. नव्याने भांडवल कुणीही टाकणार नाही. हिंगण्यातील जवळपास १ हजार कंपन्यांपैकी ५५० कंपन्या सुरू आहेत. कंपन्यांची स्थिती गंभीर आहे.

चंद्रशेखर शेगावकर, अध्यक्ष, हिंगणा एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशन.

पूर्ण क्षमतेने काम सुरू

कळमेश्वर इंडस्ट्रीज परिसरात जवळपास १२० कंपन्या असून त्यातील २० टक्के कंपन्या गेल्यावर्षीपासून बंद आहेत. पूर्ण क्षमतेने काम सुरू आहे. कंपन्यांमधील कामगार याच भागातील आहेत. एप्रिल महिन्यात मजूर व कर्मचारी कोरोना रुग्ण असल्याची संख्या जास्त होती.

अमर मोहिते, अध्यक्ष, कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशन.

कंपन्यांमध्ये उत्पादन कमी झाल्याचा परिणाम कामगारांच्या रोजगारावर होत असून अनेक जण घरी बसले आहेत. कंपन्या काही प्रमाणात वेतन देत असल्या तरी पुढे रोजगाराची स्थिती गंभीर होणार आहे.

सदाशिव टाके, कामगार.

बुटीबोरी भागातील काही कामगार स्वगृही परतले आहेत. येथील काहीच कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. पण उत्पादन कमी केलेल्या कंपन्यांमध्ये कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुमेर द्विवेदी, कामगार.

औद्योगिक वसाहती, सुरू उद्योग (टक्क्यांत)

बुटीबोरी इंडस्ट्रीज ४० टक्के

हिंगणा एमआयडीसी ५० टक्के

कळमेश्वर एमआयडीसी ८० टक्के

कच्चा माल मिळण्यास अडचणी

विविध राज्यात लॉकडाऊनची स्थिती आणि वाहतूक बंद असल्याने हवा तेवढा कच्चा माल मिळण्यास अडचणी येत आहेत. याशिवाय फिनिश मालाच्या विक्रीचा प्रश्न आहेच. फिनिश मालाचा पैसा येण्यास अडचण आहे. त्यामुळे उद्योजकांमध्ये उत्साह नाही. कच्च्या मालाच्या किमतीत बरीच वाढ झाली आहे. त्यामुळे काही प्लास्टिक इंडस्ट्रीज बंद झाल्या आहेत. सहा महिन्यात लोखंडाच्या किमतीत प्रति किलो १० ते १२ रुपयांची वाढ झाल्याने कंपन्यांसमोर ऑर्डरची पूर्तता आणि मालाचे उत्पादन करणे कठीण झाले आहे.

Web Title: The wheel of industry slowed; Companies don't get jobs for people and workers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.