रेल्वेत पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय : प्रशासनाच्या नावाने ओरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 11:51 PM2019-09-02T23:51:35+5:302019-09-02T23:52:22+5:30

रेल्वेच्या शौचालयांमध्ये पाणीच नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून नागपुरात पोहोचलेल्या महिलेने या प्रकारावर संताप व्यक्त करीत उप स्टेशन व्यवस्थापक कार्यालयात लेखी तक्रार नोंदविली आहे.

Water shortage in railway: shout in the name of administration | रेल्वेत पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय : प्रशासनाच्या नावाने ओरड

रेल्वेत पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय : प्रशासनाच्या नावाने ओरड

Next
ठळक मुद्देनागपूर स्थानकावर प्रवासी महिलेची लेखी तक्रार

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : रेल्वेच्या शौचालयांमध्ये पाणीच नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून नागपुरात पोहोचलेल्या महिलेने या प्रकारावर संताप व्यक्त करीत उप स्टेशन व्यवस्थापक कार्यालयात लेखी तक्रार नोंदविली आहे. ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधील इतर प्रवाशांनीसुद्धा प्रशासनाच्या नावाने आरडाओरड करून आपला रोष व्यक्त केला.
१२१०२ हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस रविवारी रात्री नियोजित वेळेत रवाना झाली. पहिले रेल्वेस्थानक येण्यापूर्वीच बी-३ क्रमांकाच्या कोचमधील दोन्ही बाजूच्या शौचालयांमध्ये पाणी येणे बंद झाले. याच डब्यातून शर्मिला सेनसागर या मुलासह प्रवास करीत होत्या. त्यांनी याबाबत सफाई कर्मचाऱ्यांना सूचना दिली. त्यांनी टीटीकडे बोट दाखविले. यामुळे त्यांनी टीटीलासुद्धा पाणी नसल्याचे सांगितले. बिलासपूर स्थानकावर पाणी भरले जाईल, असे सांगून टीटीने वेळ मारून नेली. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही गाडी बिलासपूर स्थानक सोडून पुढे रवाना झाली. मात्र तरीही कोचमध्ये पाणी भरण्यात आले नाही. यामुळे अन्य प्रवाशांसोबतच शर्मिला सेनसागर यांनी रोष व्यक्त करीत जाब विचारला. त्यांनी बी-३ क्रमांकाच्या डब्यात जाऊन बघितले असता तिथेसुद्धा पाणी नव्हते. कर्मचारी, टीटीची कान उघाडणी केली. यानंतर अचानक नळाला पाणी आले. याचा अर्थ टाकीत पाणी असले तरी ते बंद करून ठेवण्यात आले होते. पाणी आल्यावरसुद्धा फ्लशर मात्र योग्यरीत्या काम करीत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. ही गाडी नागपूर स्थानकावर पोहचल्यानंतर सेनसागर यांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात पाणी बंद का करून ठेवले, असा सवाल उपस्थित करीत लेखी तक्रार नोंदविली.

हा तर नित्याचाच प्रकार
कामाच्या निमित्ताने दर आठवड्यातच हावडाला जाणे येणे करावे लागते. या मार्गावर नेहमीच अशीच अवस्था असते. पाणीच राहत नसल्याने शौचालये अस्वच्छ असतात. मनस्ताप सहन करीत प्रवास करावा लागत असल्याचे शर्मिला सेनसागर यांनी सांगितले. रेल्वेत दोन स्वच्छता कर्मचारी असतात, त्यामुळे शौचालयात पाणी आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी त्यांची असून ते जबाबदारी झटकतात. याचा प्रवाशांना मनस्ताप होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Water shortage in railway: shout in the name of administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.