Warning of intense agitation for reservation | आरक्षणासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा

आरक्षणासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा

ठळक मुद्देसकल मराठा समाज : मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षण व शासकीय सेवेमध्ये आरक्षण मिळविण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. समाजाच्या शिष्टमंडळाने सोमवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. आरक्षण चळवळीचे मुख्य संयोजक राजे मुधोजी भोसले व राजे संग्रामसिंग भोसले यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती देऊन अन्याय केला आहे. राज्य सरकार मराठा आरक्षण टिकवून ठेवण्यात अपयशी ठरले. त्यामुळे मराठा समाजामध्ये रोष आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षण कायम ठेवण्याकरिता तातडीने पावले उचलली नाहीत, असे निवेदनात नमूद करण्यात आले. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध त्वरित फेरविचार याचिका दाखल करण्यात यावी, राज्याला असलेल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करून मराठा समाजाला शिक्षण व शासकीय सेवेमध्ये आरक्षण सुरू ठेवण्याचा आदेश जारी करण्यात यावा, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत त्यांच्या वाट्याच्या नोकºया रिक्त ठेवण्यात याव्यात, आरक्षण चळवळीतील मराठा समाजबांधवांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत, मराठा आरक्षणाकरिता केंद्र सरकारने प्रयत्न करावेत इत्यादी मागण्या सरकारला करण्यात आल्या. शिष्टमंडळात नरेंद्र मोहिते, सतीश गिरमकर, सतीश साळुंके, जितेंद्र खोत, सचिन नाईक, मोहन जाधव आदींचा समावेश होता.

Web Title: Warning of intense agitation for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.